नॅनो नेते अन् महामोर्चाला निमंत्रण! | पुढारी

नॅनो नेते अन् महामोर्चाला निमंत्रण!

महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकलेल्या हल्लाबोल मोर्चाने लगेच राजकीय उलथापालथी होतील, अशी अपेक्षा करणे भाबडेपणाचे ठरेल. तरीही सत्तांतरानंतर अवघ्या सहा महिन्यांत विरोधकांना हा मोर्चा काढण्याची कारणे मिळाली, याचे श्रेय आठ-दहा नॅनो नेत्यांना द्यावे लागेल.

कुणाचेच आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणांकडे लक्ष नसल्याने दूरदूरपर्यंत कुठेही नसलेले मुद्दे या मंडळींनी उभे केले आणि शेवटी विरोधकांना हा हल्लाबोल मोर्चा काढण्याचे निमित्त मिळाले. या मोर्चाचे कोणतेही तडकाफडकी परिणाम संभवत नाहीत. मात्र, काही राजकीय समीकरणे या मोर्चाने नक्कीच अधोरेखित केली. महाविकास आघाडीचे एकीकरण आणि आघाडीचा राजकीय विस्तार होण्याची शक्यता ही या महामोर्चाची दोन फलिते स्पष्ट दिसतात.

सत्तांतरानंतर महाविकास आघाडीत तसे तीनच पक्ष उरले होते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन घटक पक्ष किती एकत्र आहेत, याबद्दल संशय घ्यावा असे वातावरण होते. या मोर्चाने तो दूर केला. मोर्चाची घोषणा करण्यापासून ते मोर्चाच्या आदल्या दिवसाच्या पत्रकार परिषदेपर्यंतचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केले. आघाडीचे घटक म्हणून अजित पवार आणि नाना पटोले हे दोन्ही काँग्रेसचे नेते उद्धव यांचे नेतृत्व स्वीकारून चालताना दिसले. सत्ता गेली तरी आम्ही एक आहोत, एकत्र आहोत, हा संदेश महाविकास आघाडीचे नेते म्हणून ते यानिमित्ताने देऊ शकले.

या महाविकास आघाडीत चौथा म्हणून कुठला पक्ष दिसत नव्हता. अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाकप वगैरेंनी जो पाठिंबा दिला, तो शिवसेनेला; महाविकास आघाडीला नव्हे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ललकारणार्‍या या आघाडीचा राजकीय विस्तार होण्याची कुठलीच शक्यता दिसत नव्हती. ती या महामोर्चाने निर्माण केली. या महामोर्चासाठी शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी संभाजी बि—गेड आदी पक्ष संघटना महाविकास आघाडीच्या बाजूने उभ्या राहिल्या. या सर्वांना सामावून घेत आघाडीचा राजकीय विस्तार होईल आणि एक सशक्त राजकीय पर्याय महाराष्ट्रात उभा राहू शकेल.

अर्थात, काही अंतर्विरोध मिटवल्याखेरीज ते शक्य होणार नाही. शिवसेनेपुढे मैत्रीचा हात पुढे करून वंचित बहुजन आघाडी ताटकळत बसून आहे. प्रकाश आंबेडकर आता कंटाळून आपला ताटकळलेला हात मागे घेतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली तरी उद्धव त्यांना हो म्हणत नाहीत अन् नाही म्हणत नाहीत. कारण, प्रकाश आंबेडकरांबद्दल दोन्ही काँग्रेसचा अंदाज उद्धवना नाही. त्यातही शरद पवार काय विचार करतात हे कळल्याखेरीज उद्धव यांचे एकही पाऊल भीमशक्तीच्या दिशेने पडणार नाही. हा अपवाद सोडला तर भाजपच्या ध्येयधोरणांना विरोध असलेल्या पक्ष संघटना महाविकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्र येऊ शकतात, अशी आशा या महामोर्चाने निर्माण केली.

