अशी बदलली अयोध्या | पुढारी

अशी बदलली अयोध्या

अयोध्या :  उत्तर प्रदेशातील अयोध्या हे अगदी पिटुकले गाव. श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या या अयोध्येची 2011 मध्ये लोकसंख्या होती 55 हजार 890 फक्त. ती आता एक लाखाच्या पुढे गेली आहे. या अयोध्येचा कायापालट श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे सुरू झाला. शेकडो प्रकल्प हाती घेण्यात आले. काही पूर्ण झाले आहेत, तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आज श्रीराम मंदिर पूर्ण होऊन त्यात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यासाठी बदललेली अयोध्या सज्ज झाली आहे.

  • अयोध्येच्या विकासासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.
  • पायाभूत सुविधांपासून सार्‍या सुविधांच्या निर्मितीचे महाप्रचंड काम हाती घेण्यात आले.
  • आजघडीला अयोध्येत 28 हजार कोटींचे 252 प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी 34 विभाग कामाला लागले आहेत.
  • 2300 कोटी रुपयांचे अयोध्याधाम रेल्वेस्थानक तयार झाले आहे.
  • 1450 कोटी रुपये खर्चूून उभारलेले महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत झाले आहे.
  • जुन्या पिटुकल्या गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रचंड कामे हाती घेण्यात आली.
  • अनेक रस्ते रुंद करण्यात आले, सुशोभीकरण झाले, नव्या चौकांची निर्मिती झाली.
  • अयोध्येतील राम पथ, धर्म पथ, भक्ती पथ आणि श्रीराम जन्मभूमी पथ या चार प्रमुख रस्त्यांची नव्याने रचना करण्यात आली.
  • अयोध्येत सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-बस सेवा व ई-रिक्षांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
  • गुप्तर घाट ते लक्ष्मण घाट या 10.2 कि.मी. मार्गावर 470 पथदिवे असून, ते सौरऊर्जेवर काम करतील. हा गिनीज रेकॉर्ड आहे.
  • शरयू घाटांचे सुशोभीकरण आणि त्यासोबतच वैदिक शहराची निर्मिती होत आहे.
  • भविष्यातील वाढ ध्यानात घेऊन छोट्या आकारापासून मोठ्या भव्य टाऊनशिप्ससाठी जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या किमान 1 हजार टाऊनशिप्स लवकरच विकसित होतील.
  • अयोध्येत येणार्‍या भाविकांचा विचार करून लागणार्‍या आरोग्य सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.
  • शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम राबवण्यात आली आहे.
  • उच्च प्रतीचे एआय कॅमेरे, जागोजाग सूचना प्रक्षेपक यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत.
  • राम मंदिर आणि हनुमान गढी मंदिरात जाण्यासाठी भविकांसाठी बॅटरीवर चालणार्‍या इ-कार्टस् असतील.
  • पहिल्या टप्प्यात 650 ई-कार्टस् मार्चपर्यंत येतील. त्यातून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिलांना मोफत प्रवास करता येईल. इतरांसाठी तिकीट दर लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
  • वाहनांची गर्दी ध्यानात घेऊन नवीन अयोध्येत चारही दिशांना एकूण 51 पार्किंग लॉटस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तेथे 22 हजार वाहनांची क्षमता आहे.
  • अयोध्येत येणार्‍या भाविकांना राहण्यासाठी आतिथ्यसेवेची मोठी गरज ध्यानात घेऊन काम सुरू झाले आहे.
  • धर्मशाळा, होम स्टेपासून साधी हॉटेल ते पंचतारांकित हॉटेल्स अशा सुविधा उभा राहत आहेत.
  • देशातील सर्वच मोठ्या साखळी हॉटेलांची अयोध्येत भव्य हॉटेल्स उभी राहत आहेत. त्यातून किमान 30 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.

Back to top button