पुणे क्राईम : खूनाची बातमी देणारेच निघाले खूनी - पुढारी

पुणे क्राईम : खूनाची बातमी देणारेच निघाले खूनी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कानून के हाथ लंबे होते है, असे नेहमीच म्हटले जाते. मात्र हे वाक्य शिवाजीनगर पोलिसांनी प्रत्यक्षात खरे करून दाखविले आहे. खून झालेल्या व्यक्तीचा कोणताही पुरावा हाती नसताना पोलिसांनी खूनाचा छडा (पुणे क्राईम) लावत दोघांना अटक केली आहे.

महेश शिवाजी देव उर्फ तंबी (वय-३०, रा. खुडे ब्रिजजवळ, शिवाजीनगर) आणि आकाश प्रकाश यादव (वय-३३, वर्ष रा. शनिवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. दोघे आरोपी भंगार गोळा करण्याचे काम करतात. दोघांनाही दारुचे व्यसन आहे. रात्री अपरात्री दारू पिण्यासाठी त्यांनी अनेकांना लुटले असल्याचा पोलिसांना अंदाज आहे.

खून झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. ९ सप्टेंबर रोजी रात्रीच्यावेळी दोघांनी ४० वर्षीय व्यक्तीला दारुच्या बाटलीसाठी कात्री आणि दगडाने मारून खून केला होता. त्यानंतर खूनाची माहितीदेखील आरोपींनी पोलिसांना दिली होती.

खून झालेलेल्या व्यक्तीची ओळख पटवून आरोपींना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. मात्र खून करणारा व्यक्ती काही तरी पुरावा मागे ठेवतोच. त्याने कितीही गुन्ह्यातून वाचण्याचा बनाव केला तरी तो पोलिसांच्या तावडीतून सुटू शकत नाही. कात्री आणि दगड याने मारले.च

शिवाजीनगर परिसरातील खुडे ब्रिजखाली नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता. सुरुवातीला याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अहवालावरून संबंधीत व्यक्तीचा खून झाल्याचे समोर आले. त्यानुसार शिवाजीगनर पोलीस ठाण्यात अर्जुन नाईकवाडे (वय-२८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर आरोपींचा शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी तब्बल २५५ सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले, एवढेच नाही तर परिसरातील परिसरातील कचरावेचक, भंगारवाले, भिख मागणारे अशा ७० ते ७५ व्यक्तींकडे चौकशी केली. तरीदेखील पोलिसांच्या हाती खून्याचे धागेदोरे लागत नव्हते.

गुन्ह्याचा तपास अधिकच किचकट होत चालला होता. उपनिरीक्षक क्षीरसागर यांना हा खून दोन गर्दुल्यांनी केला असल्याची माहिती मिळाली. दोघांनी अज्ञात व्यक्तीचा खून करत असाताना एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला होता. त्याने याची माहिती क्षीरसागर यांना दिली.  त्यानुसार त्यांनी महेश देव उर्फ तंबी  व त्याचा साथीदार आकाश यादव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासत दोघांनी खूनची कबूली दिली.

ही कामगिरी  पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, गुन्हे निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, अर्जुन नाईकवाडे, कर्मचारी अविनाश भिवरे, रणजित फडतरे, बशिर सय्यद, रुपेश वाघमारे यांच्या पथकाने केली.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (पुणे क्राईम) म्हणाल्या की, “अज्ञात व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. बातमीदार, तांत्रिकविश्लेषण व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे पोलिसांनी तपास करून काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यावेळी दररोज परिसरात फिरणार्‍या कचरा वेचणार्‍या काही व्यक्ती दिसून येत नाहीत हे समोर आले. त्यानुसार तपास करत असाताना एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्याची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.”

Back to top button