लबाडाघरचे आवतण!

एखाद्याने एकदा विश्वासघात केला तर त्यात तुमचा काही दोष नसतो; परंतु जर त्याच व्यक्तीने दुसर्यांदा विश्वासघात केला तर मात्र त्याला तुम्हीच जबाबदार असता, असे म्हटले जाते. भारत-पाकिस्तान संबंधांबाबत हे सूत्र लागू होते, त्याची ठोस कारणेही आहेत. दुसर्या बाजूला विश्वासघातकी पाकिस्तान आहे. पाकच्या या विश्वासघाताबद्दल भारताने घेतलेली भूमिका बरीचशी स्पष्ट आहे. या कुरापतखोर शेजार्याने अनेकदा विश्वासघात केला, त्यामुळेच शेजारी राष्ट्र म्हणण्याऐवजी शत्रूराष्ट्र हेच विशेषण त्याच्यासाठी अधिक योग्य ठरावे! 1947 पासून आजपर्यंत अनेक पंतप्रधानांच्या काळात भारत-पाकिस्तान संघर्ष विराम करून नव्याने वाटचाल करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. करार केले; परंतु अशा करारांवरची शाई वाळायच्या आतच पाकिस्तानने आगळीक करून आपला मूळ स्वभाव दाखवला.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी पावले टाकत होते, त्याचवेळी पाकिस्तान कारगिलमध्ये सैनिकांच्या वेशातील दहशतवादी घुसवत होते, हा फार लांबचा इतिहास नाही. या सगळ्या भूतकाळाची नव्याने उजळणी करण्याचे कारण म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाकिस्तान संबंधांच्या संदर्भाने केलेले नवे वक्तव्य. पाकिस्तानमध्ये नवनियुक्त ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त नील हॉकिन्स यांच्यासोबतच्या बैठकीत शरीफ यांनी भारतासोबत नव्याने मैत्रीची इच्छा व्यक्त केली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या या इच्छेचे वर्णन लबाडाघरचे आवतण यापेक्षा वेगळ्या शब्दांत करता येत नाही. यासंदर्भाने शरीफ यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्यावरून त्यांचा सुंभ जळाला तरी पीळ जळाला नसल्याचे दिसून येते. कारण, त्यांनी दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी भूमिका बजावण्याची अपेक्षा व्यक्त केली.
सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार काश्मीर प्रश्नावर न्यायसंगत आणि शांततापूर्ण तोडगा निघण्याची गरज असल्याचेही शरीफ यांनी म्हटल्याचे समोर आले आहे. त्यावरून त्यांची मैत्रीची इच्छा किती तकलादू आहे, हे लक्षात येते. आंतरराष्ट्रीय समुदायाला यासंदर्भात सहायकाची भूमिका बजावावी लागेल, तसेच दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची मध्यस्थी आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी जोरकसपणे मांडला. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय मंचांवर वेळोवेळी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून कुरापत काढली जाते. त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही पाकिस्तानने केली. भारताशी मैत्री करायची असल्याबद्दल शाहबाज शरीफ वरवर बोलत असल्यासारखे वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय समुदायाला ओढून ताणून दोन्ही देशांमध्ये आणावयाचे आहे. काश्मीर प्रश्न उपस्थित करून अप्रत्यक्षरीत्या काश्मीरच्या जनतेला चिथावणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे.
वरवर मैत्रीचा दिखावा करून पाकिस्तान पुन्हा आपल्या मळलेल्या वाकड्या वाटेने जात असल्याचेच हे निदर्शक आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्यांचा भारताकडून अगदी योग्य रितीने समाचार घेण्यात आला आहे. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, हे भारताने वारंवार पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे; परंतु काश्मीरमध्ये स्थानिक लोकांना चिथावणी देऊन तेथील वातावरण सतत चिघळत ठेवायचे, सातत्याने दहशतवादी कारवाया करीत राहायचे यात पाकिस्तानने खंड पडू दिलेला नाही. सीमेकडून पोसला जाणारा दहशतवाद ही भारताच्यादृष्टीने सर्वात गंभीर समस्या. भारताकडून त्याला चोख प्रत्युुत्तर दिले जात असले तरी शांतता आणि स्थैर्यासाठी हा सततचा उपद्रव योग्य नाही. त्याचमुळे दहशतवाद आणि चर्चा एकावेळी होऊ शकत नाही. दहशतवाद रोखून शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची असल्याचे भारताने सुनावले आहे. समानता, न्याय, परस्पर सन्मानाचे तत्त्व या आधारे भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली. खरेतर भारताच्या तुलनेत पाकिस्तान हा फारच छोटा देश. सर्वच पातळ्यांवर पाकिस्तानचे खुजेपण नजरेत भरणारे. तरीसुद्धा भारताने पाकिस्तानशी नेहमीच सन्मानाच्या तत्त्वाच्या आधारेच चर्चा केली. याची जाणीव मात्र पाकिस्तानने कधीच ठेवली नाही.
कोणत्याही पक्षाची सत्ता पाकिस्तानमध्ये आली, तरी राज्यकर्त्यांच्या वर्तनात फरक पडला नाही. कधीतरी एखादा राज्यकर्ता थोडे सकारात्मक प्रयत्न करू लागला की, लष्कराकडून त्याला शह देण्यासाठी दहशतवादी कारवाया वाढवल्या जातात. चर्चेत गाफील ठेवून कारवाया वाढवून अधिकाधिक नुकसान पोहोचवायचे, अशीही रणनीती असू शकते. त्यामुळे पाकिस्तानवर विश्वास ठेवावा, असे वातावरण कधीही निर्माण झाले नाही. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यामध्ये तर थेट पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे भारताने पुराव्यानिशी जगाच्या वेशीवर मांडले. या दहशतवादाला खतपाणी घालणारे घटक पाकिस्तानमध्ये खुलेआम वावरत असल्याचेही अनेकदा निदर्शनास आणून दिले; परंतु पाकिस्तानने त्यांच्यावर कारवाईसंदर्भात ठोस भूमिका कधीच घेतली नाही. अशा प्रकारे संशयास्पद व्यवहार आणि संशयास्पद चारित्र्य असलेल्या देशाच्या पंतप्रधानांनी मैत्रीच्या कितीही बाता मारल्या तरी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, हा प्रश्नच आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे भारताने वारंवार सांगितले.
अमेरिकेसारख्या महासत्तेलाही त्यासंदर्भात वेळोवेळी सुनावण्यास मागेपुढे पाहिले नाही. तरीसुद्धा पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्न सातत्याने चर्चेत आणला जातो आणि काश्मीर खोर्यातील वातावरण अस्थिर राहील, यासाठी प्रयत्न केले जातात. अशा परिस्थितीत भारताने घेतलेली भूमिका योग्यच म्हणावी लागेल. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवायला पाहिजेत आणि ते कृतीतून सिद्ध झाले पाहिजे. तरच दोन्ही देशांमध्ये सौहार्दासाठी काही पावले पडू शकतात. सततच्या संघर्षाऐवजी सौहार्दाची वाट विस्तारत गेली, तर ते दोन्ही देशांसाठी उपकारक ठरणार आहे. शरीफ यांनी त्यावर आधी बोलावे.