आजचा अग्रलेख : आश्वासक वाटचाल! | पुढारी

आजचा अग्रलेख : आश्वासक वाटचाल!

कोरोना संकटकाळात अर्थव्यवस्था उतरणीला लागलेली असताना शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीचे निर्देशांक उच्चांकी पातळी कसे गाठत आहेत, हा विरोधाभासाचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.

गेल्या गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने बाजार बंद होताना अनुक्रमे 53158.85 आणि 15924.30 अंकांची उच्चांकी पातळी गाठून तेजीचे संकेत दिले. अशा वातावरणाचा फायदा घेऊन गुंतवणूक करावयाची की नाही, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम असल्यास नवल नाही. शेअर बाजारातील ही तेजी बुडबुडा ठरण्याची शक्यता असल्यामुळे सावधानता बाळगायला हवी, असा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला होता.

त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि स्वत: अभ्यास करून निर्णय घेणे हा उत्तम पर्याय. मुळात सेन्सेक्स हा अर्थव्यवस्थेचा बॅरोमीटर आहे का?, याविषयी मतमतांतरे आहेत. शेअर बाजाराचा मूळ स्वभाव हा कधीच अर्थव्यवस्थेप्रमाणे वाटचाल करण्याचा नसतो. दीर्घकालीन टप्प्यावर अर्थव्यवस्थेतील वाढ, कंपन्यांची आर्थिक कमाई याचा विचार त्यात केला जातो.

हा बाजार एकतर भावी काळात काय घडू शकेल, याचा विचार करणारा असतो किंवा किरकोळ घडामोडीने नैराश्यापोटी मंदीकडे झुकणाराही असतो. त्यात उद्या नेमके काय होईल, हे कोणालाच सांगता येत नाही. 1 जानेवारी 2020 रोजी सेन्सेक्स 41,306 अंकावर होता. पण, कोरोनामुळे लॉकडाऊन होण्याच्या एक दिवस आधी तो 23 मार्च 2020 रोजी 25,981 अंकापर्यंत खाली घसरला. त्या दिवशी एखाद्याने आपली बचत केलेली पुंजी शेअर बाजारात चांगल्या कंपन्यांत गुंतविली असती तर आज ही रक्कम दुपटीहून अधिक झाली असती.

या संकटकाळात कोणत्याही इतर गुंतवणुकीतून एवढा परतावा त्याला कधीच मिळाला नसता. जीडीपीचा उणे 7.3 टक्के दर असताना सेन्सेक्स 52 हजार अंकाच्या पुढे गेलेला होता. या विरोधाभासाचे कारण समजून घेण्यासाठी सेन्सेक्सच्या रचनेत आहे. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) 30 आघाडीच्या कंपन्यांच्या बाजारमूल्यातून सेन्सेक्सची रचना होते. या 30 कंपन्यांतील पहिल्या 10 कंपन्यांचा वाटा अख्ख्या सेन्सेक्समध्ये 70 टक्के आहे.

या कंपन्यांची आर्थिक संकटांना पेलण्याची ताकद प्रचंड असल्याने त्यांना त्यांच्या मर्जीच्या किमतीवर बाजारात व्यवहार करता येतात. त्यांच्यासाठी सारे जग बाजारपेठ असते. याउलट देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम अशा उद्योगांना आर्थिक आणि इतर समस्यांमुळे नाकीनऊ येतात. कारण, त्यांना बाजारपेठेसह अन्य मर्यादाही असतात. सेन्सेक्स हा या लक्षावधी लघुउद्योगांनी भरगच्च असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा निराळा असतो. याच कारणाने शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेच्या वाटचालीत ठळक विरोधाभास जाणवतो. त्यामुळे उच्चांकी सेन्सेक्सच्या मर्यादा लक्षात घेऊनच गुंतवणूक करणे संयुक्तिक.

या बाजारात कंपन्यांनी आर्थिक पुनर्रचना सुरू केली असून काहींनी कंपन्या कर्जमुक्त केल्या. त्यातून चालू आर्थिक वर्षापासून नफ्यात वाढ अपेक्षित आहे. सरकारी धोरणांच्या परिणामामुळेही शेअर बाजाराची सध्याच्या आर्थिक वास्तवापासून फारकत झाल्याचे चित्र निर्माण होते. उदाहरणार्थ सरकारने जैविक इंधनाला प्रोत्साहन देण्याचे दीर्घकालीन धोरण जाहीर केले. सन 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर करण्याचा सरकारचा इरादा आहे. ते लक्षात घेऊन डिस्टिलरी असलेल्या साखर कंपन्यांच्या शेअरचे दर 2 महिन्यांत दुप्पट झाले. सध्याच्या आर्थिक वास्तवाशी त्याचा संबंध नसला तरी भविष्याचा वेध घेऊन हा बाजार कशी वाटचाल करतो, हे यावरून कळेल.

चीनला पर्याय म्हणून भारतीय कंपन्यांकडे जगातील कंपन्या अपेक्षेने पाहत आहेत. संघटित क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना जीएसटीचे फायदे मिळाले असून असंघटित क्षेत्रातील छोट्या कंपन्यांवर त्या मात करू लागल्या आहेत. शेअर बाजारावर त्या सूचिबद्ध असल्याने त्यांच्या वाढीचे चित्र वाढलेल्या निर्देशांकात दिसते. याउलट छोट्या उद्योगांची स्थिती हलाखीची असल्याने अर्थव्यवस्था खरोखरच सावरत आहे का, असा प्रश्न त्यांना पडतो. या टोकाच्या फरकातून विरोधाभासाचे कारण कळू शकेल.

शेअर बाजार, म्युच्युअल फंड हे सध्याच्या महागाईच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठीचे पर्याय म्हणून पुढे येत आहेत. अद़ृश्य चलनवाढ जमेस धरली तर मुदत ठेवीवरील तुटपुंजे व्याजही बचतीच्या रकमेचे खरे मूल्य कमी करीत असते, याची जाणीव कित्येकांना नसते. कारण, आर्थिक निरक्षरता. वस्तुत: शेअर खरेदीच्या रूपाने संबंधित कंपनीच्या व्यवसायात आपण अल्पशी का होईना गुंतवणूक करून भागीदार झालेलो असतो.

कंपनी उत्तम चालून तिला नफा झाला की त्याचा लाभ भागीदार म्हणून आपल्यालाही मिळतो. शेअर बाय बॅक, लाभांश, बोनस शेअर्स, राईट इश्यू इत्यादीतून कंपनीही गुंतवणूकदारांना फायदा पोहोचवते. सध्याचे बाजारातील चित्र उत्साहवर्धक आहे. मोठ्या संख्येने आलेले आयपीओ, स्टार्ट अप कंपन्यांच्या आयपीओंना मिळालेला उदंड प्रतिसाद, भारतीय गुंतवणूकदारांना परदेशी कंपन्यांचे शेअर विकत घेण्याची संधी, निर्गुंतवणुकीमुळे खरेदीसाठीचे नवे पर्याय इत्यादी घडामोडींमुळे हा बाजार कोरोनातही घट्ट रुजत असल्याचे स्पष्ट होते.

भारतीय शेअर बाजारातील चालू वर्षातील आतापर्यंतचा परतावा 16.05 टक्के तर गेल्या वर्षातील परतावा 85.35 टक्के आहे. परताव्याच्या निकषावर भारताने जगात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. हे आणि इतर सर्व घटक या बाजाराच्या भावी वाटचालीविषयी विश्वासाचे वातावरण तयार करायला पूरकच ठरतील, हे नि:संशय.

Back to top button