डिजिटल नशा | पुढारी

डिजिटल नशा

बायनॉरल बीटस् हा एक विशेष प्रकारचा ध्वनी आहे ज्यातून तुम्हाला दोन्ही कानांत वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू येतात. यामुळे मेंदू गोंधळून जाऊन दोन आवाज एक करण्याचा प्रयत्न करतो. असे केल्याने मेंदूमध्ये आपोआप तिसरा आवाज तयार होतो जो फक्त आपणच ऐकू शकतो. सध्याच्या डिजिटल युगात सर्व वयाचे लोक कुठले तरी उपकरण वापरत असतात. ती आता चैन राहिली नसून अत्यावश्यक बाब बनत चालली आहे. रोटी, कपडा, मकान, बिजली, बँडविड्थ याशिवाय जगणे अशक्य आहे; पण कुठलेही तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखे आहे. तुम्ही चाकूचा उपयोग फळ कापण्यासाठी करणार का कुणाला इजा करण्यासाठी? पर्याय आपल्याकडे आहे.

बर्‍याच वेळा आपण संगणकावर संगीत ऐकतो; पण आता एक नवीन प्रकार (विशेषतः तरुणाईत) हळूहळू लोकप्रिय होत आहे. आतापर्यंत आपण नशा करण्यासाठी अल्कोहोल, कोकेन, भांग, चरस, गांजा आणि एलएसडी किंवा इतर तत्सम गोष्टी ऐकल्या आहेत. काही लोक मनशांतीसाठी डीजिटल ड्रग्ज घेऊ लागलेत. डिजिटल ड्रग्ज, म्हणजे बायनॉरल बीटस्. हे असे ध्वनी आहेत जे मेंदूच्या लहरींचे नमुने बदलण्यास आणि ड्रग्ज घेतल्याने किंवा ध्यानाची सखोल स्थिती प्राप्त करण्यासारख्या बदललेल्या चेतनेची स्थिती निर्माण करतात व आपण त्याच्या आहारी जाऊ शकता. ही संगीतातील अशी एक श्रेणी आहे जी यू ट्यूब स्पोटिफायसारख्या मीडिया प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल, हेडफोन्स आणि इंटरनेट कनेक्शनची गरज लागते.

ज्या माध्यमातून ऑडिओ ट्रॅक ऐकून नशा चढते. बायनॉरल या शब्दाचा अर्थ दोन कान आणि बीटस्चा अर्थ ध्वनी. बायनॉरल बीटस् हा एक विशेष प्रकारचा ध्वनी आहे, ज्यातून तुम्हाला दोन्ही कानांत वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू येतात. यामुळे मेंदू गोंधळून जाऊन दोन आवाज एक करण्याचा प्रयत्न करतो. असे केल्याने मेंदूमध्ये आपोआप तिसरा आवाज तयार होतो जो फक्त आपणच ऐकू शकतो. बायनॉरल बीट कार्य करण्यासाठी दोन टोनमध्ये 1000 हर्टझपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असणे आवश्यक आहे आणि दोन टोनमधील फरक 30 हर्टझपेक्षा जास्त असू शकत नाही. दोन्ही स्वरदेखील प्रत्येक कानाने स्वतंत्रपणे ऐकावे लागतात.

संबंधित बातम्या

मेंदूच्या या प्रक्रियेमुळे स्वत:ला शांत, हरवलेले आणि नशेच्या स्थितीत गेल्याचे जाणवते ज्यावेळी हे दोन्ही बिटस् मेंदूपर्यंत पोहोचतात त्यावेळी मेंदूमधील लहरी या अनपेक्षित प्रकाराने गोंधळून जातात. मेंदूला या बिटस्चा अर्थ लावणे कठीण होते वा या दोन्ही बिटस्ची जुळवाजुळव करून एक नवीन ट्यून ऐकण्याच्या नादात मेंदू काही काळ विचित्र परिस्थितीत अडकतो. या अवस्थेमध्ये मेंदूच्या जागृत अवस्थेत बदल होतात म्हणजे अमली पदार्थ घेतल्यावर किंवा संमोहन स्थितीमध्ये जी अवस्था येते, नेमकी तीच अवस्था शरीरभर पसरते व मनुष्य एका नशेमध्ये प्रवेश करतो. मुळातच या बायनॉरल बिटस्चे उद्दिष्ट मेंदूतील विद्युत लहरींमध्ये गोंधळ उडवून मेंदूची जागृत अवस्था अस्थिर करणे हेच असते. याची सुरुवात अमेरिकेत 2010 मध्ये झाली.

काही लोकांनी मनःशांतीसाठी याचा प्रयोग सुरू केला. सध्या अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, ब्राझील, रोमानिया, पोलंड आणि ब्रिटनमध्ये या डिजिटल नशेचे प्रमाण वाढत आहे; मात्र तरुणांमध्ये बायनॉरल बीटस्चे वाढते व्यसन पाहता यूएई आणि लेबनॉनसारख्या देशांनीही यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. हे लोण आता भारतातही पसरते आहे. आपण वेळीच जागे होऊन आपल्या पिढ्या बरबाद होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. गुगल व स्पोटिफायला कायदेशीर नोटीस पाठवून भारतात यावर कायद्याने बंदी घातली पाहिजे. पालकांनो वेळीच जागे व्हा! आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, मोबाईलला हेडफोन लावून तो काय ऐकतोय, याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या!

– डॉ. दीपक शिकारपूर

Back to top button