पुतण्याची काकांना धोबीपछाड; अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा | पुढारी

पुतण्याची काकांना धोबीपछाड; अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी कोणाची यावर निवडणूक आयोगाने अखेर विधिमंडळ पक्षाचे बहुमत ग्राह्य धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे देण्यात आले. निवडणूक आयोगाचा हा निकाल शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. राज्यसभेची निवडणूक लक्षात घेऊन शरद पवार गटाला नवीन पक्ष, चिन्हासाठी नाव आणि चिन्हाचे तीन पर्याय निवडणूक आयोगाला बुधवारी (7 फेब्रुवारी) 4 वाजेपर्यंत द्यायचे आहेत. त्या तीनपैकी निवडणूक आयोग एक चिन्ह आणि नाव शरद पवार गटाला देईल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 81 आमदार, खासदार आहेत. यापैकी 57 जणांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता, तर 28 जणांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. 81 पैकीच 5 आमदार आणि एका लोकसभा खासदाराने दोन्ही गटांना पाठिंबा दिला होता. तरीही बहुमत अजित पवारांकडे आहे. आयोगाने निकाल देताना पक्षघटना, पक्षाच्या घटनेची उद्दिष्टे आणि लोकप्रतिनिधींचे संख्याबळ या तीन घटकांचा प्रामुख्याने विचार करून त्या आधारावर निकाल दिला.

आज द्यावे लागणार पर्याय

निवडणूक आयोगाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे
तपासली. ही सर्व प्रतिज्ञापत्रे तपासल्यानंतर पक्ष अजित पवार गटाचा आहे, या निष्कर्षापर्यंत आयोग पोहोचले.
दरम्यान, महाराष्ट्रात 6 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत नवीन पक्ष आणि चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला द्यायचे आहेत. त्या तीनपैकी निवडणूक आयोग एक चिन्ह आणि नाव शरद पवार गटाला देईल.

आयोगासमोर झाल्या 10 सुनावण्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा कोणाचा यावर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट यांच्या 10 सुनावण्या पार पडल्या. यातील पहिली सुनावणी 6 ऑक्टोबर 2023 ला झाली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद 8 डिसेंबरला पूर्ण झाला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निर्णय राखीव ठेवण्यात आला होता. दीर्घकाळ चाललेल्या युक्तिवादात शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत, अमित भंडारी यांच्यासह 10 वकिलांनी बाजू मांडली; तर अजित पवार गटाकडून वकील मुकुल रोहतगी, नीरज किशन कौल, सिद्धार्थ भटनागर, मनिंगरसिंग आणि सिद्धार्थ धर्माधिकारी यांच्यासह 13 वकिलांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंनी कायदेतज्ज्ञांची फौज उतरवण्यात आली होती.

दोन्ही गटांकडून पुरावे सादर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात आमदारांचा एक गट सत्तेत सहभागी झाला. शरद पवार गट मात्र महाविकास आघाडीसोबत राहिला. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगात गेले होते. निवडणूक आयोगात यावर 10 सुनावण्या झाल्या. दोन्ही गटांच्या वतीने आपण कसे मजबूत आहोत किंवा पक्ष आपलाच आहे, यासाठी विविध पुरावे सादर करण्यात आले, युक्तिवाद करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय राखून ठेवला होता. आज यावर आयोगाने निर्णय दिला.

निवडणूक आयोगाचा निकाल

अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
त्यामुळे अजित पवारांनाच नाव आणि चिन्ह वापरता येईल.
महाराष्ट्र राज्यातील 41, नागालँडमधील 7 आमदार आणि दोन खासदार अजित पवारांकडे आहेत.
एका खासदाराने आणि महाराष्ट्रातील पाच आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिले.
राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने नवे चिन्ह आणि पक्षाचे नाव सुचवावे.
बुधवार 7 फेब्रुवारीला दुपारी 4 पर्यंत हे पर्याय द्यावेत.
हे पर्याय वेळेत न दिल्यास शरद पवार गटाला अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने न झाल्याचा ठपका

आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारतो.
– अजित पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी

Back to top button