पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्याचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असे नाही तर लहान मुलांमध्येही आता हे आजार दिसून येत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत घरातच बसून राहावे लागत असल्याने, शारीरिक हालचाल मंदावल्याने आणि तासन्तास कॉम्प्युटरसमोर बसून ऑनलाईन अभ्यास करावा लागत असल्याने अनेक लहान मुले सध्या सांधेदुखी व मणक्याच्या विकाराने त्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
8 ते 20 वयोगटातील मुले आणि 25-50 वयोगटातील प्रौढ व्यक्ती पाठदुखीच्या समस्येने पीडित आहेत, असे डॉक्टर सांगत आहेत. कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळेला एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला आहे.
त्यामुळे शारीरिक हालचाली मंदावल्याने अनेकांना मणक्याच्या वेदना जाणवत आहेत. जास्त काळ एकाच ठिकाणी बसून राहणे, बदलती जीवनशैली, पौष्टिक आहाराचा अभाव ही या मागील मुख्य कारणे आहेत.
कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी बरेचजण घरूनच ऑफिसचे काम करीत आहेत. परंतु, बसण्याच्या योग्य पद्धतीकरिता आवश्यक खुर्च्यांचा अभाव असणे, शारीरिक हालचालीच्या अभावामुळे पाठदुखीसारख्या समस्या भेडसावत असलेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
वर्क फ्रॉम होममुळे वाढलेला स्क्रिन टाईम, तासन्तास टीव्ही पाहणे हेदेखील पाठदुखीचे कारण ठरू शकते. पाठीचा त्रास असणार्यांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनू लागली आहे. दुसर्या लाटेनंतर अवघ्या सहा महिन्यांतच 8 ते 20 वर्षे वयोगटातील पाठदुखीच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर, 25 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये चारपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
म्हनूनच जास्त तास अंथरुणावर विश्रांती घेऊ नका. कारण, त्यामुळे शरीर कडक होऊ शकते. अधेमध्ये उठणे, उभे राहणे आणि खालच्या पाठदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी ताणणे हे गरजेचे आहे.
पाठीचे दुखणे कमी करण्यासाठी मुले आणि प्रौढांनी कोल्ड कॉम्प्रेसची निवड करावी. शर्करायुक्त, प्रक्रिया केलेले आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळावे. ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खायला हवे. पाठदुखी कमी करण्यासाठी आहारात कांदा, बेरी, आले, हळद आणि लसूण यांचा समावेश करावा.
ऑनलाईन अभ्यास आणि ऑफिसचे काम करताना योग्य जागेची निवड करावी. शक्यतो डेस्क किंवा खुर्चीचा वापर करावा. पाठ दुखत असल्यास जड वस्तू उचलणे टाळा. याशिवाय ताप किंवा हात-पायात कमजोरी जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.