वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार हॅट्ट्रिक | पुढारी

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार हॅट्ट्रिक

ताजेश काळे (वाराणसी)

पवित्र गंगा नदीच्या तटावर वसलेल्या आणि हिंदूंच्या अग्रणी तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या बाबा विश्वनाथ यांच्या काशी अर्थात वाराणसी शहराकडे पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे. वाराणसी लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मोदी यांनी गेल्यावेळी तब्बल 4 लाख 79 हजार 505 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळविला होता. यंदाही हा विक्रम अबाधित ठेवून मोदी पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधणार, याविषयी खात्री व्यक्त केली जात आहे…

वाराणसी या आपल्या मतदार संघात मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये विकासाची गंगा साकारली आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोर ते नमामि गंगा योजनेत जल शुद्धीकरणासह सर्व घाटांचा कायापालट त्यांनी केला आहे. जलजीवन मिशनसोबतच प्रवाशी रोप-वे अशा सुमारे 1780 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. गेल्या एक वर्षात जगभरातील 7 कोटींपेक्षा जास्त पर्यटकांनी काशीला भेट दिली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक प्रगती व रोजगाराची निर्मितीही साधली आहे. त्यामुळे वाराणसीतील जनतेकडून मोदी यांच्या पारड्यात पुन्हा भरभरून मते टाकली जातील, अशी वस्तुस्थिती आहे.

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय तिसर्‍यांदा रिंगणात उतरले आहेत. 2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी सपाच्या उमेदवार शालिनी यादव यांचा दणदणीत पराभव केला होता. मोदी यांना 6 लाख 74 हजार 664 इतकी मते मिळाली होती. ती एकूण मतदारांच्या संख्येपैकी 50 टक्के इतकी होती. प्रतिस्पर्धी शालिनी यादव यांना अवघ्या 1 लाख 95 हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसचे अजय राय तिसर्‍या क्रमांकावर होते.

वाराणसीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम मोदी यांनी केला होता. त्याआधी 2014 च्या निवडणुकीतही मोदी यांनी तब्बल 3 लाख 37 हजार इतक्या मताधिक्याने विजय साकारला होता. त्यावेळी आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांना आव्हान दिले होते.

केजरीवाल यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना अपेक्षित यश मिळाले नव्हते. नरेंद्र मोदी यांना त्यावेळी एकूण 5 लाख 16 हजार 593 इतकी मते प्राप्त झाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अरविंद केजरीवाल यांना केवळ 1 लाख 79 हजार 739 मते मिळाली होती. अजय राय तिसर्‍या स्थानावर होते. बसपाचे विजयकुमार जयस्वाल आणि सपाचे कैलास चौरसिया यांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

2014 व 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय साकारून मोदी पंतप्रधानपदी आरूढ झाले होते. त्यामुळे यंदाची निवडणूकदेखील मोदी यांच्यासाठी फारशी अवघड नसल्याचे दिसून आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा अजय राय यांना संधी दिली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाची युती असल्यामुळे राय हे इंडिया आघाडीचे उमेदवार असणार आहेत. सपाच्या पाठिंब्यामुळे यंदा राय यांना मिळणार्‍या मतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने अताहर जमाल लारी यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधानांविरोधात ते पहिल्यांदाच लढत आहेत. लारी 1980 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी दोनदा लोकसभेची तर तीनदा विधानसभेची निवडणूक लढविली आहे. 1984 मध्ये ते जनता पक्षाचे उमेदवार होते. काँग्रेसचे श्यामलाल यादव यांनी त्यांचा पराभव केला होता.

लारी यांना फक्त 50 हजार मते मिळाली होती. दुसर्‍या वेळी 2004 मध्ये सोनेलाल पटेल यांच्या अपना दल पक्षाकडून ते लढले होते. त्यांना तेव्हा 93 हजार 228 मते पडली होती. काँग्रेसचे राजेशकुमार मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला होता. तुरुंगात अलीकडेच मृत्यू झालेल्या कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या कौमी एकता दल या पक्षाकडून अताहर जमाल लारी 2012 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. मोदी यांच्याविरोधात लढत असल्यामुळे लारी चर्चेत आले आहेत. अजय राय आणि लारी यांच्याशी होणार्‍या लढतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम करतील, अशी चर्चा होत आहे.

Back to top button