श्रीनगर : पुढारी ऑनलाईन
जम्मू -काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात ( Pulwama encounter ) आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. चकमक अद्याप सुरु आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बुधवारी सकाळी पुलवामा जिल्ह्यातील ( Pulwama encounter ) कस्बायार परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यासंदर्भात माहिती देताना काश्मीरचे पोलिस महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले की, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी कस्बायार परिसरात लपले असल्याचे माहिती सुरक्षा दलास मिळाली. यानुसार परिसरात शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार दिला. जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर यासिर आणि पाकिस्तानी दहशतवादी फरकान यांचा खात्मा करण्यात आला. या दोन्ही दहशतवादी माेस्ट वाॅँटेड हाेते. या दोघांचाही काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता.