लवंगी मिरची : झडती अमेरिकेची | पुढारी

लवंगी मिरची : झडती अमेरिकेची

विजय : अमेरिकेत घडलेली घटना अतिशय धक्कादायक म्हणावी लागेल रे.

संजय : का रे काय झाले?

विजय : अरे बाबा, राष्ट्राध्यक्षांच्या घराची झडती तिथल्या एका तपास यंत्रणेने घेतली म्हणे. राष्ट्राध्यक्ष कोण तर ज्यो बायडन. तेही सध्या खुर्चीत बसलेले. त्यांच्या घरावर छापा टाकला, कागदपत्रे तपासली, बरीचशी कागदपत्रे जप्त केली आणि अधिकारी निघून गेले .

संजय : काय सांगतोस काय? आपल्या भारतात तर कुणाच्याही घरावर छापा टाकला तर तो इतका गदारोळ करतो की जसं काय तो राजा हरिश्चंद्राचा अवतार आहे. कुठलेही पाप न करता त्याने ही सगळी संपत्ती कष्टाने कमावली आहे. मीडियाला काय बोलवतात, त्याच्या घरातील सगळे लाभार्थी मुले, मुली, जावई, सुना या सगळ्यांना मीडियासमोर रडायला लावून सहानुभूती मिळवतात. काय काय चालतं आपल्याकडे. बरं, तिकडं अमेरिकेत काय झालं?

विजय : काहीच झालं नाही. अध्यक्ष महोदय आपलं काम करत राहिले आणि यंत्रणा आपले काम करत राहिली.

संजय : म्हणजे अध्यक्ष महोदयांना हार्ट अ‍ॅटॅक वगैरे अजिबात आला नाही?

विजय : तसं अजून तरी वाचण्यात नाही आलं माझ्या. आपल्या राजकीय नेत्यांना मात्र पोलिस यंत्रणा, सीबीआय, ईडी दारात नुसते उभे राहिले तरी छातीत कळ येते आणि मग ते तातडीने दवाखान्याकडे रवाना होतात.

संजय : अरे दवाखाना काय म्हणतोस त्याला? ती पंचतारांकित हॉस्पिटलं असतात. जेलच्या कोठडीत राहायला नको म्हणून हॉस्पिटलमध्ये जायचं नाटक करायचं. त्याच्यापेक्षा जेलमध्ये जाताना सुहास्य वदनाने आपल्या कार्यकर्त्यांना हाच उंचावून दिलासा देणारे, जिंकल्याचा आविर्भाव निर्माण करणारे निगरगट्ट नेते ही फक्त आपल्या देशाची ओळख असेल. जेलमध्ये जात आहेत म्हणजे जसं काही यांनी काहीच केलं नाही, तरी एक निरपराध व्यक्तवर अन्याय केला जात आहे असं दाखवतात. मूठ आवळून, मूठ कसली वज्रमूठ उंचावून दाखवत हसत हसत जेलमध्ये जातात. आपल्या देशात कोणीही कोणावर काहीही आरोप केला, अगदी कागदोपत्री पुराव्यांनिशी सर्व मांडले तरी एक सर्वसाधारण फॅशन आहे की, हे सगळे राजकीय सुडापोटी सुरू आहे असे म्हणायचे. हे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर रचलेले कटकारस्थान आहे, असे म्हणायचे. आपण किती निष्पाप आहोत याचे पोवाडे गायचे.

विजय : अमेरिकेत हे काय भलतेच झाले. चक्क खुर्चीत असलेल्या अध्यक्षाच्या घरावर छापा टाकून झडती घ्यायला यंत्रणांची हिंमतच कशी झाली असेल?

संजय : अरे सोड रे ते. त्यांच्या यंत्रणा आपली आपली कामे करतात. आपल्याकडे मात्र गावगन्ना पुढार्‍यांपासून पंचायत समितीच्या माजी सभापतीपासून, ते थेट माजी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत किंवा कोणत्याही मंत्र्यापर्यंत यंत्रणांचे हात पोहोचले की सर्वात आधी ज्याच्यावर आरोप आहे, तो आकाशपातळ एक करतो की विचारता सोय नाही. या बातम्यांचा मीडियाला सगळ्यात जास्त आनंद होतो. त्यांना ब्रेकिंग न्यूज हव्या असतात. छापा किंवा झडती सुरू झाली की इतके सापडले, तितके सापडले, त्यानंतर साधारण चार तासानंतर यंत्रणा संबंधित व्यक्तीला घेऊन जेलकडे निघाल्या, जेलमध्ये त्या व्यक्तीचा दिनक्रम कसा असेल, त्यांना दुसर्‍या दिवशी कोर्टात जामिनासाठी नेताना आणि जामीन नाकारल्यानंतर मिळणार्‍या ब्रेकिंग न्यूज म्हणजे मीडियाला आठ दिवस काय दाखवायचे याची चिंता नसते.

– झटका

Back to top button