लोकसभा निवडणुकीत ५,७८५ कोटींची संपत्ती असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार | पुढारी

लोकसभा निवडणुकीत ५,७८५ कोटींची संपत्ती असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरूच आहे. यातून उमेदवारांच्या संपत्तीचे कोटींतील आकडे समोर येऊ लागले आहेत. अशाच एका उमेदवाराने आपल्या अर्जात जाहीर केलेल्या संपत्तीचे आकडे पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले पेम्मासानी चंद्रशेखर आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा तेलुगू देसम पक्षाकडून लढवत आहेत. त्यांनी एकूण 5,785.28 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. चंद्रशेखर हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरले आहेत.


चंद्रशेखर यांचे 2022-23 या वर्षात 3,68,840 रुपये इतके उत्पन्न होते. तर त्यांची पत्नी कोनेरू श्रीरत्न यांचे 1,47,680 रुपये इतके उत्पन्न होते. जंगम मालमत्तेच्या बाबतीत, चंद्रशेखर यांच्याकडे मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीसह 2,316 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर कोनेरू श्रीरत्न यांच्याकडे 2,289 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.


शिवाय, चंद्रशेखर यांची स्थावर मालमत्ता 72,00,24,245 रुपये आणि श्रीरत्न यांची 34,82,22,507 रुपये इतकी आहे. या दाम्पत्यावर 519 कोटींचे कर्ज देखील आहे. त्यांनी जगभरातील सुमारे 101 कंपन्यांमध्ये संयुक्तपणे शेअर्स खरेदी केले आहेत.


दरम्यान, चंद्रशेखर यांनी 1999 मध्ये डॉ. एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, आंध्र प्रदेश येथून MBBS पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी डॅनिव्हिल, पेनसिल्व्हेनिया, यूएस येथील गेसिंजर मेडिकल सेंटरमधून इंटर्नल मेडिसिनमध्ये एमडी पदवी 2005 मध्ये प्राप्त केली आहे. भरपूर संपत्ती असलेल्या चंद्रशेखर यांच्याविरुद्ध एकही फौजदारी खटला नाही.

Back to top button