उत्तर कोरियाचे धक्कातंत्र | पुढारी

उत्तर कोरियाचे धक्कातंत्र

उत्तर कोरियाने नवीन वर्षात सलग दोनवेळा क्षेपणास्त्र चाचणी करून जगाला पुन्हा धक्का दिला आहे. जगात कोरोनाची लाट आलेली असताना किम जोंग उन मात्र संरक्षण सिद्धतेवर भर देत आहेत. देशाचे सैन्यबळ आणखी शक्तिशाली आणि सामर्थ्यवान करण्याकडे उत्तर कोरियाचा कल दिसून येत आहे.

आशिया खंडात उत्तर कोरिया आता अण्वस्त्रसज्ज देश झाला असून यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. अण्वस्त्रांचा विकास करणे हाच उत्तर कोरियाचा एक कलमी राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे. 2016 ते 2018 या काळात उत्तर कोरियाने 90 पेक्षा अधिक अणुचाचण्या केल्या आहेत. यामागे चीनचा अप्रत्यक्षपणे हात आहे आणि ही बाब कोणापासूनही लपून राहिलेली नाही. अणवस्त्र साधने, तंत्रज्ञानापासून सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम चीनकडून केले गेले आहे. उत्तर कोरियाने नवीन वर्षात सलग दोनदा क्षेपणास्त्र चाचणी करून जगाला पुन्हा धक्का दिला आहे. प्रारंभी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि नंतर हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी करत आपला अण्वस्त्र कार्यक्रम सुरूच राहील, असा इशारा उत्तर कोरियाने जगाला दिला आहे.

अर्थात, जागतिक दबाव असतानाही गेल्या वर्षभरात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीचे कार्यक्रम सुरूच ठेवले होते. गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात पहिली हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी करत त्यांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. विशेष म्हणजे, हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणीच्या वेळी कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन हे दस्तुरखुद्द हजर होते. एका अर्थाने अण्वस्त्र चाचणीच्या मुद्द्यावर अमेरिकेकडून वारंवार दिल्या जाणार्‍या इशार्‍याला किम जोंग उनदेखील त्याच भाषेत उत्तर देत होते. जागतिक रोष टाळण्यासाठी या चाचणीला किम जोंग उन यांनी अण्वस्त्र युद्धापासून बचाव असे पालुपद जोडले. यावरून आगामी काळातही उत्तर कोरियात क्षेपणास्त्र चाचण्या होऊ शकतात, असे संकेत मिळाले आहेत. जगात कोरोनाची लाट आलेली असताना किम जोंग उन मात्र संरक्षण सिद्धतेवर भर देत आहेत. देशाचे सैन्यबळ आणखी शक्तिशाली आणि सामर्थ्यवान करण्याकडे उत्तर कोरियाचा कल दिसून येत आहे.वास्तविक, उत्तर कोरियाची अनेक दशकांपासूनच्या स्थितीचे अवलोकन केल्यास तो एवढ्या प्रमाणात चाचण्याच घेऊ शकत नाही. उत्तर कोरियाचा वाद दक्षिण कोरिया आणि जपानशीदेखील आहे. हे दोन्ही देश अमेरिकेचे पाठीराखे असल्याने त्यांचे चीनशी असलेले वाददेखील सर्वश्रूत आहे. अमेरिका आणि चीन हे दोन टोकाचे देश म्हणून जागतिक राजकारणात नावारूपास आले आहेत. परिणामी, चीनने उत्तर कोरियाला सतत पाठिंबा दिला असून उ. कोरियाला सर्वोतोपरी मदत करण्याबाबत चीन नेहमीच सज्ज राहिला आहे.

एकंदरीत उत्तर कोरियाच्या अणुचाचण्या अप्रत्यक्षपणे चीनच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा भाग असून यातून अमेरिकेला इशारा दिल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात अण्वस्त्र चाचणी आणि निर्मिती हा मुद्दा संवेदनशील आणि वादग्रस्त आहे. आजच्या काळात अण्वस्त्रधारक देश हे दुसर्‍या देशाला अण्वस्त्रसज्ज होताना पाहू शकत नाहीत. त्यामुळे अण्वस्त्रांच्या जागतिक व्यवस्थेवर निवडक देशांचा अमल आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतदेखील अशाच देशांचा दबदबा आहे. अण्वस्त्रांची लाट रोखण्यासाठी काही जागतिक करार झाले आहेत; पण त्याच्यातही ठरावीकच देश सामील आहेत. प्रश्न असा आहे की, अमेरिका आणि रशियासारख्या देशांनाच अण्वस्त्र सज्ज राहण्याचा अधिकार आहे का? इराण आणि उत्तर कोरियासारख्या देशांनी अण्वस्त्रे बाळगू नयेत का? त्यामुळे अनेक देश छुप्या मार्गाने अण्वस्त्रे मिळवण्याचे आणि त्याच्या निर्मिती कामात गुंतलेले आहेत. आपल्या संरक्षणासाठी शस्त्र तयार करणे आणि त्याची चाचणी करणे हा सर्वांचा हक्कआहे. शेवटी उत्तर कोरिया किंवा अन्य देशांना अण्वस्त्रसज्जतेपासून रोखायचे असेल, तर जगातील सर्व देशांना अण्वस्त्राबाबत सुसंगत धोरण आखण्याबाबत विचार करावा लगेल. अन्यथा धोका वाढतच जाईल.

– रियाज इनामदार

Back to top button