मुंबई वार्तापत्र : खोक्यांना खोक्यांचेच अभय! | पुढारी

मुंबई वार्तापत्र : खोक्यांना खोक्यांचेच अभय!

सत्तेच्या प्रत्येक खुर्चीत खोके विराजमान झाले की, जनतेच्या पैशाची लूट ठरलेली आहे. ही लूट करणार्‍यांची खोकी कधीच बाहेर येणार नाहीत. खोक्यांचे खोक्यांना कायम अभय असते आणि म्हणून मुंबईत मिठीसारख्या घाणेरड्या नदीतूनही पैसा सतत वाहत असतो.

गुवाहाटीहून मुंबईत परत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामाख्या देवीला गेलेले किमान तिघेजण सरळ घरी जाणार नाहीत, ते विमानतळावरून सरळ वांद्य्रात कलानगरात धडकतील आणि ‘मातोश्री’चे दार ठोठावतील, असे अनेकांना वाटले. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी तसा इशारा गुवाहाटीतूनच दिला होता. चिखलीच्या प्रचंड जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पन्नास खोक्यांचा उद्धार करताच तिकडे गुवाहाटीच्या थंडीतही नेहमीपेक्षा मोठा जाळ उठला. हे खोक्यांचे लांच्छन असे किती दिवस ऐकून घ्यायचे? कुणी पन्नास खोके म्हणतो, कुणी खोके सरकार म्हणतो, तर शिवसेना फोडण्यासाठी पन्नास खोके घेतले हा रोज नव्या दमाने केला जाणारा आरोप गप गुमान सहन केला जातोय म्हणून शिंदे सरकारचा उल्लेख ‘मिंधे सरकार’ असाही केला जाऊ लागला.

शेवटी आरोप करण्याला आणि ते ऐकून घेण्यालाही एक मर्यादा असते. ती पार झाली. दीपक केसरकर यांनी फ्रीजचा बॉक्स भरून कुठे कुठे काय गेले ते जाहीर करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा दिला. जोडीला दुसरे प्रवक्ते किरण पावसकर होतेच. त्यांनी तर उद्धव यांच्या ‘मातोश्री’वर तिघांचे एक पथक पाठवून आजवर दिलेली सर्व खोकी बाहेर काढण्याची धमकीच दिली. हे तिघेजण कोण? राहुल शेवाळे, सदा सरवणकर आणि यशवंत जाधव. हे तिघे आज शिंदे गटात असले तरी त्यांनी मुंबई महापालिकेत मोठा काळ स्थायी समितीचे सभापतिपद भोगलेले आहे.

तब्बल चाळीस-पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला खर्च करणार्‍या स्थायी समितीचा सभापती म्हणजे काय चीज असू शकते, याचा अंदाज कुणालाही येऊ शकेल. असे कोट्यवधी रुपये सभापती म्हणून सलग चारवेळा शेवाळेंनी उडवले, सरवणकरांनी उडवले. तेव्हा ईडीचे अवतारकार्य सुरू झाले नव्हते म्हणून शेवाळे, सरवणकर प्रभृती बचावल्या. ईडीच्या तडाख्यात सापडले ते अलीकडचे सभापती यशवंत जाधव. शिवसेनेविरुद्ध उठाव होण्याच्या काहीच महिने आधी आयकर खात्याने या जाधवांवर चौफेर धाडी टाकत त्यांच्या 41 मालमत्ता जप्त केल्या. त्यातील भायखळ्यातील बिलखाडी चेंबर्समधील 31 फ्लॅट्स आणि वांद्र्यातील पाच कोटींचा एक फ्लॅट आणि हॉटेल ही सारी मालमत्ता यशवंत जाधव यांनी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असतानाच जमवली, असा आयकर खात्याचा वहीम आहे.

यशवंत जाधवांनी स्वतः इतकी मालमत्ता स्टँडिंगचा चेअरमन म्हणून जमवली तर याच स्टँडिंगवर असलेले शिवसेना, भाजप, काँग्रेस, सपच्या सदस्यांना किती वाटले असतील? आणि हे चेअरमनपद देणार्‍या आपल्या पक्षप्रमुखांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून काय अन् किती दिले असेल? किरण पावसकर यांनी गुवाहाटीतून दिलेला इशारा या प्रश्नाकडे अंगुलीनिर्देश करतो; पण हे प्रश्न इथेच थांबत नाहीत. यशवंत जाधव ईडीच्या तडाख्यात सापडले म्हणून त्यांनी जमवलेली माया समोर आली. त्यांच्या आधी आज खासदार असलेल्या राहुल शेवाळे यांनी तर हे चेअरमनपद विक्रमी काळ उपभोगले. शेवाळे यांची सारी उघड-छुपी मालमत्ता समोर आल्याशिवाय त्यांनी कुठे, किती खोकी पाठवली याचा हिशेब लागणार नाही; पण आज ते शिंदे गटात असल्याने ईडीसह सर्वच केंद्रीय तपास यंत्रणांपासून संरक्षण देणारी कवचकुंडले त्यांना लाभली आहेत.

