जलनियोजनाबाबत हवा नवा विचार | पुढारी

जलनियोजनाबाबत हवा नवा विचार

प्रासंगिक

जलसंकटावर खरा उपाय कोणता असेल तर स्थानिक स्तरावरील जे पाण्याचे स्रोत आहेत, तेच योग्य प्रकारे विकसित करणे. यासाठी जनजागृती आवश्यक आहे. पाण्याचे महत्त्व लोकांना पुन्हा एकदा समजून सांगण्याची वेळ आली आहे. आपल्या जुन्या पिढीच्या लोकांनी पाण्याचे मोल अचूकपणे जाणले होते. त्यानुसार ते समाजात पाण्याबाबत प्रबोधन करीत होते. त्याचप्रकारची मोहीम आताही समाजात चालविणे गरजेची आहे.

यंदा मान्सूनच्या लहरीपणामुळे भारतातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी स्वरूपाचे आहे. विशेषतः झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल अशा कृषीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यांमध्ये अपेक्षापेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा फटका निश्चितच अन्नधान्य उत्पादनावर दिसून येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी कालव्याद्वारे सिंचनाची सोय उपलब्ध आहे. मात्र, त्या ठिकाणी पाऊसच कमी पडल्यामुळे या सिंचनाच्या क्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होतो. कालव्याद्वारे योग्य प्रमाणात सिंचन झाले नाही तर अन्नधान्य उत्पादन घट होणे अपरिहार्य आहे.

संबंधित बातम्या

झारखंड या राज्याची राजधानी असलेल्या रांचीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांची लागवड केली जाते. या पिकांना भरपूर प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने या पालेभाज्यांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जाईल का, हा प्रश्न निर्माण होतो. हे खरे आहे की, पाऊसच जर कमी झाला आहे तर या पिकांना पाणीपुरवठा कोठून केला जाईल? जर हिरव्या पालेभाज्यांना गरजेनुसार पाणीपुरवठा झाला नाही, तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. आज हिरव्या पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असताना उत्पादनात घट झाल्यास दरवाढीचा भडका उडेल. बाजारात अतिउच्च किमतीत पालेभाज्या उपलब्ध झाल्यास त्याचा बोजा सामान्य माणसांसोबतच मध्यमवर्गीय लोकांच्याही खांद्यावर पडणार आहे. येथे माल्थस् या महान अर्थशास्त्रज्ञाचा मागणीपुरवठ्याचा सिद्धांत तंतोतंत लागू पडतो. जर पालेभाज्यांचे उत्पादन जास्त झाले तर पुरवठाही जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे लोकांच्या मागणीच्या प्रमाणात भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. अशा परिस्थितीत पालेभाज्यांच्या किमती स्थिर ठेवता येतात. याउलट मुळातच पालेभाज्यांचे उत्पादन कमी झाल्यास लोाकांच्या मागणीपेक्षा पालेभाज्यांचा पुरवठा कमी होतो. अशा वेळी मागणी वाढल्यामुळे पालेभाज्यांचे दर हाताबाहेर जातात. हे सर्व दुष्टचक्र रोखण्यासाठी मान्सूनमुळे पडणारा पाऊस किती महत्त्वाचा असतो हे लक्षात घ्या.

विशेष म्हणजे हवामान विभागाकडून यंदा पाऊससमान चांगले राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. मान्सूनच्या पावसाने जोर न धरल्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांत पाऊस खूपच कमी प्रमाणात झाला. बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये अनेक भागांत लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर आणि पश्चिम भारताचा विचार करता या भागांत मान्सूनमुळे पाऊस पडला असला तरी तो अपेक्षापेक्षा कमीच आहे. दरवर्षीच देशाच्या मध्य आणि दक्षिण भागांत दुष्काळाच्या झळा जाणवतात. अशा स्थितीत जर भारताचा पूर्वेकडील भागसुद्धा दुष्काळसदृश राहिला तर त्याचा अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम दिसून येईल. अनियमित मान्सून भारतासाठी काही नवीन नाही. मात्र, विज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असताना आणि आपल्याकडे पावासाचा अंदाज वर्तविण्याची अत्याधुनिक साधने उपलब्ध असताना आपण याचा अंदाज का घेऊ शकत नाही, हा खरा प्रश्न आहे. मान्सूनचा पाऊस हे निसर्गाचे देणे आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे मानवाला शक्य नाही. त्यामुळे पडणार्‍या पावसाच्या साठवणुकीबाबत आणि विनियोगाबाबत योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी जल व्यवस्थापनामध्येही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. याबाबत विदेशातून आयात करण्यात आलेली नवी विकास प्रणालीसुद्धा महत्त्वाची ठरू शकलेली नाही. उलट जलव्यवस्थापनात या नव्या प्रणालीचा उपयोग केल्यानंतर आपला पाणीप्रश्न आणखी बिकट बनला आहे.

आपल्या देशात हजारोंच्या संख्येने गोड्या पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत; पण तेथे पेयजलाचा व्यापार होणे ही खूप खेदाची बाब आहे. आज देशभरातील चित्र पाहिल्यास गावागावांतसुद्धा लोक पाणी शुद्ध करण्याच्या मशिन बसवू लागले आहेत. मशिन उपलब्ध नसेल तर लोक बाटलीतून मिळणारे शुद्ध पाणी विकत घेत आहेत. यातून आपल्याला निर्सगात उपलब्ध असणार्‍या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आपल्याला जलव्यवस्थापनावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, दुष्काळावर मात करण्यासाठी आपल्याला आपल्याकडचीच नवी प्रणाली विकसित करावी लागणार आहे.

– पद्मश्री अशोक भगत

Back to top button