पाकिस्तानला घरचा आहेर! | पुढारी

पाकिस्तानला घरचा आहेर!

दहशतवाद हा विषारी सापासारखा असतो. शेजार्‍यांवर सोडण्यासाठी पाळलेला साप कधी ना कधी पाळणार्‍यांवर उलटतोच उलटतो. पोसलेल्या दहशतवादाने पाकिस्तानला अनेकदा हादरवून टाकले आहे आणि शेकडो बळी घेतले आहेत. अनेकदा अनुभव घेऊनही दहशतवादाला चिथावणी देण्याची पाकिस्तानची खुमखुमी कमी होत नसल्याचेच यासंदर्भातील घटनांवरून दिसून येते. आता तर पाकिस्तानी तालिबान म्हणून ओळखल्या जाणार्‍या तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने समांतर सरकारची घोषणा करून पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊन एक नवेच संकट उभे केले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सततच्या संघर्षामुळे त्रस्त झालेल्या पाकिस्तान सरकारची डोकेदुखी शतपटीने वाढली आहे.

टीटीपीने यासंदर्भात घोषणा करून काही नव्या नियुक्त्या केल्या. या नियुक्त्या सरकारला आव्हान देणार्‍या आहेत. त्यांनी थेट आपले समांतर सरकारच बनवले असून, खातेवाटपही जाहीर केले आहे. यातही उल्लेखनीय आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे फतवे जारी करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करण्यात आली! तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा घेतल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा परिपाक म्हणून टीटीपीच्या या नियुक्त्यांकडे पाहिले जाते. संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिलेल्या मुफ्ती मुजाहिम याचा अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समावेश आहे,

यावरून टीटीपीने किती नामचीन लोकांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला आहे, हे लक्षात येऊ शकेल. अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबानने तिथली सूत्रे घेतली तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी त्या घटनेचे स्वागत केले होते. त्यावेळी त्यांना भविष्यातील धोक्याची कितपत जाणीव होती कुणास ठाऊक? पाकिस्तानी तालिबान ही अफगाणिस्तानच्या तालिबानहून वेगळी संघटना असली तरीसुद्धा अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे इकडे यांचे मनोधैर्य वाढले आहे, हे लक्षात घ्यावे लागते. दक्षिण आणि उत्तर अशा दोन प्रांतांमध्ये समांतर सरकार विभागले असून, यातील एका मंत्रालयामध्ये आत्मघातकी दहशतवाद्यांच्या जत्थ्याचा समावेश आहे.

अल कायदा या ओसामा बिन लादेनच्या अल शबाब या संघटनेने सोमालियावर ताबा मिळवल्याची घोषणा केली होती, तशाच पद्धतीने तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याची घोषणा केली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती पाकिस्तानमध्ये होताना दिसत असून, टीटीपीने पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वाह आणि बलुचिस्तानवर ताबा मिळवल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे पाकिस्तानमधील लोकनियुक्त सरकार आणि त्यांच्या संरक्षणदलाच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान मानले जाते. या अपेक्षित, पण नव्या घडामोडींनी दक्षिण आशियातील अस्थिरतेत भर पडली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील स्थिती कोणत्या थराला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तेहरिक ए तालिबानच्या समांतर सरकारच्या घोषणेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले असून, पाकमध्ये भविष्यात दहशतवाद्यांचे सरकार येणार काय, अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. हा देश अफगाणिस्तानच्या वाटेवर निघाल्याचे बोलले जाते. या घडामोडी भारतावरही गंभीर परिणाम करणार्‍या ठरू शकतात. त्यासंदर्भातील नेमकी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी टीटीपीचा भूतकाळ आणि आजवरची वाटचाल समजून घेणे आवश्यक ठरते.

टीटीपी हा पाकिस्तानातील चाळीसहून अधिक दहशतवादी संघटनांचा समूह. खैबर पख्तुनख्वाहमध्ये त्यांचा तळ. खैबर पख्तुनख्वाह हा पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी एक असून, त्याची राजधानी पेशावर आहे. या प्रांताची पूर्व सीमा अफगाणिस्तानलगत आहे. 2018 मध्ये फेडरली अ‍ॅडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरियाचा (एफएटीए) खैबर पख्तुनख्वाह प्रांतात समावेश केला गेला. एफएटीए हा पाकचा भाग असला तरी तिथे या देशाचे कायदे लागू होत नव्हते. या प्रदेशाची सीमा अफगाणिस्तानला लागून असल्यामुळे तेथे लढणार्‍या दहशतवादी संघटनांचे ते प्रमुख आश्रयस्थान बनले. अफगाणिस्तानमध्ये दहशतवादविरोधी लढाई सुरू होण्याआधी एफएटीएमध्ये छोटे छोटे कट्टरपंथी गट स्वतंत्र लढत होते.

अफगाणी तालिबानला ते मदत करीत होते; परंतु अधिकृतपणे त्यांचा भाग नव्हते. 9/11 च्या अमेरिकेतील हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो सैन्याने अफगाणिस्तानात सैन्य कारवाई सुरू केली. त्यावेळी अफगाणी तालिबान, अल कायदा आणि बाकीचे कट्टरपंथी गट तिथून पळून एफएटीएमध्ये घुसले. पाकिस्तानात तेव्हा परवेझ मुशर्रफ यांचे शासन होते. अमेरिकेने मुशर्रफ यांच्यावर दबाव वाढवला आणि दहशतवादी गटांना हुसकावण्यास सांगितले. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यावेळी पाकिस्तानी सैन्य एफएटीएमध्ये दाखल झाले. त्यामुळे स्वाभाविकपणे दहशतवादी गट आणि त्यांना सहानुभूती असलेले स्थानिक लोकही नाराज झाले.

कट्टरतावाद्यांनी या नाराजीला प्रोत्साहन देऊन सामान्य लोकांना सैन्याविरुद्ध लढण्यासाठी चिथावणी दिली. जे सोबत आले नाहीत त्यांना संपवले. त्यानंतर या गटांनी आपसात मिळून पाकिस्तानी सैन्याशी संघर्ष सुरू केला. अफगाणी तालिबानमध्ये मुळे असली तरी पाकिस्तानी तालिबान म्हणून या गटांनी स्वतंत्र ओळख बनवली. कारण, अफगाणी तालिबान अफगाणिस्तानात नाटो सैन्याविरुद्ध लढत असल्यामुळे त्यांच्यात चर्चेची शक्यता नव्हती. दुसरीकडे पाकिस्तानी तालिबान पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढत होते, त्याचवेळी पाक सरकारशी चर्चाही करीत होते. पाक तालिबानचा मूळ उद्देश संपूर्ण पाकिस्तानात शरिया कायदा लागू करणे हा आहे.

खैबर पख्तुनख्वाहपासून कार्यक्षेत्र विस्तारत त्यांनी इस्लामाबादपर्यंत मजल मारली आणि लाल मशिदीत आपला अड्डा बनवला होता. जुलै 2007मध्ये तीन चिनी मुलींचे अपहरण केल्यानंतर प्रकरण चिघळले आणि सैन्याने कारवाई करून लाल मशीद दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त केली. या कारवाईवरूनही पुढे मोठे राजकारण झाले आणि अनेक घटकांनी राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे आणि निष्क्रियतेमुळे आता संकट गळ्याशी आले आहे. या संकटाने पाकिस्तानचे भवितव्यच पणाला लावले आहे, हे निश्चित!

Back to top button