Corona Delta variant : ‘डेल्‍टा’विरोधात कोव्हिशिल्डची प्रतिकारशक्ती ३ महिन्यांपुरतीच? : संशाेधकांचा निष्कर्ष | पुढारी

Corona Delta variant : 'डेल्‍टा'विरोधात कोव्हिशिल्डची प्रतिकारशक्ती ३ महिन्यांपुरतीच? : संशाेधकांचा निष्कर्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोव्हिशिल्ड व्हॅक्सिनमुळे कोरोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटविरोधात ( Delta variant )  निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ३ महिन्यानंतर कमी होत जाते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या संदर्भातील रिसर्च पेपर लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. स्कॉटलँड आणि ब्राझिलमधील अभ्यासांवर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कोव्हिशिल्डचे दोन डोस आणि कोरोनाची तीव्रता यांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला.

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लस प्रामुख्याने देण्यात आल्या आहेत. याशिवाय इतरही अनेक देशांत कोव्हिशिल्ड ही कोरानाविरोधात प्रमुख लस आहे. त्यामुळे हे निष्कर्ष महत्त्वाचे मानले जात आहेत.

Delta variant : कोव्हिशिल्ड लस घेतलेल्‍यांना  बुस्टर डोस देण्याचा विचार व्हावा

कोव्हिशिल्ड लस दिलेल्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा विचार व्हावा, असंही या संशोधकांनी म्हटलेले आहे. ग्लासगो विद्यापीठाचे प्राध्यापक श्रीनिवास विठ्ठल कटिकिरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले आहे. स्कॉटलँडमधील कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्या १९ लाख ७२ हजार ४५४ इतक्या नागरिकांचा तर ब्राझिलमधील कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतलेल्या ४ काेटी २५ लाख ५८ हजार ८३९ इतक्या नागरिकांचा यात अभ्यास करण्यात आला.

मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेल्या देशांत कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. याचे कारण म्हणजे एक तर नवे व्हॅरिएंट हे आहे किंवा लशींचा प्रभाव कमी होत जाणे हे आहे, असे संशोधनात म्हटलेले आहे. या संशोधनात ओमायक्रॉनबद्दल कोणताही उल्लेख नाही.कोव्हिशिल्डची लस बनवण्यासाठी DNAत बदल करण्यात आले आहेत. या प्रकारच्या व्हॅक्सिनमुळे मोठ्या प्रमाणावर निर्मिती करता येणं शक्य होतं.

हेही वाचा

Back to top button