नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: सोयाबीन दर चढउतारावरून आरोप- प्रत्यारोप सुरू असताना शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडे सोया पेंड आयात करण्याबाबत कुठलाही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिले आहे.
मागील हंगामात सोयाबीनचे दर १० हजारांवर गेले होते. त्यानंतर ते उतरून ६ हजारवर आले होते. त्यावेळी सोयापेंड आयातीचा मुद्दा वर आला होता. याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल यांनी गोयल यांची भेट घेऊन सोयापेंड आयात करू नये, अशी मागणी केली. यावेळी गोयल यांनी असा कुठलाही प्रस्ताव नाही, असे सांगितले.
देशात महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. सोयाबीनपासून पोल्ट्री साठी वापरले जाणारे खाद्य तयार केले जाते. हे खाद्य भारतात तयार केले जाते. सोयाबीनचे दर वाढल्याने खाद्याच्या दरावरही परिणाम झाला. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या मागणीनुसार १२ लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी साडे सहा लाख मेट्रिक टन सोया पेंड आयात झाली आहे.
उर्वरित सोया पेंड आयात करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा मुद्दा रस्त्यापासून ते संसदेपर्यंत तापला होता. खासदार अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा संसदेत मांडून सोयापेंड आयात करू नये, अशी मागणी केली. तसेच पाशा पटेल यांनीही पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान याबाबत वाणिज्य मंत्री गोयल यांच्याशी चर्चा केली. यावेळी गोयल यांनी असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे सांगितले. केंद्र सरकारने जर सोयापेंड आयात केली नाही तरच सोयाबीनचे दर वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचलं का?