प्रदीप शर्मा : गुन्हेगारांचा कदर्नकाळ ते कटातील आरोपी | पुढारी

प्रदीप शर्मा : गुन्हेगारांचा कदर्नकाळ ते कटातील आरोपी

ठाणे : नरेंद्र राठोड 

एखाद्या राजकीय नेता अथवा चित्रपट अभिनेत्यांच्या तोडीस तोड वलय निर्माण करणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एनआयएकडून अटक करण्यात आली. हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन वाझे यास एनआयए पथकाने अटक केल्यानंतर शर्मा यांच्यावर संशयाची सुई गेली होती. शर्मा हेच वाझेचे कर्ताकरविता आहेत असा देखील आरोप होत होता. शर्मा यांचा पोलीस खात्यातील एकूणच प्रवास धडाकेबाज आणि वादग्रस्त असाच राहिला.

1983 साली राज्य पोलिस सेवेत रूजू झालेल्या प्रदीप शर्मा यांनी मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत असतांना अनेक धडाकेबाज कारवाया करून एन्काऊंटर स्पेशालिस्ट ठरले. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील ’लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांसह तब्बल 100 हुन अधिक अट्टल गुन्हेगारांचा एन्काऊंटर केला आहे. मात्र 2006 मध्ये झालेल्या रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या यांच्या  एन्काऊंटर प्रकरणात शर्मा यांचे नाव वादग्रस्त ठरले. याच प्रकरणातून 2013 साली मुंबई उच्च न्यायालयाने शर्मा यांची सर्व आरोपातून मुक्तता केली. 

एका सध्या कौलारू जागेत असलेले ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात प्रवेश करताच शर्मा यांनी या कार्यालयाचे सारे स्वरूपच बदलून टाकले होते. या कार्यालयाला चारही बाजूने इतकी मजबूत तटबंदी उभारण्यात आली की आत काय कट शिजतोय याची साधी कुणकुण देखील बाहेर जाऊ शकत नव्हती. या कार्यालयाबाहेर मर्सिडीज, ओडी, रेंज रोव्हर अशा आलिशान गाड्यांचा कायम राबता असायचा. त्यावरूनच या कार्यालयात पोलीस कारवाई व्यतिरिक्त देखील अनेक कारनामे घडत असावे असे अनेकांना समजून चुकले होते. याच खंडणी विरोधी कार्यालयात सचिन वाझे, विनायक शिंदे अशा वादग्रस्त माजी पोलिसांची नेहमी उठबस सुरू असायची.

2018 मध्ये प्रदीप शर्मा यांनी पीएस फाऊंडेशन स्थापन केले.  या फाऊंडेशनच्या माध्यमातून अंधेरी परिसरात तब्बल 25 हजार महिलांना कपडे आणि धान्य वाटप केले होते. रक्षाबंधननिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. 

मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात शर्मांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे ते याच परिसरातून निवडणूक लढवतील असे बोलले जात होते. जुलै 2019 मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचा राजीनामा देऊन त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. मात्र अंधेरी पूर्वेतून शर्मा यांना तिकीट मिळाले नाही. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपारा येथून विधानसभा निवडणुकीत लढवली. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

 

Back to top button