भाजप नेत्यांच्या हत्येचा कट, मौलवी अटकेत | पुढारी

भाजप नेत्यांच्या हत्येचा कट, मौलवी अटकेत

सुरत, वृत्तसंस्था : भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांच्या हत्येचा कट गुजरातमधील सुरतमध्ये उघडकीस आला आहे. लखनौतील कमलेश तिवारी या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची हत्या सुरतमधील युवकांनीच केली होती, हे येथे महत्त्वाचे! सुरत गुन्हे शाखेच्या पथकाने मौलवीची रेकी केली. पुरावे गोळा केले आणि त्याच्या मुसक्या बांधल्या. मोहम्मद सोहेल ऊर्फ अबू बकर तेमोल असे या मौलवीचे नाव आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा, भाजपचे तेलंगणातील नेते आमदार टी. राजा यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी या मौलवीच्या हिट लिस्टवर होते.

हा मौलवी पाकिस्तान आणि नेपाळमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात होता. सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, हिंदू सनातन संघाचे नेते उपदेश राणा यांच्यासह अन्य काही लोक मौलवीच्या यादीत आहेत.

गुन्हे शाखेने मौलवी मोहम्मद सोहेलचा मोबाईल फोनही जप्त केला आहे. गेल्या दीड वर्षापासून तो पाकिस्तानातील +923007306635 या मोबाईल क्रमांकाच्या संपर्कात होता. नेपाळमधील +977989717763 या क्रमांकावर शहनाज नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता. व्हॉटस्अ‍ॅपवर तो बोलत असे.

तिघांच्या संभाषणात भारतात इस्लामवर तसेच प्रेषितांवर टीका-टिप्पणी करण्याची वृत्ती वाढलेली आहे. लोकांना सरळ करण्यासाठी एका हत्यासत्राची गरज आहे. त्याशिवाय जरब बसणार नाही, असे विखार उमटलेले आहेत. अबू बकरला सुरतमधील चौक बाजारातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी तो करझाई आंबोली गावात मुस्लिम मुलांना इस्लाम शिकवत असे.

* पाकिस्तान, नेपाळमधील कट्टरपंथीयांच्या संपर्कात होता सोहेल ऊर्फ अबू बकर
* सनातन हिंदू संघाच्या अध्यक्षांना धमक्या
* एक कोटी रुपयांच्या सुपारीसह शस्त्रास्त्रांबाबत व्हॉटसअ‍ॅप चॅट

Back to top button