Lok Sabha Election 2024 : भाजपचा विजयारंभ! ‘सुरत लोकसभा’ बिनविरोध जिंकली | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भाजपचा विजयारंभ! ‘सुरत लोकसभा’ बिनविरोध जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खाते आधीच उघडले असून गुजरातच्या सुरतमधील एका जागेवर भाजप उमेदवारने विजय मिळवला आहे. यापूर्वी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला होता. तर इतर 8 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. या जागेवर आता भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने त्याच्या विजयाची घोषणा सोमवारी सायंकाळी करण्यात आली. तसेच त्यांना विजयाचे प्रमाणपत्र सुपुर्द करण्यात आले.

गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी सोमवारी सोशल मीडियावर दलाल यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाटील यांनी मुकेश दलाल यांच्या छायाचित्रांसह एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात म्हटलंय की, ‘सुरतने माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना पहिला विजय मिळवून दिला! सुरत लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुकेशभाई दलाल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!’

अर्ज माघारीचे नाट्य

सुरतमध्ये काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी आणि त्यांचे डमी उमेदवार यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. ज्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजयी होण्याचा मार्ग मोळला झाला. केवळ बहुजन समाज पक्षाचे (बसपा) उमेदवार प्यारेलाल भारतीय यांनी दुपारी उशीरापर्यंत त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नव्हता. त्यामुळे प्यारे लाल भारती यांचा भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून शोध घेतला जात होता. पण दुपारी दोननंतर भारती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ज्यामुळे दलाल यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोरतब झाला. दुसरीकडे उमेदवारी रद्द झाल्याने काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दर्शना जरदोश या सध्या सुरतच्या खासदार आहेत. त्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्रीपदही सांभाळत आहेत.

कोण आहेत मुकेश दलाल?

सुरत लोकसभा बिनविरोध जिंकलेले मुकेश दलाल हे सुरत भाजपचे सरचिटणीस असून ते मोध वणिक समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे विश्वासू मानले जाते. ते सध्या SDCA समितीचे सदस्य आहेत. त्यांनी सुरत महानगरपालिकेचे (SMC) माजी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. याआधी दलाल यांनी भाजप युवा मोर्चामध्ये राज्य पातळीवर काम केले होते. दलाल तीन वेळा एसएमसीचे नगरसेवक आणि पाच वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. दलाल हे सुरत पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष आहेत. त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली असून एलएलबी, एमबीए फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. दलाल हे 1981 पासून भाजपशी संबंधित होते.

Back to top button