भारताने बुडवलेली पाकची ‘गाझी’ सापडली

भारताने बुडवलेली पाकची ‘गाझी’ सापडली
Published on
Updated on

विशाखापट्टणम, वृत्तसंस्था : बांगला देश युद्धात भारताच्या आयएनएस विक्रांत बुडवण्याचे मिशन घेऊन आलेल्या, पण लढवय्या भारतीय नौसेनेच्या प्रत्युत्तरात समुद्रात बुडालेल्या पाकिस्तानच्या पीएनएस गाझी या पाणबुडीचे अवशेष शोधण्यात भारतीय नौदलाला यश आले आहे.

विशाखापट्टणमच्या समुद्रात 3 कि.मी. अंतरावर 100 मीटरपेक्षा अधिक खोल तळाशी पाकिस्तानची गाझी ही पाणबुडी चिरविश्रांती घेत आहे. डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल अर्थात डीएसआरव्ही या यंत्रणेच्या मदतीने हे अवशेष शोधण्यात यश आले आहे. ज्या आयएनएस विक्रांतला बुडवण्यासाठी पीएनएस गाझी आली होती ते आयएनएस विक्रांत आज 52 वर्षांनंतरही नौदलाच्या सेवेत आहे. सध्या ते नव्या रूपात नौदलात कार्यरत आहे.

गाझीसोबत आणखीही एक पाणबुडी

विशाखापट्टणमचा समुद्र खोल आहे. त्याच्या तळाशी अनेक रहस्ये आहेत. पीएनएस गाझीचा शोध घेताना भारताला समुद्राच्या तळाशी आणखी एक पाणबुडी सापडली. ती जपानची आर ओ 110 पाणबुडी असून दुसर्‍या महायुद्धात ती ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन नौदलाने बुडवली होती. 80 वर्षांपासून ती पाणबुडी समुद्र तळाशी आहे.

अवशेष बाहेर काढणार नाही

नौदलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पाकिस्तानची गाझी आणि जपानची एक अशा दोन पाणबुड्या समुद्रतळाशी आहेत, पण त्या दोन्ही पाणबुड्या बाहेर काढल्या जाणार नाहीत. नौदलातील परंपरेनुसार या पाणबुड्या त्यातील जवानांसह बुडाल्या. ते आता त्या शूर आत्म्यांचे वसतिस्थान आहे. त्यांच्या चिरविश्रांतीत ढवळाढवळ केली जाणार नाही. ते अवशेष तेथेच राहातील. तेही कायमसाठी.

गाझी कशी बुडाली

बांगला देश मुक्तीची लढाई सुरू झाल्यावर पाकिस्तानने भारताविरोधात आघाडी उघडली. बंगालच्या उपसागरात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांत हे विमानवाहू जहाज नष्ट करण्याची जबाबदारी गाझीवर देण्यात आली. 14 नोव्हेंबर 1971 रोजी गाझी पाणबुडीने कराची बंदर सोडले आणि पाण्याखालून प्रवास करीत 4800 कि.मी. अंतर कापून विशाखापट्टणमच्या आसपास ती दबा धरून होती.

आयएनएस राजपूत धावली

पाकिस्तानी पाणबुडी आल्याची माहिती हाती लागल्यावर भारताने आयएनएस राजपूत ही विनाशिका तिच्या मागावर पाठवली. आयएनएस राजपूतने समुद्री सुरुंग व टोर्पेडोचा वापर करीत पीएनएस गाझीचा फडशा पाडला. गाझी बुडाली. त्यावर 11 अधिकारी व 82 खलाशी असा 93 जणांचा पाकिस्तानी नौदलाचा चमू होता. सारे त्यात मृत पावले. पाकिस्तानने मात्र कायमच पीएनएस गाझी भारताच्या हल्ल्याने नव्हे तर पाणबुडीत स्फोट झाल्याने बुडाल्याचे म्हटले आहे.

अशी होती पीएनएस गाझी

अमेरिकेची टेंच श्रेणीतील ही पाणबुडी आधी अमेरिकी नौदलात यूएसएस डीआब्लो नावाने कार्यरत होती. त्यानंतर ती पाकिस्तानला विकण्यात आली. पाकिस्तानी नौदलाने तिचे नाव पीएनएस गाझी ठेवले.

काय आहे डीएसआरव्ही

डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेईकल अर्थात डीएसआरव्ही ही सागरतळाशी बुडालेल्या जहाज आणि पाणबुड्यांचा शोध घेणारी यंत्रणा आहे. भारताने 2018 मध्ये अशा दोन यंत्रणा घेतल्या. जगातील फक्त 12 देशांकडे ही यंत्रणा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news