

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सध्या नवनवीन रोमँटिक गीतांनी तरुणाईला भुरळ पाडली आहे. एकामागोमाग एक आलेल्या दिलबहार गाण्यांनी रसिक प्रेक्षकांना बेधुंद केले आहे. यातच भर घालत एक रोमँटिक कोळीगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाले आहे. डान्सिंग गर्ल म्हणून व्हायरल झालेली सलोनी सातपुते आणि डीआयडी फेम दीपक हुलसुरे 'पैंजण तुझं' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. सलोनी सातपुते तिच्या हॉट लूकमुळे प्रसिध्द आहे.
'पीबीए म्युझिक'अंतर्गत असलेले हे कोळीगीत प्रेक्षकांनाही थिरकायला लावणार आहे. पीबीए म्युझिकने या आधीही 'विठ्ठला विठ्ठला', 'नखरा', 'हे गणराया' या गाण्यातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. यात भर घालत पीबीए म्युझिकचे 'पैंजण तुझं' हे नवे रोमँटिक कोळीगीतही प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास सज्ज झाले आहे.
प्रेयसीच्या पैंजणाच्या आवाजावर प्रियकराने नकळतपणे धरलेल्या ठेक्याचे वर्णन यातून केले आहे. या गाण्याला अभिराम यांनी संगीत दिले आहेत. गाण्याचे बोल अक्षय जोशी लिखित आहेत. प्रेम धीरल यांचा स्वरसाज चढवला आहे. दिग्दर्शनाची धुरा मुकुंद राऊत यांनी सांभाळलीय.
क्रिएटिव्ह हेड म्हणून वैभव लोंढे याने उत्तम कामगिरी पार पाडली आहे. तर निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव यांच्या पीबीए फिल्म्स अँड म्युझिक निर्मित हे गाणे आहे.
कोळीगीतांची धमाल या गाण्यातून नक्की अनुभवायला मिळणार आहे याची शंकाच नाही.
या गाण्यात सलोनीचा हॉट लूक पाहायला मिळणार आहे. चाहते तिच्या या लूकला आणि तिच्या दमदार नृत्याला नक्कीच भरभरून प्रतिसाद देतील. तिचा हा दमदार परफॉर्मन्स पाहणे प्रेक्षकांनाही रंजक ठरेल. या गाण्याचे चित्रीकरण पुण्यात नव्यानेच तयार झालेल्या 'पीबीए फिल्मसिटी' येथे पार पडले.