महामार्ग जाळ्याचा झपाट्याने विस्तार | पुढारी

महामार्ग जाळ्याचा झपाट्याने विस्तार

वैभव डांगे

आपल्या देशात महामार्गांचे जाळे झपाट्याने विस्तारत चालले आहे. आकडेवारीत सांगायचे तर देशभरातील 50 लाख कि.मी. रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा वाटा सुमारे 1.46 लाख किलोमीटर आहे. याबाबतीत आपण जगात दुसर्‍या क्रमांकावर आहोत. देशातील एकूण माल वाहतुकीच्या 60 टक्क्यांहून अधिक वाहतूक या रस्त्यांवरून केली जाते. 2014 मध्ये रस्ते क्षेत्र आक्रसलेले होते. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे (एनएचडीए) दोन लाख कोटींहून अधिक किमतीचे दोनशेहून अधिक प्रकल्प रखडल्यानंतर हे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारले. आर्थिक विकासाला वेगाने चालना देण्यासाठी रस्त्यांचे जाळे अत्याधुनिक करण्यावर या दोन्ही नेत्यांनी विशेष भर दिला.

2014 पासून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आणि गडकरी महामार्ग मंत्री झाले, तेव्हापासून भारताने महामार्ग विकासाच्या बाबतीत जणू कातच टाकली. गेल्या दहा वर्षांत, महामार्ग मंत्रालयाने सुमारे 50 हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग बांधले आहेत. तसेच, 10 लाख कोटींहून अधिक किमतीच्या 60 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. राष्ट्रीय महामार्गांची लांबी मार्च 2014 मध्ये 91,287 कि.मी. होती. ती 1 लाख 46 हजार कि.मी. झाली.

ही वाढ दीडपट आहे. सध्या रस्ते बांधणीचा सरासरी दर 35 कि.मी. प्रतिदिन आहे, हे उल्लेखनीय होय. हे यश साडे-माडे-तीन अशा पद्धतीने मिळालेले नाही. त्यासाठी भूसंपादनापासून अनेक गोष्टींचा मुळापासून अभ्यास करून मगच योग्य ती पावले उचलण्यात आली. कामाचा उत्तम दर्जा, उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य आणि वेळेचे बंधन ही त्रिसूत्री कसोशीने अवलंबण्यात आल्यामुळे भारतात उत्तम रस्त्यांचे विशाल जाळे निर्माण होऊ शकले आणि अजूनही त्याचा प्रचंड विस्तार होऊ घातला असल्याचे दिसून येते.

भारतमाला परियोजना ड्रीम प्रोजेक्ट

केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने भारतमाला परियोजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, त्या अंतर्गत तब्बल 60 हजार कि.मी.चा महामार्ग बांधला जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा 22,500 कि.मी.चा असून, त्यासाठी दहा लाख कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. देशातील सर्व जिल्हा मुख्यालये याद्वारे जोडली जातील. 28 रिंग रोड, 45 बायपास आणि 34 मार्गिकांचे विस्तारीकरण या प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

देशभरातील 726 ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी दुरुस्त करून 208 ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पूल उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याशिवाय जुन्या झालेल्या सुमारे पंधराशे पुलांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते बांधणी क्षेत्रात भारताची वाटचाल झपाट्याने सुरू आहे. सध्या देशात दिवसभरात मालवाहू ट्रक 250 ते 300 कि.मी. प्रवास करतात. यात 700 ते 800 कि.मी.पर्यंत वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती

या महाकाय प्रकल्पांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भारतमाला परियोजनेद्वारे लाखो इंजिनिअर, प्रशिक्षित मजूर आणि अर्धप्रशिक्षित मुजरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पुढील पिढ्यांचा विचार करून या सगळ्या योजना आखण्यात आल्या असून, त्यावर कार्यवाही केली जात आहे. मुंबई-दिल्ली या तीन हजार कि.मी.च्या ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे नामक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम चालू वर्षातच (2024) पूर्ण करण्याचा संकल्प केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील नवा भारत आधुनिक आणि साधनसुविधांनी परिपूर्ण असणार आहे. महामार्गांचे जाळे हे त्यातील सोनेरी पान म्हटले पाहिजे.

  • भारतात?जगातील दुसर्‍या क्रमांकाचे महामार्गाचे जाळे
  • महामार्गाची लांबी दहा वर्षांत दीडपट
  • भारतमाता परियोजना महत्त्वाकांक्षी प्रकल्प; रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना

Back to top button