अखेर सोलापूर शहरात लॉकडाऊन अंशतः शिथिल! काय चालू आणि काय बंद राहणार? | पुढारी

अखेर सोलापूर शहरात लॉकडाऊन अंशतः शिथिल! काय चालू आणि काय बंद राहणार?

सोलापूर; पुढारी वृत्‍तसेवा : कोरोना आपत्तीमुळे गेल्‍या दीड महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात कडक लॉकडान करण्यात आला होता. यामुळे व्यापारी आक्रमक झाले होते. शहरातील व्यापारी- लोकप्रतिनिधींच्या रेट्यामुळे आजपासून (ता.4) अनलॉक करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी गुरुवारी रात्री घेतला. या अंतर्गत कोविडविषयक निर्बंधांमध्ये अंशत: शिथिलता मिळणार असून, सर्व दुकाने, बाजारपेठा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अधिक वाचा : अशोक सराफ यांना मामा नाव कसे पडलं?

शहरातील लॉकडाऊन उठविण्या संदर्भात गुरूवारी सायंकाळी शासनाने महापालिकेस स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली. या संदर्भातील पत्र शासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख या नात्याने प्राप्त झाले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढील आवश्‍यक सोपस्कर झाल्यानंतर शासन निर्देशातील नियम-अटींना अधीन राहून महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी रात्री सव्वाअकरा वाजता शहर अनलॉक संदर्भातील आदेश काढले.

यानुसार शहरातील अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत आठवड्यातील सर्व दिवस सुरू ठेवण्यास तर, अत्यावश्‍यक सेवेत न मोडणारी दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांतील मालक व कामगारांना कोविड चाचणी वा लसीकरण बंधनकारक आहे. बँकांच्या कामकाजाची वेळ देखील सात ते दोनपर्यंत राहणार आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट हे पार्सल सेवेसाठी सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तर, दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत त्यांना घरपोच सेवा देण्यास परवानगी राहणार आहे.

अधिक वाचा : मान्सून केरळात दाखल

ई-कॉमर्सअंतर्गत अत्यावश्‍यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्‍यक व्यतिरिक्त वस्तूंची घरपोच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवता येणार आहेत. कृषी संबंधित दुकाने तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सातही दिवस सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू राहतील. यंत्रमाग, गारमेंट, विडी हे उद्योग, मद्य विक्रीची तसेच रेशन दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या उद्योगातील कामगारांना कोविड चाचणी व लसीकरण सक्तीचे असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन, भारतीय दंड संहिता व अन्य कायद्यातील कलमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.

अधिक वाचा : पाच टप्प्यांत महाराष्ट्र हाेणार ‘अन्लॉक’

आदेशातील ठळक गोष्टी पुढीलप्रमाणे…

– बिगर अत्यावश्‍यक सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत उघडणार

– विडी, यंत्रमाग, गारमेंट उद्योग दुपारी दोनपर्यंत सुरू राहणार

– मद्य विक्री, रेशन दुकानांनाही दोनपर्यंत मुभा

– बँकांच्या कामकाजाची वेळ सात ते दोनपर्यंत 

– हॉटेलविषयक घरपोच पार्सल सेवा दोन ते आठपर्यंत 

– अत्यावश्‍यक कारणाशिवाय दुपारी तीननंतर नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई असणार आहे.

Back to top button