Lok Sabha 2024 : गाय वासरू, नका विसरू! | पुढारी

Lok Sabha 2024 : गाय वासरू, नका विसरू!

पुढारी ऑनलाईन डेस्क : 1967 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी बँक राष्ट्रीयीकरण, राजे महाराजांचे वेतन, भत्ते बंद करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे काही प्रश्‍नांवरून मतभेद झालेे. परिणामी सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन गट निर्माण झाले. इंडिकेटचे नेतेपद इंदिरा गांधींकडे तर सिंडिकेेटचे नेतृत्त्व नीलम संजीव रेड्डी, मोरारजी देसाई, स. का. पाटील आदींकडे होते. इंदिराजींचे विरोधक आणि विरोधी पक्ष त्यांच्याविरोधात एकत्र झाले होते.देशातील वातावरण पाहून इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाओ’ चा नारा दिला आणि तत्कालिन प्रधान सचिव पी. एन. हक्सर यांच्या सल्ल्यानुसार मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या. 1 ते 10 मार्च 1971 या कालावधीत मतदान झाले. या निवडणुपूर्वी काँग्रेसचे विभाजन झाल्यामुळे इंदिराजींच्या गटाला काँग्रेस (आर म्हणजेच रेक्वजिशन) तर दुसर्‍या गटाला काँग्रेस (ओ म्हणजेच ऑर्गनायझेशन) असे नाव मिळाले. निवडणुकीतील अभूतपूर्व यशामुळे इंदिराजींची काँग्रेस पुढे अधिकृत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून मान्य झाली. इंदिराजींच्या पक्षाने या निवडणुका ‘गाय- वासरू’ या चिन्हावर लढविल्या. ‘गाय- वासरू, नका विसरू’ ही घोषणा निवणुकीत लोकप्रिय ठरली होती.

पालोदकरांचा दणदणीत विजय

या निवडणुकीत मराठवाड्यातील सातही जागा इंदिराजींनी कायम ठेवल्या हे विशेष. छत्रपती संभाजीनगरातून सिल्‍लोड येथील काँग्रेसचे नेते माणिकराव दादा पालोदकर हेएक लाख 47 हजार मताधिक्यांनी विजयी झाले. झालेल्या मतदानापैकी त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण जवळपास 70 टक्के होते, याचा अर्थ ही निवडणूक पालोदकरांसाठी एकतर्फीच ठरली. त्यांच्या विरोधात जनसंघाने रामभाऊ गावंडे यांना उभे केले होते. गावंडे यांना 47 हजार 15 (16.8टक्के) मतांवर समाधान मानावे लागले. रिपाइं खोेब्रागडे गटाचे साहेब शिवराम बाला मोरे 11 हजार 398 (16.8टक्के), महंमद झफर 10 हजार 638 (3.8 टक्के), कासीम सय्यद 1,117 (0.4 टक्के) एवढी मते अन्य उमेदवारांना मिळाली.

माकप – भाकप, ओ-काँग्रेस

भाकपची स्थापना 1925 तर माकपची 1964 मध्ये झाली. कम्युनिस्ट विचारसरणी दुभंगल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार उभे होते. बीड मतदारसंघात सयाजीराव पंडित हे एक लाख 87 हजार 132 मते घेत विजयी झाले. माकपचे गंगाधर अप्पा बुरांडे यांना 32,555 तर भाकपचे काशीनाथ जाधव यांना 22 हजार 787 मते पडली. भाजपचे राजपालसिन्हा यांना 14 हजार 242 तर बंकट कांडे यांना 11 हजार 155, खोब्रागडे गटाचे रामचंद्र मोरे यांना एक हजार 406 मते पडली. त्यात बंकट कांडे हे काँग्रेस (ओ) गटाचे उमेदवार होते, हे उल्‍लेखनीय.

संग्रहित छायाचित्र : सिल्‍लोड येथील एका कार्यक्रमात तत्कालिन केेंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासोबत माणिकराव दादा पालोदकर

हेही वाचा

Back to top button