राजधानी दिल्लीत चुरशीच्या लढती, निवडणुकीच्या आखाड्यात बहुतांश चेहरे नवे | पुढारी

राजधानी दिल्लीत चुरशीच्या लढती, निवडणुकीच्या आखाड्यात बहुतांश चेहरे नवे

प्रशांत वाघाये, नवी दिल्ली : देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला पार पडले. त्यानंतर लगेच सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दुसऱ्या टप्प्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजधानी दिल्लीत सहाव्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. काल-परवापर्यंत राजधानीतील लढतींबाबत अस्पष्ट असलेले चित्रही आता स्पष्ट झाले आहे. भाजपने यापूर्वीच आपले सर्व सातही उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर उशिरा का होईना काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आघाडीने आपले सर्व उमेदवार जाहीर केले. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात भाजप विरुद्ध इंडिया आघाडीचे कोण हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यात भाजपचे मनोज तिवारी वगळता दोन्ही बाजुंनी नव्या चेहऱ्यांवर डाव खेळला आहे. तर दिल्लीच्या राजकारणात भाजपशी स्पर्धा करण्यासाठी काँग्रेस आणि आपने पूर्वांचल क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. यातच काँग्रेस कन्हैया कुमारला उत्तर पुर्व मतदारसंघातून पुढे आणले आहे, तर आपने पश्चिम दिल्ली मतदारसंघातून महाबल मिश्रा यांना पुढे केले आहे.  भाजपाने मात्र पूर्वांचल क्षेत्राचे मत मिळवण्यासाठी उमेदवार मनोज तिवारी यांना उभे केले आहे. भाजपचे मनोज तिवारी काँग्रेसच्या कन्हैया कुमारांविरूद्ध उत्तर पुर्व दिल्लीतून लढणार आहेत.

२०१४ पासून केंद्रासह विविध राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात यश मिळाले. ज्या राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळू शकत नाही असे भाष्य राजकीय क्षेत्रातील जाणकार करत होते त्यांनाही भाजपने आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने तोंडघशी पाडले आणि सत्ता मिळवून दाखवली. त्यामुळे देशात सर्वत्र चाललेला करिष्मा पुन्हा दिल्ली लोकसभेत चालणार असा विश्वास भाजपला आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सात पैकी सात जागा जिंकल्या होत्या. दिल्ली देशाची राजधानी असल्यामुळे पंतप्रधान, सर्व केंद्रीय मंत्री, राजधानी दिल्लीत राहतात. अनेक महत्वाची कार्यालये, संस्था दिल्लीत आहेत. अनेक अर्थाने दिल्ली महत्वाची आहे. त्यामुळे पुन्हा दिल्ली जिंकणे हा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

देशाप्रमाणेच दिल्ली विधानसभेत भाजपासाठी राम मंदिर, कलम ३७० तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून राजधानी दिल्लीत केलेली विविध विकास कामे हे प्रचाराचे मुद्दे असतील. तर आम आदमी पक्ष आणि दहा वर्षात दिलेली मोफत वीज, उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्याच्या सुविधा आणि काँग्रेस संपुआ सरकारच्या काळात आणि शीला दिक्षित यांच्या काळात केलेली विकास कामे या मुद्यांवर प्रचार करणार आहे. मात्र या सगळ्यांमध्ये दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात आहेत. ज्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचार रोखण्यासाठी झाला, भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ म्हणून जो पक्ष उदयास आला त्याच पक्षाचे प्रमुख नेते भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात आहेत, यावरही प्रचारादरम्यान, भाजपचा भर असणार आहे. तर दुसरीकडे आम्हाला जाणीवपूर्वक अडकवले हा मुद्दा आम आदमी पक्ष आणि काँग्रेस मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेही विरोधकांनी पूर्वीपासूनच तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार काम करतात, असे आरोप केले आहेत. त्यामुळे दिल्ली लोकसभेमध्ये दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरण हा चर्चेचा मुद्दा ठरणार आहे. आता तो कोणाच्या बाजूने वळतो किंवा या मुद्द्यावरून कोणाला मत मिळतात आणि कुणाच्या विरोधात जातात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. आपली बाजू जनतेला पटवून देण्यात जे यशस्वी ठरतील ते लोकसभेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

या निवडणुकीत हाही एक महत्त्वाचा मुद्दा असेल की, दिल्लीमध्ये भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त म्हणावा तसा राज्याचा स्वतंत्र चेहरा नाही. याउलट इंडिया आघाडीकडे मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींव्यतिरिक्त आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांच्यासारखा दिल्लीतील परिचित चेहरा आहे. याचा फायदा इंडिया आघाडीला होऊ शकतो. मात्र काँग्रेस कडून इच्छुक असलेल्या ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळू शकली नाही त्यांची मनधरणी काँग्रेसला करावी लागणार आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली, शीला दीक्षित यांचे पुत्र आणि माजी खासदार संदीप दीक्षित हे देखील लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. मात्र या तिन्ही नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही. या तिन्ही नेत्यांनी आपली नाराजी जाहीर केली नसली तरी ते सक्रीयपणे प्रचारात उतरल्यावरच ते नाराज नाहीत हे स्पष्ट होईल. दुसरीकडे भाजपने तर तब्बल सहा विद्यमान खासदारांना डच्चू देत सहा नवे उमेदवार दिले. मात्र या गोष्टीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता कमी आहे कारण भाजपची संघटना निवडणुकीत कुठल्या उमेदवारासाठी नव्हे तर पक्षासाठी काम करते.

आप- काँग्रेस रोखणार भाजपचा विजयरथ?

सर्वत्र विजयाची घोडदौड करणारा भाजपचा विजयरथ दिल्ली विधानसभेत आणि दिल्ली महानगरपालिकेत गेली १० वर्षे आपने रोखला आहे. लोकसभेसारखी चमकदार कामगिरी भाजपला दिल्ली महानगरपालिका किंवा दिल्ली विधानसभेत गेल्या १० वर्षात करता आली नाही. दिल्ली विधानसभेप्रमाणेच दिल्लीतील लोकसभेच्या जागांवर भाजपला रोखण्याचा प्रयत्न आप करणार आहे. यावेळी आपच्या सोबतीला काँग्रेस देखील आहे. लोकसभेपाठोपाठ दिल्ली विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी लोकसभा निवडणुका ही त्यांची पूर्वतयारी असणार आहे त्यातच आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल दिल्ली मद्यधोरण गैरव्यहार प्रकरणात तुरुंगात आहेत. या प्रकरणावरून भाजप आणि आपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी रंगल्या असताना या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.

असे असेल दिल्लीतील लोकसभा लढतीचे चित्र

लोकसभा मतदारसंघ     भाजप उमेदवार       इंडिया आघाडीचे उमेदवार

चांदणी चौक –         प्रवीण खंडेलवाल –      जे.पी. अग्रवाल (काँग्रेस)

उत्तर पुर्व दिल्ली –       मनोज तिवारी –        कन्हैया कुमार (काँग्रेस)

उत्तर पश्चिम दिल्ली –   योगेंद्र चंदोलिया –       उदित राज (काँग्रेस)

पूर्व दिल्ली –           हर्ष मल्होत्रा –           कुलदीप कुमार  (आप)

नवी दिल्ली –          बांसुरी स्वराज –         सोमनाथ भारती (आप)

पश्चिम दिल्ली –       कमलजीत सेहरावत –    महाबल मिश्रा (आप)

दक्षिण दिल्ली –        रामवीर सिंग बिधुरी –   साही राम (आप)

Back to top button