उत्तर प्रदेश निवडणूक : पहिल्या टप्प्यात घमासान | पुढारी

उत्तर प्रदेश निवडणूक : पहिल्या टप्प्यात घमासान

उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान पश्चिम उत्तर प्रदेशात भागात होत आहे. सपाचे नेते अखिलेश यादव आणि जाट समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रालोदचे नेते जयंत चौधरी यांच्या आघाडीने या भागात भाजपची वाट बिकट बनली आहे.

उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवारी आहे. देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशचे महत्त्व वेगळेच आहे आणि त्यामुळे राज्याच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात 58 विधानसभा मतदारसंघांत मतदान आहे. ज्या भागात हे मतदान आहे, तो भाग पश्चिम उत्तर प्रदेशात मोडतो. जाट समाजाचा दबदबा असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपसमोर सपा-राष्ट्रीय लोकदल आघाडीने आव्हान निर्माण केले आहे. 2013 साली पश्चिम उत्तर प्रदेशात जाट-मुस्लिम दंगल झाली होती. दंगलीत सहभागी असल्याचे आरोप अनेक भाजप नेत्यांवर झाले. त्यानंतर प्रत्येक निवडणुकांत लोकांनी भाजपला निवडून दिले. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही. उलट समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि जाट समाजाचे प्रतिनिधित्व करणारे जयंत चौधरी यांनी या निवडणुकीत आघाडी केल्याने या भागात भाजपची वाट बिकट बनली आहे.

सुधारित तीन कृषी कायद्यांना पंजाबनंतर सर्वाधिक विरोध पश्चिम उत्तर प्रदेशात झाला होता. कृषी कायद्यामुळे भाजपबद्दल असलेली नाराजी मतदानाद्वारे शेतकरी व्यक्त करणार काय, याबद्दल भाजपमध्ये धाकधूक आहे. जाट समाजाला पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपच्या धुरिणांना आटापिटा करावा लागत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काही दिवसांपूर्वी जाट समाजाच्या प्रमुख नेत्यांशी दिल्लीत चर्चा झाली. पश्चिम उत्तर प्रदेशातील आग्रा-अलिगड विभागात आठ मतदारसंघ आहेत तर मेरठ-सहारनपूर विभागात 18 मतदारसंघ आहेत. या दोन्ही ठिकाणी जाट समाजाचे प्राबल्य आहे.

शेतकर्‍यांमधील असंतोषाचा पुरेपूर फायदा घेण्याचा सपा-रालोदचा प्रयत्न आहे. जयंत यांनी दंगलीची आठवण ठेवावी आणि अखिलेश यांचा नाद सोडावा, अशी आवाहने भाजपने अनेकदा केली. मात्र जयंत चौधरी बधले नाहीत. शेतकरी आंदोलनाचा फायदा होण्याचा जयंत यांचा होरा आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील 17 जागांवर मुस्लिमांचा प्रभाव आहे. ही मते सपा, बसपा की काँग्रेसकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. गतवेळच्या तुलनेत यावेळी बसपाच्या मायावती आक्रमक प्रचारापासून दूर आहेत, याचेही लोकांतून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात या पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता. दंगलखोरांना मोकळे रान देणारे आणि नकली समाजवादी… अशी बोचरी टीका त्यांनी अखिलेश यांच्यावर केली. पश्चिम उत्तर प्रदेश हा ऊस पट्टा आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांची देणी न देणार्‍या कारखान्यांवर योगी आदित्यनाथ सरकारने कारवाई केली होती. त्याचा भाजपला फायदा होणार काय, हेदेखील पाहण्यासारखे आहे.

पंजाबमध्ये चन्नी यांची बिकट वाट

पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 तारखेला मतदान होत आहे. काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल, भाजप-अमरिंदर आघाडी आणि शेतकरी संघटनांनी तयार केलेली आघाडी अशी पंचरंगी लढत या राज्यात आहे. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचे भाचे भूपिंदर हनी यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. ‘केवळ हिंदू असल्यामुळे मुख्यमंत्री बनविले नाही’, असे सांगत काँग्रेसच्या सुनील जाखड यांनी खळबळ उडवून दिली. काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे हे लक्षण आहे. आपने खा. भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. शेतकरी आंदोलनामुळे राजकीय साठमारीत सर्वात पिछाडीवर शिरोमणी अकाली दल आहे. प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबीर बादल आणि त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांच्यावर पक्षाची सर्व जबाबदारी आहे. हरसिमरत यांचे बंधू बिक्रम मजिठिया यांच्यामुळे पक्ष अडचणीत आला आहे. अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली सध्या ते जामिनावर आहेत. त्यांची लढत नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी आहे.

  • श्रीराम जोशी

Back to top button