लवंगी मिरची : लावा ताकद | पुढारी

लवंगी मिरची : लावा ताकद

पांडू ः गावात किती टक्के मतदान झालं रं गणू!
गणू ः म्हणत्यात बाबा 60 टक्क्याच्या वर झालं!
पांडू ः आमच्या पार्टीतल्या समद्यांनी मतदान केलं बघ!
गणू ः आमच्या गटातील झाडून सगळे मतदानासाठी गेले बघ!
पांडू ः मग तुझा काय अंदाज हाय रं गणू!
गणू ः त्यात काय अंदाज बांधायचा, आमचंच पॅनेल निवडून येणार बघ.
पांडू ः ते कस रं बाबा, आम्ही बी काय गप्प बसलोय व्हय! आम्हीबी चांगलीच फिल्डिंग लावलीय की!
गणू ः काय पण बोल, खरं सत्ता आमचीच येणार, तेवढी ताकद लावलीय रं!
पांडू ः आम्ही बी काय कमी ताकद लावली नाय, प्रत्येक घराघरात जाऊन प्रचार केलाय!
गणू ः किती बी प्रचार कर, आमची ताकदच कामी येणार हाय बघ!
पांडू ः दुसर्‍याला कधी कमी लेखू नये रं बाबा!
गणू ः सत्तेत असताना आमच्या पार्टीनं जी काही इकास कामं केलीत, त्यामुळं आम्ही पुन्हा ग्रामपंचायतीत बसणारच बघ!
पांडू ः कसली इकास कामं केली तुम्ही ते दिसतंय की! लोकं आता शाणी झाल्यात राव.
गणू ः बघच, इलेक्शनच्या निकालानंतरच तुझं कसं डोळं उघडत्यात ते.
पांडू ः गप्प बस. गावात बदलाचं वारं वाहू लागलंय, लोकांना बदल हवा हाय!
गणू ः तुमच्या पार्टीतलीही माणसं फोडल्यात बघ, शपथा घेतल्यात सगळ्यांच्याकडनं!
पांडू ः आम्ही बी तुमच्या पार्टीतली माणसं फोडायला काही कमी पडलेलो नाही, वार्डावार्डातनं प्रचार केलाय!
गणू ः काय बी म्हण; आमची माणसं काही फुटणार नाहीत, आमच्या पुढार्‍यानं तशी जोडणा लावलीया!
पांडू ः आमचा बी पुढारी काही गप्प बसला नाही, त्यानंही सर्वांना आपल्या जाळ्यात ओढलंय!
गणू ः तसलं काय नसतं रं, लोकांना पैशाचं आणि जेवणाचं आमिष दाखिवलं की काही चालत नाही.
पांडू ः आतापर्यंत तुमच्या पार्टीनं हेच केलंय, गावाच्या इकासाकडं कधी ध्यान दिलंया का?
गणू ः ते मला समदं पटतंय रं; पण काय करणार? पुढार्‍यानं सोसाटीतून कर्ज दिलंय नव्हं, मग त्याचं गुणगाण गावंच लागणार!
पांडू ः खरं हाय रं तुझं, अजूनही आमचं काही भलं झालेलं नाही, त्यामुळं पुढार्‍यांच्या कचाट्यात आम्ही साधी माणसं आडकलोय बघ!
गणू ः काय करूया, इलाजच नाही बघ त्याला, त्यांच्या ताटाखालचं मांजर व्हावं लागतंय बघ.
पांडू ः अरं गणू, पिढ्यान्पिढ्या हेच चालत आलंय बघ. आम्ही सामान्य माणसं एकमेकांशी भांडत राह्याचं अन् सत्तेचं लोणी मात्र त्यांनी खायाचं!
गणू ः खरं हाय तुझं, आपण इनाकारण कापडं फाडून घ्यायची आन् ह्यांनी चंगळ करायची.
पांडू ः पुढार्‍यांच्या भांडणात गावाचा इकास मागंच पडलाय बघ. लोकं कधी शाणी होणार!
गणू ः होतील रं, लोकांना हळूहळू समजायला लागलंय… पुढारी फकस्त आपला मतदानासाठी उपेग करून घेत्यात ते!
पांडू ः ते काय बी असू दे बघ. कोणती बी पार्टी निवडून येऊ दे; खरं गावाच्या इकासाला ताकद लावायला पायजेबघ!
गणू ः एक मात्र खरं हाय बघ. पुढारी किती बी भांडूद्यात; गावाचा इकास व्हायलाच पाहिजे!

Back to top button