एचडीएफसी : अर्थव्यवस्थेला नवा आयाम | पुढारी

एचडीएफसी : अर्थव्यवस्थेला नवा आयाम

एचडीएफसी लिमिटेड ही संस्था बँकिंग क्षेत्रातील क्रमांक दोनच्या संस्थेत म्हणजे एचडीएफसी बँकेत विलीन होणार असल्याने मोठी आर्थिक ताकद निर्माण होणार आहे.

बाजार भांडवलीकरणाच्या दृष्टीने भारतातील तिसरी सर्वांत मोठी आर्थिक संस्था निर्माण करण्याच्या हेतूने एचडीएफसी ही तारण कर्जदार संस्था एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहे. विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँक 100 टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची असेल आणि एचडीएफसीचे सध्याचे भागधारक एचडीएफसी बँकेचे 41 टक्के मालक असतील. एचडीएफसी या बिगरबँकिंग कर्जदात्या कंपनीच्या प्रत्येक 25 समभागांच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे 42 भाग मिळतील. प्रस्तावित व्यवहारामुळे संबंधित भागधारक, ग्राहक, कर्मचारी यांसह विविध भागधारकांसाठी अर्थपूर्ण मूल्यनिर्मिती होईल.

कारण, व्यवसायाच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे सर्वसमावेशक प्रॉडक्ट ऑफरिंग, ताळेबंदाची लवचिकता आणि महसूलवृद्धीच्या संधींमध्ये समन्वय साधण्याची क्षमता या घटकांचा लाभ मिळेल, असे एचडीएफसीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. सध्याच्या भांडवल मूल्यानुसार प्रस्तावित एचडीएफसी बँक ही रिलायन्स इंडस्ट्रीजनंतरची दोन नंबरची कंपनी असेल. या विलीनीकरणामुळे बाजार भांडवल मूल्यानुसार एचडीएफसी बँक टाटा समूहाच्या टीसीएस या कंपनीला मागे टाकेल.

एचडीएफसीच्या उपकंपन्या आणि सहयोगी कंपन्याही एचडीएफसी बँकेत स्थानांतरित होतील. एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी गुंतवणूकदारांना सांगितले की, विलीनीकरण नियामक मंजुरीच्या अधीन असून, दोन्ही वित्तसंस्था समानतेच्या तत्त्वावर एकत्र येत आहेत. याचा सर्वाधिक फायदा ग्राहकांना होईल. एचडीएफसी बँकेचा ग्राहकवर्ग विस्तृत असून, त्याची संख्या 6.8 कोटी एवढी प्रचंड आहे.

या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर सुरुवातीच्या काही तासांत दोन्ही संस्थांच्या शेअर्सनी 10 टक्क्यांची उसळी घेतली. बीएसईवर एचडीएफसी बँकेचा शेअर 9.99 टक्क्यांनी वधारून 1656.90 रुपयांवर गेला. एचडीएफसी या तारण कर्जदात्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी वाढून 2696 रुपयांवर गेला. दोन दिग्गज वित्तसंस्थांच्या विलीनीकरणामुळे एचडीएफसी समूहाला बँकिंग प्लॅटफॉर्मअंतर्गत अत्यंत स्पर्धात्मक दरात गृहकर्ज पोर्टफोलिओ तयार करणे शक्य होईल.

विलीनीकरणामुळे 25.61 लाख कोटी रुपयांचा प्रचंड मोठा ताळेबंद असणारी संस्था अस्तित्वात येईल. देशात स्टेट बँकेचा ताळेबंद आजमितीस सर्वांत मोठा असून, तो 45.34 लाख कोटींचा आहे. एचडीएफसी बँक ही देशातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वांत मोठी बँक आहे. 31 मार्च 2021 पर्यंत एचडीएफसी बँकेचा ताळेबंद 17.74 लाख कोटी रुपयांचा आहे.

एचडीएफसी लिमिटेडच्या भारतातील सेवा केंद्रांची संख्या 445 आहे. प्रस्तावित विलीनीकरणामुळे बँकेचे असुरक्षित कर्जांचे प्रमाण कमी होईल. एक्सपोजर जास्त नसताना अधिक उत्पन्नामुळे बँक आपले क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जे आक्रमक पद्धतीने वाढवत होती. विलीन झालेली संस्था केवळ असुरक्षित कर्ज एक्सपोजरच कमी करणार नाही, तर अधिक कर्जे अंडरराईट करण्याची क्षमताही प्रदान करेल.

रेरा कायद्याची अंमलबजावणी, गृहनिर्माण क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा, सर्वांसाठी परवडणारी घरे यांसारखी अनेक पावले उचलली गेल्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रात वित्तपुरवठा करण्याचा व्यवसायही वृद्धिंगत होणे अपरिहार्य होते. बँका आणि बिगरबँकिंग वित्तसंस्थांच्या (एनबीएफसी) नियमांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सुसूत्रता दिसून येत होती. त्यामुळेही विलीनीकरणाची प्रक्रिया सुलभ होऊ शकली, असे एचडीएफसी लिमिटेडचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी सांगितले.

या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेतील पतवाढीचा वेग वाढणार असून, परवडणारी स्वस्त घरे उभारणार्‍या प्रकल्पांना चालना मिळणार आहे. एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेड या दोन्ही एचडीएफसीच्या उपकंपन्या एचडीएफसी बँकेत विलीन होणार आहेत. विलीनीकरणाची प्रक्रिया 2024 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीपर्यंत पूर्ण होणार आहे.

गृहनिर्माणाच्या क्षेत्रात बर्‍याच वर्षांचा अनुभव असलेली एचडीएफसी लिमिटेड ही संस्था बँकिंग क्षेत्रातील क्रमांक दोनच्या संस्थेत म्हणजे एचडीएफसी बँकेत विलीन होणे म्हणजे केवढी मोठी आर्थिक ताकद तयार होते, याचा अंदाज गुंतवणूक आणि बँकिंग क्षेत्रातील माहीतगारांना आहेच. या सर्व कारणांमुळे एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण आगामी काळात महत्त्वाचे आणि लाभदायक ठरणार आहे.

– संतोष घारे, सनदी लेखापाल

Back to top button