सांगली जिल्हा ऑक्सिजनबाबत होणार स्वयंपूर्ण | पुढारी

सांगली जिल्हा ऑक्सिजनबाबत होणार स्वयंपूर्ण

सांगली : शशिकांत शिंदे

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात दहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  यामध्ये  हवेतून ऑक्सीजन  घेऊन तो रुग्णांना पुरवण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदाही यापूर्वीच मागविण्यात आल्या आहेत.

रुग्णालयांकडून  ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना सरकार, प्रशासन, रुग्णांचे नातेवाईक यांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक रुग्णांचा मृत्यू झाला.कर्नाटक सरकारने आपल्याला होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबल्यानंतर तर मोठा गोंधळ उडाला. 

त्यामुळे प्रशासनाने  रुग्णालयांमध्ये स्वतःचे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे.   येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात एक, मिरज सिव्हिल रुग्णालयात दोन त्याशिवाय जिल्ह्यात इतर  7 ठिकाणी निर्मिती केंद्र उभारण्यात येत आहे.  त्यामध्ये पलूस, कडेगाव, विटा, आटपाडी, माडग्याळ, जत, कवठेमहांकाळ येथील केंद्रांचा समावेश आहे.  विशेष म्हणजे  पुरवठादारांकडून  प्रती लिटर  खर्चाशी तुलना केली तर त्यांच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा अधिक कमी दराने या प्रकल्पांमधून ऑक्सीजन निर्मिती होणार आहे.  हे प्रकल्प किमान 15 वर्षे ते कमाल 30 वर्षे  चालतील. त्यामुळे सरकारच्या खर्चात बचत होणार आहे.

जिल्ह्यातील दहा केंद्रांतून  646 जंम्बो सिलेंडर ऑक्सीजनची निर्मिती होणार आहे.  त्यामुळे याबाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होणार आहे. कोरोना संसर्गाच्या आणखी काही लाटा येतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तशी वेळ आल्यास हा ऑक्सिजन उपयुक्त ठरणार आहे.

आमदार सुधीर गाडगीळ, सावंत यांची मदत

कोरोना संसर्गामुळे ऑक्सिजनचे महत्व सर्वांच्या  लक्षात आले आहे. त्यामुळेत्याच्या निमिर्तीसाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. आमदार सुधीर गाडगीळ यांनी येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्या फंडातून 74 लाख 41 हजारांची तरतूद केली. त्यातून 125 जम्बो सिलेंडर प्राणवायू तयार होणार आहे. आमदार विक्रम सावंत यांनी 47 लाख 32 हजार रुपये त्यांच्या फंडातून दिले. त्यातून 31 जम्बो सिलेंडर प्राणवायू तयार होणार आहे. त्याशिवाय इतर  केंद्रांसाठी  जिल्हा नियोजनच्या फंडातून तरतूद केली आहे.

असा तयार होणार ऑक्सिजन

वातावरणातील हवा शोषून रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करताना  संयंत्रांमध्ये योग्य दाबाने हवा संकलित  केली जाते. त्यानंतर ती हवा शुद्ध   करण्यात येते. त्यामुळे हवेतील अशुद्ध घटक (धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्म कण) गाळून वेगळे केले जातात. या प्रक्रियेनंतर उपलब्ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्सिजन जनरेटर’मध्ये संकलित केली जाते.  या शुद्ध हवेतून नायट्रोजन व ऑक्सिजन हे दोन्ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्यात आलेला ऑक्सिजन अर्थात प्राणवायू हा योग्य दाबासह स्वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो वाहिन्या/पाईपद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवला जातो.

ऑक्सिजनला अचानक मोठ्या प्रमाणात मागणी  वाढली. त्यामुळे  तो उपलब्ध करताना अनेक अडचणी आल्या. यापुढे अशी वेळ येऊ नये, यासाठी ऑक्सिजन निर्मिती केंद्रांची युद्ध पातळीवर उभारणी सुरू आहे. या केंद्राचे काम लवकर पूर्ण होऊन  ऑक्सीजन उपलब्ध होणार आहे. 
डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली. 

Back to top button