पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगास सोमवारी (दि.6) पाठविण्यात आला आहे.
त्यावर मंजुरी देऊन हरकती व सूचना तसेच, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार यांची उत्सुकता लागली आहे. नव्या रचनेत एकूण 46 प्रभाग आणि 139 नगरसेवक असणार आहेत.
महापालिकेच्या 25 अधिकार्यांच्या समितीमार्फत जीएसआय (जिऑग्रॉफीक इन्फॉर्मेशन सिस्टीम) प्रणालीद्वारे प्रभाग रचनेचे काम शनिवारी (दि.4) पूर्ण झाले.
एकूण 139 जागांसाठी एकूण 46 प्रभाग आहेत. त्यात 1 प्रभाग 4 सदस्यांचा असणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 11 नगरसेवक वाढणार आहेत.
सन 2011 च्या 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जातीचे 2 लाख 73 हजार 810 आणि अनुसूचित जमातीचे 36 हजार 535 लोकसंख्या आहे.
लोकसंख्येनुसार शहरात एकूण 3 हजार 102 प्रगणक गट (ब्लॉक) आहेत. ते गट न फोडता प्रभाग रचना करण्यात आली आहे.
एका प्रभागात कमाल 41 हजार व किमान 33 हजार 559 लोकसंख्येनुसार सरासरी 37 हजार 288 लोकसंख्या असेल.
प्रभागरचनेचा आराखडा 30 नोव्हेंबरऐवजी 6 डिसेंबरला पाठविण्याचे सुधारित आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने आराखडा पाठविला आहे.
आराखडा असलेला पेन ड्राईव्ह सील करून मुंबईतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सादर करण्यात आला आहे.
प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. तो आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.
आयोगाकडून जशा सूचना येतील त्याप्रमाणे महापालिका अंमलबजावणी करेल,असे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.