Michigan Shooting : हायस्कूलमध्ये अंधाधुंद गोळीबार, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, ८ जखमी | पुढारी

Michigan Shooting : हायस्कूलमध्ये अंधाधुंद गोळीबार, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, ८ जखमी

ऑक्सफोर्ड टाउनशिप (अमेरिका) : अमेरिकेतील मिशिगन येथील एका हायस्कूलमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्याने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात (Michigan Shooting) तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर यात एक शिक्षकासह ८ जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा विद्यार्थी याच शाळेत शिकत होता. मृतांमध्ये एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा तसेच १४ वर्षीय आणि १७ वर्षीय विद्यार्थिनीचा समावेश आहे. गोळी लागून एक शिक्षकदेखील गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याकडून सेमी ॲटोमॅटिक हँडगन जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ही घटना मिशिगनमधील (Michigan Shooting) ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये घडली. या प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या आवारातून एक रिकामे काडतूस जप्त केले आहे. हायस्कूलमध्ये झालेल्या अंधाधुंद गोळीबारावेळी १५-२० राउंड गोळ्या झाडण्यात आल्या. एकाच विद्यार्थ्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोन गंभीर जखमींवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर इतर सहाजणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. पाच मिनिटे अंधाधुंद गोळीबार सुरु होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Travel Vlog | वीकेंडला फिरता येईल असं कोल्हापूरपासून जवळच ठिकाण

Back to top button