महाराष्ट्राची निरंकुश सत्ता मिळवण्यास निघालेला भाजप मुळात महाराष्ट्रविरोधी आहे, असाही संदेश या मोर्चातून गेला. येत्या काळात तो किती मूळ धरतो यावर पुढील निवडणुकांचे रणांगण आखले जाईल. महाराष्ट्रातून गुजरातसह अन्य राज्यांत पळवले गेलेले प्रकल्प आणि कर्नाटकातील भाजप सरकारने सोलापूर, अक्कलकोटपर्यंत महाराष्ट्राच्या भूभागावर केलेला दावा यापेक्षा महामोर्चात केंद्रस्थानी आलेला मुद्दा म्हणजे भाजप नेत्यांनी चालवलेला महापुरुषांचा अवमान.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या दहा नेत्यांची दहा तोंडे लावलेला रावण या महामोर्चाने मिरवत नेला. त्यात अब्दुल सत्तार यांच्यासह एकनाथ शिंदे गटाची दोन तोंडे सोडली तर बाकी आठही तोंडे भाजपची आहेत. त्यात छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून झालेल्या सुटकेशी एकनाथ शिंदे यांची तुलना करणारे मंगलप्रभात लोढा आहेत, शिवरायांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचे बालपण रायगडावर कोकणातच गेले, असा दावा करणारे प्रसाद लाड आहेत, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असा उद्धार करणारे मंत्री चंद्रकांत पाटील आहेत, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, गोपीचंद पडळकर, राम कदम, रावसाहेब दानवे अशा दहा तोंडांनी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा दाही दिशांनी अवमान सुरू केला आणि विरोधकांना हा महामोर्चा काढण्याचे निमंत्रणच मिळाले; अन्यथा गेल्या सहा महिन्यांत रोज टी-ट्वेंटी खेळणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारने निर्णयांचे डोंगर रचले; पण साधे आऊटचे अपील करण्याची संधी देखील विरोधकांना मिळाली नाही.

ती या मंडळींनी दिली. शिंदे-फडणवीस यांनी जीआर म्हणजे शासन निर्णय जारी करण्याचा एक विक्रमच रचला. त्यात आणखी एक जीआर फक्त अशा भाजप नेत्यांसाठी काढला असता तर? आपली उंची, वकूब विसरून कुणीही महाराष्ट्र घडवणार्‍या महापुरुषांचे बरे-वाईट कुठलेच दाखले देऊ नयेत, महापुरुषांची, समाजसुधारकांची नावेदेखील उच्चारू नयेत, अशी मनाई करणारा एक जीआर जारी केला असता तर कुठल्या महापुरुषाबद्दल या नॅनो नेत्यांनी ना मुक्ताफळे उधळली असती, ना विरोधकांचा महामोर्चा धडकला असता, ना भाजपच्या दहा तोंडी नेत्यांच्या रावणाची अशी धिंड निघाली असती. या मोर्चाचे प्रेरणास्थान म्हणून या नेत्यांचे आभार मानणारे फलक या हल्लाबोल मोर्चात दिसले असते तरी चालणार होते.

महापुरुषांवर अद्वातद्वा बोलून या मंडळींनी विरोधकांना मोर्चा काढण्याचे निमंत्रण दिलेच; शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या विजयासाठीचे जे सूत्र भाजपच्या हाती सोपवले ते देखील या नेत्यांनी गुंडाळून ठेवले. गुजरातच्या विजयाचा जल्लोष करताना पंतप्रधान मोदी काय म्हणाले? समाजात फूट पाडणार्‍या फटी अनेक आहेत. त्यात आणखी बोटे घालू नका. त्यापलीकडे जाऊन समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचा. भाजपने गुजरातेत नवा विक्रम रचला. कारण, श्रीमंत, गरीब, पुढारलेला, मागासलेला, दलित, सवर्ण अशा सर्व घटकांनी भाजपला मतदान केले. अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेले 40 पैकी 34 मतदारसंघ भाजपने जिंकले.

सामाजिक दुभंगरेषांचे राजकारण भाजप करत नाही. महाराष्ट्रात नेमके उलट घडले. आधीच सारे महापुरुष जाती-जातीत वाटून घेतले आणि त्या प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत भाजपने अठरापगड जातीत विभागलेल्या समाजाचा रोष पत्करला. महापुरुषांबद्दल मनापासून आदर नसेलही. किमान राजकीय मतलबाचा तरी मान राखायचा! यातून महाराष्ट्रात भाजपचे जे सोशल इंजिनिअरिंग बिघडले, ते दुरुस्त करण्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सरकारप्रमुखास आता जास्तीचे कष्ट घ्यावे लागतील. महामोर्चाचा तोदेखील एक परिणाम आहेच !

– विवेक गिरधारी

Back to top button