Russia Ukraine War : परराष्ट्र धोरणाची परीक्षा… | पुढारी

Russia Ukraine War : परराष्ट्र धोरणाची परीक्षा...

भारताचे रशियासोबतचे संबंध मजबूत आहेत. त्यामुळे युद्ध थांबविण्यासाठी भारताने सकारात्मक पावले उचलावीत, अशी ज्यो बायडेन यांची इच्छा आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनाही भारताकडून अपेक्षा आहेत. रशियाने भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील मतदानावेळी घेतलेल्या तटस्थ भूमिकेचे स्वागत केले आहे. अशा स्थितीत भारतासमोर दुहेरी कसरत करण्याची वेळ आली आहे.

युक्रेन आणि रशिया (Russia Ukraine War) यांच्या दरम्यानच्या युद्धाचे दहा दिवस उलटून गेले आहेत. अवघ्या तीन ते चार दिवसांत युक्रेनला गुडघे टेकायला लावू, असा विश्वास असलेल्या रशियासाठी लांबलेले युद्ध हा एक प्रकारचा धक्काच आहे. संतापलेल्या रशियाने युक्रेनमध्ये अक्षरशः हाहाकार उडविलेला आहे. या युद्धाच्या निमित्ताने भारतासारख्या सातत्याने अलिप्ततावादी धोरण स्वीकारणार्‍या देशांची मात्र मोठी कोंडी झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघात गेल्या काही दिवसांत रशियाच्या निषेधार्थ पाचवेळा मतदान झालेले आहे आणि या पाचही वेळच्या मतदानावेळी भारत अनुपस्थित राहिलेला आहे. थोडक्यात, कोणत्याही पक्षाची थेट बाजू घेणे भारताने टाळले आहे.

युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तथापि, तूर्तास तरी युद्धग्रस्त भागातून आपल्या नागरिकांची सुटका करण्याचे मुत्सद्दीपणाचे धोरण केंद्र सरकारने अवलंबलेले आहे. आतापर्यंतचे देशाचे परराष्ट्र धोरण संतुलित राहिले असून भविष्यातही साधकबाधक विचार करून देशाच्या नेतृत्वाला निर्णय घ्यावे लागणार आहेत.

भारताने घेतलेल्या भूमिकेची जोरदार चिकित्सा रशिया, युरोपियन देश आणि अमेरिकन धुरिणांकडून सुरू आहे. सध्याच्या स्थितीत रशिया किंवा युरोप अशा दोन्ही महासत्तांना थेट दुखावणे भारताला परवडणारे नाही. भारताचे रशियासोबतचे संबंध मजबूत आहेत. या पार्श्वभूमीवर युद्ध थांबविण्यासाठी भारताने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची इच्छा आहे.

तिकडे युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनादेखील भारताकडून अपेक्षा आहेत. रशियाने भारताकडे काहीही मागणी केलेली नाही; पण त्याचवेळी संयुक्त राष्ट्रसंघात घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे. अशा स्थितीत भारतासमोर दुहेरी कसरत करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, भारताचे कट्टर शत्रू असलेल्या चीन आणि पाकिस्तान यांनीदेखील युनोमध्ये मतदानावेळी गैरहजेरी लावत एक प्रकारे रशियाचे समर्थन केलेले आहे. चीनने तर युद्धाचे निमित्त साधत अमेरिका आणि युरोपियन देशांची निंदानालस्ती चालविलेली आहे.

चीनचे रशियासोबत धोरणात्मक संबंध आहेत. अलीकडील काळात अमेरिकेसोबत त्याचे वैमनस्यही आलेले आहे. याचमुळे सध्याचा काळ विस्तारवादी चीनसाठी अनुकूल ठरला आहे. याच बाबीमुळे भारताला आपल्या सीमांवर अतिशय सावध राहावे लागणार आहे. पाकिस्तानचा विचार केला, तर अमेरिकेची संगत सोडून पाकने रशियाला चुचकारणे सुरू केले आहे.

रशिया-भारत संबंधात वितुष्ट आणणे, हाही पाकच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे विसरता कामा नये. अमेरिकेने अफगाणिस्तानातून पलायन केल्यानंतर आशिया खंडात रशियाची भूमिका महत्त्वपूर्ण बनलेली आहे. अफगाणिस्तानावर अंकुश ठेवण्यासाठी रशियाचा वापर केला जाऊ शकतो, असाही पाकचा होरा आहे.

तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर देखील भारत-रशिया यांच्यातील संबंधात दुरावा आलेला नाही. रशियाने कित्येक कठीण समयी भारताला मदत केलेली आहे आणि त्याचमुळे रशियाला दुर्लक्षून कोणतीही भूमिका घेणे भारताच्या हिताविरोधात जाऊ शकते. हीच बाब लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या कठीण काळात समतोल भूमिका घेतली असल्याचे दिसून येते.

भारताला संरक्षण क्षेत्रात मजबूत करण्यात रशियाची खूप मोठी भूमिका आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या लष्करी साधनसामग्री खरेदीत विविधता आणलेली आहे. इस्रायल आणि फ्रान्स सारख्या देशांतून आता शस्त्रास्त्रांची खरेदी होत आहे; मात्र असे असले, तरी अजूनही भारताची बरीच भिस्त रशियावर आहे. तीनच महिन्यांआधी भारताने एके-203 कालाश्चनिकोव्ह असॉल्ट रायफल्सच्या देशांतर्गत निर्मितीसाठी करार केला होता.

उत्तर प्रदेशात अंतिम टप्प्यातले घमासान…

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान आज सोमवारी पार पडत आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांतील 54 मतदारसंघांत हे मतदान होणार असून एकूण 613 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान होत असलेल्या जिल्ह्यात आझमगड, मऊ, जौनपूर, गाजीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्जापूर, भदोही आणि सोनभद्र यांचा समावेश आहे. या टप्प्यात निवडणूक लढवीत असलेल्या 170 उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

महिला उमेदवारांची संख्या 75 इतकी असून कोट्यधीश उमेदवारांची संख्या 217 इतकी आहे. कोट्यधीश उमेदवारांमध्ये सर्वाधिक बसपाचे 41 उमेदवार आहेत. त्या खालोखाल भाजपचे 40, सपाचे 37, काँग्रेसचे 22 व आम आदमी पक्षाचे 15 उमेदवार कोट्यधीश आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने या भागातला सपाचा दबदबा मोडून काढला होता. त्यावेळी भाजपने 29 जागा, सपाने 11, तर बसपाने 6 जागा जिंकल्या होत्या. शिवाय भाजपच्या सहयोगी पक्षांनी 8 जागा जिंकल्या होत्या.

थोडक्यात, भाजप आघाडीच्या झोळीत 37 जागा गेल्या होत्या. यावेळी भाजपने 54 पैकी 48 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. अपना दल (एस) व निषाद पार्टीसाठी भाजपने प्रत्येकी तीन जागा सोडलेल्या आहेत. सपा 45 जागा लढवीत असून उर्वरित जागा पक्षाने सहयोगी पक्षांना दिल्या आहेत. अंतिम टप्प्यात बहुतांश मतदारसंघांत भाजप, सपा आणि बसपा असा तिरंगी मुकाबला आहे. आजचे मतदान पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष गुरुवारकडे लागेल. कारण, उत्तर प्रदेशच नव्हे, तर उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकालदेखील यादिवशी जाहीर केला जाणार आहे.

Back to top button