Manali Bonde : युवा चित्रकार मनाली बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ चित्र प्रदर्शनाचे नितीन गडकरींकडून कौतुक | पुढारी

Manali Bonde : युवा चित्रकार मनाली बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ चित्र प्रदर्शनाचे नितीन गडकरींकडून कौतुक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या मनाली बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. विदर्भातील युवा चित्रकार असलेल्या मनाली बोंडे यांनी विविध देशात प्रवास करून चित्रे काढली आहेत. या सर्व चित्रांचे नितीन गडकरी यांनी भरभरून कौतुक केले. सोमवारी आणि मंगळवारी (१२, १३ मार्च) दोन दिवस राजधानी दिल्लीत हे प्रदर्शन होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाला उद्घाटन झाले होते.

‘मनाली एक मराठी चित्रकार आहे. मनाली विदर्भाची, महाराष्ट्राची लेक आहे. जगभरात काही देश फिरून तिने चित्र विविध प्रकारची चित्रे काढली आहेत. आणि या सर्व चित्रांचे दिल्लीत प्रदर्शन होत आहे, हे कौतुकास्पद आहे.’ असे कौतुकोद्गार मनालीला शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. तर यावेळी बोलताना मनाली बोंडे म्हणाल्या की, नितीन गडकरी यांनी प्रदर्शनीला भेट दिली याचा मोठा आनंद आहे. जगभर फीरुन काढलेली चित्रे, त्यामागच्या कथा सगळीकडे पोहोचायला हव्यात, यासाठी प्रदर्शनी हे माध्यम आहे. तसेच जेवढ्या जास्त लोकांपर्यंत या कथा पोहोचतील तेवढी या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना ऊर्जा मिळेल.” असेही त्या म्हणाल्या.

मनाली बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनीला भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त व्हाईस ॲडमिरल सतीशकुमार घोरमाडे, खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ वसुधा बोंडे, मराठी प्रतिष्ठानचे विष्णु पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच दिल्लीकर नागरीकांचाही प्रदर्शनीला उत्तम प्रतिसाद होता. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, औद्योगिक, प्रशासन यांसह विविध प्रकारच्या चित्रांची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे प्रदर्शन एक पर्वणी ठरल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. तसेच सर्व मान्यवरांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या सर्व कलाकृतींची पाहणी केली आणि मनालीचे कौतूकही केले.

विविध देशांची संस्कृती, कथा, हवामान यावर आधारित चित्र या प्रदर्शनीत होते. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन अमरावती, यांच्या वतीने अमरावती येथील प्रसिद्ध युवा चित्रकार मनाली अनिल बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मनालीने जगातील कंबोडिया, लाओस, इटली, जर्मनी, इस्रायल, इंडोनेशिया या देशातील विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्या- त्या देशाची संस्कृती, विचार आणि जीवनावर आधारित चित्रे या प्रदर्शनात ठेवली होती.

Back to top button