उद्धव आणि त्यांच्या निष्ठावंत शिवसेनेकडून सतत खोके खोके ऐकून अस्वस्थ झालेले हेच शेवाळे, जाधव आणि सरवणकर उद्या ‘मातोश्री’वर खरेच गेले तर काय होईल? चोरांची रोजची भांडणे पाहण्यात आताशा महाराष्ट्रालाही तितकीशी मजा वाटत नाही. ही भांडणे निकराची झाल्याशिवाय चोरांचे पुरते वस्त्रहरण होणार नाही. त्यामुळेच जाधव, शेवाळे आणि सरवणकर आता ‘मातोश्री’वर धडकणार म्हणून सार्‍यांच्याच नजरा गुवाहाटीवरून परतणार्‍या शिंदेशाहीच्या विमानाकडे लागल्या होत्या; पण हे तिघेही विमानतळावरून सरळ आपापल्या घराकडे गेले. रस्त्यात वांद्रे लागले तरी ‘मातोश्री’च्या दिशेने त्यांनी साधे ढुंकूनही बघितले नाही म्हणतात.

आता दोन खोक्यांची गोष्ट सुरू आहे. पन्नास खोक्यांतून महाराष्ट्रात सत्तांतर घडले, हा आरोप धुमाकूळ घालत असताना त्याला उत्तर म्हणून ‘मातोश्री’वर पाठवलेल्या खोक्यांची गोष्ट शिंदे गटाने सुरू केली. महापालिकेच्या कारभारातून ही खोकी जन्म घेत आली आणि स्थायी समितीवरील सारेच पक्ष त्यांचे लाभार्थी ठरले. मुंबई महापालिकेचा कारभारच मोठा, तिथे लहानसहान खोक्यांचा विषयच नाही. वानोळ्यादाखल दोन उदाहरणे घेऊ :

2005 च्या मुंबईबुडी पावसानंतर मिठी नदी रुंद, स्वच्छ अन् सुंदर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरण स्थापन झाले. गेल्या सोळा वर्षात या प्राधिकरणाच्या फक्त सहा बैठका झाल्या. हे प्राधिकरणच जिथे कोमात म्हणा की झोपेत असताना मिठीच्या विकासावर एमएमआरडीए आणि महापालिकेने मिळून 1500 कोटी रुपये उडवले. महापालिका म्हणते, मिठी रुंद आणि आणखी खोल करण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले; पण मिठीच्या पाण्यात डुबकी मारून ही कामे बघण्याची सोय नाही. डुबकी मारून वर जिवंत येता येईल याची खात्री नाही. ज्या नदीत आज एकही मासा जिवंत नाही, ती मिठी फक्त मृत्यूची असू शकते. कामे अपूर्ण असताना कंत्राटदारांच्या खिशात 1150 कोटी गेले. आता याच मिठीसाठी नवा सल्लागार नेमायचा म्हणून पालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी यावर्षी 565 कोटींची तरतूद केली. मिठीच्या पात्रात दरवर्षी अशी खोकी कुणाच्या कृपेने तरंगत आहेत?

सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेवर भाजपचे कमळ फुलवण्याची मोठी जबाबदारी शिंदेशाहीवर येऊन पडली आणि मुंबई चकाचक करण्याची कामे हाती घेतली गेली. निवडणुका लागण्यापूर्वी ती पूर्ण करायची आहेत. त्यासाठी मुंबईसाठीच्या आपत्कालीन निधीतून प्रशासकांनी सरळ 1705 कोटी रुपये उचलले. या खर्चाला बांधील कोण? हिशेब कोण कुणाला देणार ? सत्तेच्या प्रत्येक खुर्चीत खोके विराजमान झाले की, जनतेच्या पैशाची लूट ठरलेली आहे. ही लूट करणार्‍यांची खोकी कधीच बाहेर येणार नाहीत. खोक्यांचे खोक्यांना कायम अभय असते आणि म्हणून मिठीसारख्या घाणेरड्या नदीतूनही पैसा सतत वाहत असतो.

– विवेक गिरधारी 

Back to top button