भाजपपुढे हरियाणात जागा कायम राखण्याचे आव्हान | पुढारी

भाजपपुढे हरियाणात जागा कायम राखण्याचे आव्हान

राजधानी दिल्लीलगत असलेल्या राज्यांपैकी एक राज्य म्हणजे हरियाणा. गेल्या काही दिवसांमध्ये हरियाणाचे राजकारण चांगलेच चर्चेत राहिले. त्याला कारण म्हणजे एकीकडे भाजपने केलेला मुख्यमंत्री बदल, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये झालेले अनेक नेत्यांचे पक्ष प्रवेश. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी हे राज्य चर्चेत राहिले.

प्रशांत वाघाये; पुढारी वृत्तसेवा : हरियाणामध्ये विधानसभेत भाजपची सत्ता आहे, तसेच हरियाणामध्ये असलेल्या सर्व दहा लोकसभांमध्ये २०१९ च्या निवडणुकीत सर्वच्या सर्व भाजपचे खासदार निवडून आले होते. असे असले तरी विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसमध्येही स्पर्धा कमी नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उदय भान यांच्या व्यतिरिक्त पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुडा, काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंह सुरजेवाला, काँग्रेसच्या सरचिटणीस कुमारी सैलजा आणि काँग्रेस नेत्या किरण चौधरी असे चार प्रमुख नेते काँग्रेसमध्ये आहेत. हे चारही नेते प्रदेश पातळीवर तोडीस तोड आहेत.

राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी भाजपशी संघर्ष करण्यापूर्वी काँग्रेसमध्येच अंतर्गत छुपा संघर्ष होता. मात्र, अलीकडच्या काळात हा संघर्ष शमल्याचे दिसते. परंतु, हा संघर्ष संपला का हाही प्रश्नच आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी हा काँग्रेसमध्ये संघर्ष दिसत नाही. याउलट वेगवेगळे गटतट पुन्हा एकदा भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली एकवटल्याचे चित्र आहे. हे चित्र विधानसभा निवडणुकीवेळी बदलूही शकते. कारण भूपिंदरसिंह हुडा हे आपल्याकडची सूत्रे आपल्या मुलाला म्हणजेच दीपेंदरसिंह हुडा यांना देण्यास
इच्छुक आहेत, असे दिसून येते.

भाजपची मात्र या ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. काही दिवस पूर्वीपर्यंत हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी मनोहरलाल खट्टर होते. हरियाणाच्या एका सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोहरलाल खट्टर यांचे कौतुक केले होते. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः आणि खट्टर किती जुने मित्र आहेत, ते कसे दुचाकीवर एकत्र प्रवास करायचे, याचे किस्सेही सांगितले होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्ष नेतृत्वाने राजीनामा देण्याचा आदेश दिला होता आणि खासदार असलेले नायब सैनी यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आले. मनोहरलाल खट्टर यांनी पक्षादेश मानून स्वीकारला, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता. पुढे मनोहर लाल खट्टर यांना पक्षाने लोकसभेच्या रिंगणात उतरवले.

हरियाणामध्ये काँग्रेसकडे सत्ता नसली तरी नेते आहेत. त्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा सोडल्यास हरियाणा भाजपचा स्वतःचा प्रादेशिक चेहरा नाही किंवा असल्यास त्याला राज्यस्तरीय व्यापकता नाही. त्यामुळे मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री होते, आता नायब सैनी मुख्यमंत्री आहेत, तरी ते राज्याचा चेहरा होऊ शकले नाहीत. हरियाणामध्ये जाट समाज मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा हे जाट समाजातून येतात. त्यामुळे ते राज्याला हवाहवासा चेहरा आहेत. त्यासोबतच जाट समाजावरही त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे काँग्रेसकडे सत्ता नसली तरी काँग्रेस मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मजबूत स्थितीत दिसते. हरियाणामध्ये लोकसभेच्या १० जागा आहेत. या दहा जागापैकी भाजपने आपले सर्व दहाही उमेदवार यापूर्वीच घोषित केले आहेत. काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या आम आदमी पक्षाने आपला एक उमेदवार घोषित केला आहे.

काही काँग्रेस नेते त्यांच्या प्रचारात गुंतले आहेत. मागील निवडणुकीत भाजपने काँग्रेसला ‘क्लीन स्वीप’ मारत पूर्णच्या पूर्ण जागा जिंकल्या होत्या. हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष रोहतक, सोनिपत, हिस्सार, अंबाला, फरिदाबाद, सिरसा, गुडगाव या क्षेत्रांमध्ये पूर्वपिक्षा मजबूत आणि  काँग्रेसमध्ये असलेले हरियाणा समन्वय हे दीर्घकाळ कायम राहणार का आणि हेवेदावे, वादविवाद विसरून काँग्रेस पक्ष एकत्रितपणे एक दिलाने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार का, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. या गोष्टी जर घडून आल्या, तर काँग्रेसला या निवडणुकीत भाजपला चांगली लढत देता येऊ शकेल. दुसऱ्या बाजूला भाजपही आपला मागील निवडणुकीचा रेकॉर्ड कायम राहावा यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे २०१९ नंतर २०२४ मध्ये हरियाणाची जनता आपला कौल कुणाच्या पारड्यात टाकणार, यावर हरियाणामध्ये पुढची बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.

Back to top button