बायडेन यांच्यावरील छापा | पुढारी

बायडेन यांच्यावरील छापा

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया हा आपल्याकडे नेहमी चर्चेचा विषय असतो. अलीकडच्या काळात विरोधी पक्षांतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांचे छापे पडले आहेत आणि छोट्यातल्या छोट्या नेत्यावरील छाप्यांनाही मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. या यंत्रणा किंवा काही घटनात्मक संस्थासुद्धा स्वायत्त असल्याचे दावे केले जात असले तरी त्या केंद्र सरकारच्या नियंत्रणात असतात, हे उघड गुपित आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निवासस्थानावर एफबीआयने टाकलेल्या छाप्याचे आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. अमेरिकेत याचे आश्चर्य कितपत वाटले असेल, याची कल्पना नाही; परंतु भारतीयांना मात्र आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही.

कारण, देशाच्या प्रमुखाच्या निवासस्थानावर छापे टाकणे हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा आपला अनुभव असा आहे की, केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया निवडक स्वरूपाच्या असतात आणि त्या प्रामुख्याने विरोधी नेत्यांवरच होत असतात. सत्ताधारी नेत्यांवर कारवाई करण्याची वेळ आली तरी नुसता देखावा करून कायदेशीर कचाट्यात सापडणार नाही, याची काळजी यंत्रणा घेत असतात. त्यामुळे जगातील सर्वात ताकदवान समजल्या जाणार्‍या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावरील छाप्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाने हा छापा टाकला. जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी घरी नसताना हा छापा टाकण्यात आला, हे आणखी एक वैशिष्ट्य. व्हाईट हाऊस हे अमेरिकन अध्यक्षांचे अधिकृत सरकारी निवासस्थान आहे; परंतु छापा व्हाईट हाऊसवर नव्हे, तर त्यांच्या खासगी निवासस्थानावर पडला आहे. एफबीआयची ही छाप्याची कारवाई तब्बल तेरा तास चालली आणि घराच्या सर्व खोल्यांपासून गॅरेजपर्यंत सर्वत्र झडती घेण्यात आली. छाप्यानंतर एफबीआयने काही गोपनीय फायली जप्त केल्या. बायडेन अमेरिकेचे सिनेटर होते, त्या काळातल्या या फायली असल्याचे सांगण्यात येते. शिवाय काही फायली आठ वर्षांपूर्वीच्या म्हणजे, ते उपराष्ट्रपती होते त्या काळातील आहेत.

बायडेन यांच्या घरावरील हा दुसरा छापा आहे. यापूर्वी एकदा छापा पडला होता, त्यातून काहीच हाती लागले नव्हते. यावेळच्या छाप्यातून सहा गोपनीय फायली जप्त केल्या आहेतच; शिवाय बायडेन यांनी हस्ताक्षरात केलेल्या काही नोंदीही ताब्यात घेतल्या आहेत. जगातील सगळ्यात जुनी लोकशाही आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही याची चर्चा सातत्याने होत असते. दोन्ही देशांतील साम्यभेदांवरही सातत्याने चर्चा होत असतात. त्यातून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील अनेक चांगल्या गोष्टींचे गुणवर्णनही केले जाते. भारतातील लोकशाही संख्येने सर्वात मोठी आहे, तर अमेरिकन लोकशाही स्वत:ला सर्वात जुनी आणि महान म्हणवते. अशा कारवायांच्या निमित्ताने मोठ्या आणि जुन्या लोकशाही देशातील फरकही अधोरेखित होत असतो.

आपल्याकडील अनेक चित्रपटांमधून छापे पडल्यानंतरच्या परिस्थितीचे चित्रण दाखवले जाते. छापा पडलेली व्यक्ती राजकीयदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या बलदंड असते. आपल्या ताकदीवर आपण कशावरही नियंत्रण मिळवू शकतो, असा त्यांचा भ्रम असतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या सर्वोच्च व्यक्तीपर्यंत फोनाफोनी करून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला जातो. कारवाई रोखण्यासाठी किंवा गुंडाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. इथे तर थेट अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानावर छापा पडला आणि त्याची कारवाई तेरा तास चालली, हे लक्षात घ्यावे लागते.

अमेरिकेच्या अध्यक्षांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा कारवाईनंतर तपास यंत्रणेच्या हेतूबद्दल अकांडतांडव केले नाही. बायडेन यांनी छाप्यानंतर दिलेली प्रतिक्रियाही महत्त्वाची असून, लोकशाही देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीकडून व्यवस्थेचा किती आदर केला जातो, हेच त्यातून दिसून येते. छापा पडल्याबद्दल आपल्याला खेद वा खंत वाटत नाही. काही फायली चुकीच्या ठिकाणी होत्या, हे निदर्शनास आल्यानंतर त्या आम्ही अर्काईव्ह विभाग आणि न्याय विभागाकडे सोपवल्या असल्याचे बायडेन यांनी सांगितले. तर दुसरीकडे बायडेन यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, बायडेन यांनी स्वतःच न्याय विभागाच्या अधिकार्‍यांना तपासणीसाठी बोलावले होते आणि तपासणीवेळी व्हाईट हाऊसचा एक अधिकारी तेथे हजर होता.

छापा पडला असताना आपणच यंत्रणेला तपासणीसाठी बोलावल्याचे वक्तव्य केल्यामुळे रिपब्लिकन पार्टीने बायडेन यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. छाप्याचे एवढे राजकारण सुरू असताना मुळात हा छापा का पडला होता, हेही समजून घेणे आवश्यक आहे. अमेरिकेमध्ये कार्यकाळ संपल्यानंतर आपल्याकडील गोपनीय फायली आणि कागदपत्रे स्वतःजवळ ठेवणे बेकायदेशीर आहे. बायडेन यांच्या खासगी कार्यालयातून गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये वीस फायली ताब्यात घेण्यात आल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या घरावर छापा पडला होता. बायडेन यांच्या म्हणण्यानुसार, या फायली कशासंदर्भातील आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. दुसरीकडे सीएनएन किंवा न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार, बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते, त्या काळातील या फायली होत्या.

पहिल्या दहा फायलींमध्ये युक्रेन, इराण आणि ब्रिटनशी संबंधित काही गुप्त माहिती होती. बायडेन यांच्या मुलाचा 2015 मध्ये मृत्यू झाला होता, त्यासंदर्भातील माहितीही या फायलींमध्ये असल्याचा दावा सीएनएनने केला आहे. ताज्या कारवाईतून एफबीआयने आणखी काही गोपनीय माहिती हस्तगत केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रस्ताळ्या राजवटीनंतर बायडेन यांच्यासारखे शांत वृत्तीचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेला लाभल्यानंतर त्यांचे जगभरात कौतुक झाले होते; परंतु अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या प्रतिमेला मोठा तडा गेल्याचे पाहावयास मिळाले. युक्रेन युद्धातही सुरुवातीला कचखाऊ भूमिका घेतल्याने त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. एफबीआयच्या ताज्या छाप्यांमुळे त्यांना मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात ते कितीही सारवासारव करीत असले तरी त्यामुळे त्यांची पत सुधारणार नसल्याचा जाणकारांचा दावा आहे.

Back to top button