लंडन; पुढारी ऑनलाईन डेस्क
COVID-19 : कोरोनाच्या ओमायक्रॉनचं (omicron) संकट जगभरात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये केलेल्या नवीन काही अभ्यासातून ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टा पेक्षा सौम्य असू शकतो, असे संकेत देण्यात आले आहेत. पण ओमायक्रॉन डेल्टा पेक्षा जास्त वेगाने पसरते, यावरही शास्त्रज्ञांनी जोर दिलाय.
ओमायक्रॉनबाबत नुकताच एक नवीन अभ्यास अहवाल प्रसिद्ध झाला. या नवीन अभ्यासाने आधीच्या संशोधनाला पुष्टी दिली आहे. ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंट इतका हानिकारक असू शकत नाही, असे वँडरबिल्ट युनिव्हर्सिटीचे बायोकेमिस्ट मॅन्युएल अस्कानो यांनी म्हटले आहे. मॅन्युएल अस्कानो विविध व्हायरसचा अभ्यास करत आहेत.
इंपिरियल कॉलेज लंडनच्या कोविड-१९ रिस्पॉन्स टीमच्या विश्लेषणानुसार ब्रिटनमधील ओमायक्रॉन (omicron) प्रकरणे लक्षात घेता डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनने संक्रमित रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची शक्यता २० टक्क्यांनी कमी आहे. या विश्लेषणामध्ये ब्रिटनमधील डिसेंबरच्या पंधरवड्यात पीसीआर चाचण्यांमधून आढळून आलेल्या कोविड-१९ च्या (COVID-19) सर्व प्रकरणांचा समावेश आहे. त्यात ओमायक्रॉनचे ५६ हजार रुग्ण आणि डेल्टाचे २ लाख ६९ हजार रुग्ण आहेत.
स्कॉटलंडमधील एडिनबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासाच्या आधारे, डेल्टा पेक्षा ओमायक्रॉन मुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका दोन तृतीयांश कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान, स्कॉटलंडमधील सुमारे २४ हजार ओमायक्रॉन रुग्ण हे प्रामुख्याने २० ते ३९ वयोगटातील आहेत. पण या सर्व निष्कर्षांचा अद्याप अन्य तज्ज्ञांकडून आढावा घेण्यात आलेला नाही.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं (Omicron variant) जगभरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केलीय. या व्हेरियंटच्या धास्तीने अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांवर निर्बंध घातलेत. अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलाय. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी, ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे घाबरण्याचे कारण नसून हा अति सौम्य स्वरुपाचा (super mild) व्हेरियंट असल्याचे म्हटलंय.
हे ही वाचा :