नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी सौम्य वाढ नोंदवण्यात आली. गेल्या एका दिवसात ७ हजार ४९५ कोरोनाबाधितांची भर पडली.तर,४३४ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान ६ हजार ९६० रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. गुरुवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.४० टक्के नोंदवण्यात आला.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ३ कोटी ४७ लाख ६५ हजार ९७६ पर्यंत पोहचली आहे. यातील ३ कोटी ४२ लाख ८ हजार ९२६ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे.तर, सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ७८ हजार २९१ पर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत ४ लाख ७८ हजार ७५९ रूग्णांचा मृत्यू झाला.
गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत १०१ ने वाढ नोंदवण्यात आली. गुरुवारी देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.६२ टक्के,तर आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ०.५९ टक्के नोंदवण्यात आला.देशात आतापर्यंत १३९.७० कोटी डोस देण्यात आले आहेत. बुधवारी ७० लाखांहून अधिक डोस देण्यात आले.
केंद्र सरकारने राज्य, केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १ अब्ज ४७ कोटी ४८ लाख ८० हजार ६३५ डोस पुरवले आहेत. यातील १८ कोटी १२ लाख ७० हजार ७६ डोस अद्यापही राज्य,केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ६६ कोटी ८६ लाख ४३ हजार ९२९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. यातील १२ लाख ५ हजार ७७५ कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
देशात आतापर्यंत २३६ ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत.सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित ६५ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तर दिल्ली ६४ आणि तेलंगणामध्ये २४ रुग्ण आढळले आहेत. देशातील जवळपास ९६ कोटी ६३ लाख ५०६ आरोग्य कर्मचार्यांचे संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे.तर, फ्रंटलाईन कर्मचार्यांचे १ कोटी ६८ लाख ३ हजार २५ संपूर्ण लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचलं का?