

काँग्रेस वर्किंग कमिटीची ( सीडब्ल्यूसी ) बैठक १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. दसरा सणानंतर दुसर्या दिवशी होणार्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ( सीडब्ल्यूसी ) बैठकीचे आयोजन काँग्रेस मुख्यालयात करण्यात आले आहे.
पंजाब आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पक्ष नेत्यांमध्ये असंतोष वाढला असताना ही बेठक होत आहे. तसेच जी-२३ समितीनेही या बैठकीची मागणी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. राजकीय अस्थिरता, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी आणि पक्षाच्या कायमस्वरुपी अध्यक्षपदाचा मुद्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्ष असावा, अशी मागणी मागील काही दिवसांपासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून होत आहे.
१६ रोजी होणार्या बैठकीत अध्यक्षपदावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील दीड वर्ष कोरोना महामारीमुळे अध्यक्षपदासंदर्भात निर्णय झालेला नाही. जी-२३ चे सदस्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी 'सीडब्ल्यूसी' बैठक घेण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्राव्दारे केली होती.
ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटलं होते की, आमच्या पक्षाला अध्यक्ष नाही. या विधानानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिब्बल यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली होती. पक्षाने सिब्बल यांची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अशा प्रकारे पक्षाचा अवमान करु नये, असे पक्षाचे महासचिव अजय माकन यांनी म्हटलं होतं.
पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पक्षातंर्गत निवडणुका या लांबणीवर पडतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या ( सीडब्ल्यूसी ) बैठकीतच होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.