बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव आंबेडकरांचा पराभव | पुढारी

बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव आंबेडकरांचा पराभव

पुढारी ऑनलाईन डेस्क : 1971 चे एक वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातील सर्व सातही जागा मतदारांनी इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसच्या पारड्यात टाकल्या. विरोधकांचा सफाया झाला. नांदेडातून काँग्रेसच्या तिकिटावर व्यंकटराव तरोडेकर हे निवडून आले. त्यांनी पराभव केला, तो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब भीमराव आंबेडकर यांचा. तरोडेकर यांना 2 लाख 15 हजार 948 तर आंबेडकर यांना 85,757 मते मिळाली. (संदर्भ : निवडणूक आयोग संकेतस्थळ) नांदेडात दलित-मुस्लिम मतदारांचे प्रमाण पाहून आंबेडकर बहुतेक नांदेडातून रिपाइं (खोब्रागडे) कडून उभे राहिले असावेत. पण मतदारांनी त्यांना अव्हेरले. जनसंघाचे लक्ष्मणराव गंजेवार, अपक्ष गणपतराव वाघमारे यांनाही अत्यल्प मते पडली. त्याअगोदरही आंबेडकर हे मुंबईतूनही उभे होते. पण लोकसभेत ते पोहचू शकले नाही. मात्र बॉम्बे स्टेटमधून विधानपरिषदेवर त्यांनी प्रतिनिधीत्व केले.
भैय्यासाहेब हे डॉ. आंबेडकर यांच्या प्रथम पत्नी रमाबाई यांचे एकमेव पुत्र.  बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी धम्म आणि समाजकार्यात झोकून दिले. प्रारंभी सिमेंटचा कारखाना त्यांनी काढला. त्यानंतर प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय केला. बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापनाचे काम तेच पाहात असत. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे विचार जिवंत रहावेत म्हणून अनेक स्मारकांची उभारणी त्यांनी केली, त्यात चैत्यस्मारक हे प्रमुख होय.

सूर्यपुत्र अशी ओळख

बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शावर भैय्यासाहेब जगले. आपले पिताजी कायदामंत्री आहेत, राष्ट्रीय नेते आहेत म्हणून त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला नाही. ही शिकवणही बाबासाहेबांच्या कठोर स्वभावातून त्यांना मिळाली.  दिल्‍लीच्या एका ठेकेदाराने यशवंतरावांना एका कामात पार्टनर म्हणून घेतले, 25 ते 30 टक्क्यांची लालूच दाखविली. ही बाब बाबासाहेबांना कळताच त्यांनी तडक यशवंतरावांना घरी जेवण न करू देता मुंबईला पाठविले. हा वस्तुपाठ त्यांना भावी आयुष्यात कामी आला. एके दिवशी मुुंबईत कोर्टाच्या कामासाठी ते गेल्यानंतर रांगेत उभे राहिले. त्यांच्या एका परिचिताने त्यांना ओळखले व पुढे येण्यास सांगितले, तोपर्यंत रांगेतील अन्य लोकांनाही बाबासाहेबांचे चिरंजिव आहेत, हे कळाले. पण यशवंतरावांनी जागा सोडण्यास नकार दिला व रांगेत उभे राहूनच आपले काम पूर्ण केले. सूर्यपुत्र भैय्यासाहेब असे त्यांना म्हटले जात असे.
अर्थात, भैय्यासाहेबांचे पुत्र अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडातून आपले भविष्य अजमाविण्याचा प्रयत्न केला. दुर्देवाने त्यांना अपयश आले. पुढे अ‍ॅड. आंबेडकर हे अकोल्यातून खासदार झाले, तसेच एक टर्म राज्यसभेतही प्रतिनिधीत्व केले.  नांदेडकरांनी शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण या पितापुत्रांना खासदार, आमदार केले. आंबेडकर पिता पुत्रांना ही संधी मात्र मिळू शकली नाही.

निवडणुका म्हणजे क्रिकेटची मॕच

याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण बोलके आहे. पहिल्या निवडणुकीत 1952 ला उ. मुंबईतून बाबासाहेब उभे होते. काँग्रेसचे नारायणराव काजोरळकर यांनी त्यांना पराभूत केले.  या पराभवाने बाबासाहेब काहीसे व्यथित झाले. त्यांना भेटण्यासाठी काजोरळकर आले असता बाबासाहेबांनी त्यांचे अभिनंदन केले व मदतीसाठी आपले दरवाजे खुले असल्याचे सांगितले. एका सभेत ते म्हणाले, निवडणूक ही शेवटी क्रिकेटची मॅच असते. पराभूत टीम गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही, पुढच्या सामन्यासाठी तयारी करते.
दुर्देवाने भंडार्‍याची पोटनिवडणूक बाबासाहेब पराभूत झाले. त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले, पण दोन वर्षांनी 1956 साली बाबासाहेबांचे निर्वाण झाले. बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव यांचे 17 सप्टेंबर, 1977 रोजी निधन झाले.

Back to top button