Market Capitalisation BSE | बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलरवर | पुढारी

Market Capitalisation BSE | बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलरवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी (दि.२१) आणखी एक इतिहास रचला. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने (Market Capitalisation BSE) प्रथमच विक्रमी ५ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला. विशेष म्हणजे एकूण बाजार भांडवलात वर्षाच्या सुरूवातीपासून ६३३ अब्ज डॉलर वाढ झाली आहे.

सर्व बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ५ ट्रिलियन डॉलर किंवा सुमारे ४१६.४६ ट्रिलियन झाले आहे. सेन्सेक्स निर्देशांक सध्या सर्वकालीन उच्चांकाच्या १.६६ टक्क्यांनी खाली राहिला असला तरी, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी नवा उच्चांक गाठला आहे.

बाजार भांडवलाचा प्रवास

नोव्हेंबर २०२३ मध्ये BSE सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते. आता केवळ सहा महिन्यांत ते ५ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. BSE-सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने मे २००७ मध्ये १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला होता. त्यानंतर एका दशकात ते दुप्पट होऊन जुलै २०१७ मध्ये २ ट्रिलियन डॉलर झाले आणि मे २०२१ मध्ये बाजार भांडवलाने ३ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला.

चीन शेअर बाजाराच्या भांडवलात घसरण

सध्या जगभरातील केवळ चार शेअर बाजार ५ ट्रिलियन डॉलर प्लस क्लबमध्ये आहेत. अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँग येथील बाजारांचा यात समावेश आहे. अमेरिकेचा शेअर बाजार जवळपास ५५.६५ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवलासह आघाडीवर आहे. त्यानंतर चीन (९.४ ट्रिलियन डॉलर), जपान (६.४२ ट्रिलियन डॉलर) आणि हाँगकाँग (५.४७ ट्रिलियन डॉलर) यांचा क्रमांक लागतो. ब्लूमबर्गच्या मते, २०२४ मध्ये आतापर्यंत भारताच्या शेअर बाजाराचे भांडवल जवळपास १२ टक्क्यांनी वाढले आहे. तर अमेरिकेच्या बाजार भांडवलात १० टक्क्यांची वाढ झाली आहे. हाँगकाँगचे भांडवल १६ टक्क्यांनी वाढले आहे. तर चीन आणि जपानचे बाजार भांडवल स्थिर राहिले आहे. चीनच्या बाजार भांडवलात १.४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. जपानच्या भांडवलात केवळ ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जगातील बाजार…. बाजार भांडवल (ट्रिलियन डॉलरमध्ये)

  • अमेरिका ५५.६५
  • चीन ९.४
  • जपान ६.४२
  • हाँगकाँग ५.४७

हे ही वाचा :

Back to top button