कोरोना काळात ११ हजारांहून अधिक उद्योजकांची आत्महत्या | पुढारी

कोरोना काळात ११ हजारांहून अधिक उद्योजकांची आत्महत्या

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : कोरोना संसर्गाच्या काळात 2020 मध्ये कृषी क्षेत्रापेक्षाही उद्योग क्षेत्राला जास्त फटका बसल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

दरम्यान, 2020 मध्ये एकूण 11 हजार 716 उद्योजकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली. 2019 च्या तुलनेत म्हणजेच कोरोना संकट येण्यापूर्वीच्या काळात तुलना करता ही आकडेवारी 29 टक्क्यांनी वाढली आहे.

गृह मंत्रालयाने नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरोच्या (एनसीआरबी) डेटाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, 2010 मध्ये 9052 उद्योजकांनी आत्महत्या केली, तर 2020 मध्ये 11 हजार 716 उद्योजकांनी आत्महत्या करत जीवन संपविले. एनसीआरबीच्या डेटानुसार, उद्योजकांनी केलेल्या आत्महत्येचा आकडा हा शेतकर्‍यांच्या तुलनेत जास्त आहे.

2020 मध्ये 10 हजार 667 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. 2015 च्या तुलनेत ही आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे. दरम्यान, उद्योजकांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत कृषी क्षेत्राशी (3.9 टक्के) तुलना करता 29.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कृषी क्षेत्रात महिलांची आत्महत्या गृहिणींची आत्महत्या म्हणून ग्राह्य धरली जाते.

2021 मध्ये आकडा मोठा असण्याची शक्यता

एनसीआरबीच्या डेटानुसार, 2020 मध्ये आत्महत्या केलेल्या 11 हजार 716 उद्योजकांपैकी 4226 दुकानदार, 4356 व्यापारी आणि 3134 जण इतर व्यवसायांत गुंतलेले होते. 2021 च्या आकडेवारीतही हा आकडा मोठा असेल अशी चिंता आहे.

Back to top button