वर्ष नवे, संघर्ष नवा | पुढारी

वर्ष नवे, संघर्ष नवा

कोल्हापूरचे राजकारण नेहमीच धगधगते आणि संघर्षाचे राहिले आहे. आता नवीन वर्ष सुरू झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय पार्श्वभूमीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. छत्रपती राजाराम आणि कुंभी-कासारी साखर कारखान्यांवरून संघर्ष उफाळत असताना अचानक याला नवे वळण मिळाले. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ‘ईडी’ने छापा टाकला आणि जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ समजले जाणारे कागल ढवळून निघाले. आता मुश्रीफ-घाटगे असा सामना सुरू झाला आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही.

मात्र, ईडीच्या छाप्याने या संघर्षाची धार तीव— झाली आहे. छापा पडताच मुश्रीफसमर्थक रस्त्यावर उतरले त्याचवेळी मुश्रीफ यांनी या छाप्यामागे कागलचा भाजपनेता असल्याचे सांगून आरोपांच्या तोफेला बत्ती दिली. त्यावेळी दिल्लीत असलेले समरजित घाटगे यांनी कोल्हापुरात येऊन या आरोपाला उत्तर दिले. उत्तर देताना त्यांनी मुश्रीफ यांच्यावर, ते जातीयवादी असल्याचा आरोप केला. त्याचवेळी आरोपांचा सामना करण्याचा मोलाचा सल्ला देण्यासही घाटगे विसरले नाहीत. त्यावर मुश्रीफ गटाने मंडलिक यांनी आळवलेला जमिनीच्या व विचारांच्या वारसाचा वाद पुन्हा आळवला. येणार्‍या काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मुश्रीफ-घाटगे यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार होईल.

कागलमध्ये या गटातून त्या गटात प्रवेश हे नेहमीचे चित्र पुन्हा दिसेल. फाटाफुटीला ऊत येईल. मात्र, कागलवर सत्ता कोणाची, याचा निर्णय जनताच देईल. कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संघर्षात कोण कोणाच्या बाजूने जाणार, याचे चित्र माघारीनंतर स्पष्ट होईल. तूर्त विद्यमान अध्यक्ष चंद्रदीप नरके यांना आव्हान उभारण्याची तयारी सुरू आहे.

शाहू आघाडीचे एकनाथ पाटील, बाजीराव खाडे, प्रकाश देसाई, बाळासाहेब खाडे यांच्यासह विरोधी शाहू आघाडीच्या बैठका सुरू आहेत. 18 जागांसाठी होणार्‍या निवडणुकीत ‘अ’ वर्गाचे 23 हजार 31, तर ‘ब’ वर्गाचे 364 मतदार कुंभी-कासारीवर सत्ता कोणाची, हे ठरवणार आहेत. याच दरम्यान आणखी एका सामन्याला सुरुवात झाली आहे. गेले काही महिने थंड असलेल्या गोकुळच्या दुधाला उकळी फुटली आहे. चार महिने आपण कारभाराची माहिती घेतली.

आता हे सर्व उघड करण्याची वेळ आली असल्याचे सांगून, गोकुळच्या विरोधी गटाच्या संचालक शौमिका महाडिक यांनी वादाचा नवा अध्याय सुरू करण्याचे ठरविले आहे. गोकुळ आणि वाद हे समीकरणच आहे. यामध्ये आता महाडिक नेमके कोणते नवे मुद्दे आणणार हे पाहावे लागेल. आता यातून नेत्यांचे ध—ुवीकरण सुरू होईल.

कार्यकर्त्यांची वाटणी होईल आणि निवडणुका जवळ येतील तशी संघर्षाला धार चढेल. आता यामध्ये राजकारणाच्या पुढच्या जोडण्या बघून नेते काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याचा विचार करता कोल्हापूरचे राजकरण नेहमीच वेगळे राहिले आहे. साखर कारखाने, गोकुळ, जिल्हा बँक यांच्याभोवती कोल्हापूरचे राजकारण नेहमीच फिरत असते. ही सत्ता केंद्रे ज्याच्या हातात, त्याचाच कोल्हापूरच्या राजकारणात नेहमीच वरचष्मा राहिला आहे.

एकवेळ आमदारकी नको; पण ही सत्ता केंद्रे ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांत नेहमीच रस्सीखेच सुरू असते. कोणत्याही सत्ताकेंद्राच्या निवडणुकीचा आगामी निवडणुकांवर परिणाम होत असतो. सध्या दोन साखर कारखान्यांची निवडणूक होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकारण ढवळून निघत आहे. इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी कोण राहील, हे लवकरच कळेल!

कोल्हापूरच्या राजकारणाचा विचार करता ते काही घटकांपुरते फिरते. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी कोणी सोडत नाही. गेल्या काही वषार्र्ंचा विचार करता राजकारण एकदम टोकाला गेल्याचे चित्र आहे. राज्यात शिवसेना फुटली असली तरी शिंदे गटाला अजूनही म्हणावे तसे बस्तान बसविता आलेले नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच काही सत्ता केंद्रांवर वर्चस्व आहे. ही सत्ता केंद्रे अद्यापही ताब्यात घेण्यास भाजपला यश आलेले नाही. शिवसेना केवळ गटापुरती मर्यादित आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांमध्ये सातत्याने संघर्ष निर्माण होत असल्याचे चित्र प्रकर्षाने दिसून येते. येत्या काळात आणि आगामी जिल्हा परिषद, लोकसभा, निवडणुकीत काय काय घडते हे पाहणे रंजक ठरेल.

Back to top button