Uttarkashi Tunnel Rescue : नशीब करायचे घात, युक्ती द्यायची साथ! अशा आल्या अडचणी, अशी केली मात!!

Uttarkashi Tunnel Rescue : नशीब करायचे घात, युक्ती द्यायची साथ! अशा आल्या अडचणी, अशी केली मात!!
Published on
Updated on

उत्तर काशी : वृत्तसंस्था; 12 नोव्हेंबरला उत्तर काशीतील सियालक्यारा बोगद्याचा काही भाग कोसळला आणि तब्बल 41 मजूर त्यात अडकले. मजुरांसह या बोगद्यात अडकला त्यांच्या कुटुंबीयांचा जीव! हा बोगदा आता 'मौत का कुँवा' बनलेला होता. जगण्यासाठी ऑक्सिजन जायलाही जागा नव्हती. किती क्षण मृत्यू आणखी लांब आहे, या भयावह मन:स्थितीत असलेले हे मजूर एकमेकांना आवाजावरूनच ओळखत होते. चौफेर अंधार होता. आधी त्यांना बाहेरून ऑक्सिजन पुरविण्यात आला. नंतर खाणेपिणे… बोगद्यात आडव्या बाजूने ड्रिलिंग, लष्कराला पाचारण, मग व्हर्टिकल ड्रिलिंग, असे अनेक प्रयोग चालले. एक दिवस, दोन दिवस, तीन, चार, अकरा, बारा असे दिवस उलटत गेले आणि सतरा दिवसांनी मृत्यूच्या अंध:कारातून हे 41 मजूर बाहेर पडले… एका मोठ्या अवकाशानंतर त्यांनी पाहिले मोकळे आकाश… 'छटा मौत का अंधेरा और जिंदगी मिली दोबारा,' अशा प्रतिक्रियांनी हे आकाशही झळाळून गेले!

यादरम्यान बोगद्यातून पाणीही पाझरले. बोगदा खचतो आणि त्यात सारे काही संपते की काय, अशी स्थिती उद्भवली. अडकलेल्यांची चिलीपिली बापासाठी बाहेर कासावीस झालेली होती. मधूनच या मजुरांचे आप्त डोंगरालगत येऊन टाहो फोडत होते. दुसरीकडे, ड्रिलिंग मशिन्स सातत्याने डोंगर फोडत होत्या. अखेर डोंगर झुकला. नियतीने जणू आक्रोश ऐकला. उजेडाची तिरीप बोगद्यात गेली. वाचविणार्‍या हातांसमोर, आकाशाकडे आशाळभूत नजरेने बघणार्‍या चिल्यापिल्यांच्या डोळ्यांसमोर डोंगर अखेर झुकला. जीवनाच्या या विजयोत्सवात स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग सहभागी झाले.

सियालक्यारा बोगद्यात 418 तासांहून अधिक काळ अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकासह (एनडीआरएफ) शासनाच्या अन्य यंत्रणांद्वारे बचावकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आल्यामुळे मजुरांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. बचाव पथकाला यश आले. मंगळवारी रात्री 8 वाजता सर्वप्रथम एका मजुराने बोगद्याबाहेर प्रकाश बघितला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 4 मजुरांची सुटका करण्यात यश आले. या मजुरांना तत्काळ रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर तासाभरात उर्वरित 36 मजुरांना बाहेर काढण्यात आले.

अमेरिकन बनावटीचे ऑगर मशिन बंद पडल्याने कर्मचार्‍यांनी 10 ते 15 मीटरपर्यंत बोगदा हाताने खणल्यामुळे मजुरांची सुरक्षितपणे सुटका करण्यात यश आले. खोदकाम फक्त दोन मीटरपर्यंत शिल्लक राहिल्यानंतर मजुरांच्या सुटकेसाठी देशभरात उत्कंठा लागून राहिली होती. मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

187 फूट अर्थात 57 मीटर स्टीलच्या पाईपमधून मजुरांना बाहेर काढण्यात आले. बोगद्याच्या प्रवेशापासून मजूर साधारणत: 56 मीटर अंतरावर अडकले होते. ऑगर मशिनच्या साहाय्याने 40 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात यश आले होते. ऐनवेळी मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दोन दिवसांपासून बोगद्यावरील टेकडीवरून 36 मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यात आले होते.

दोन दिवसांपासून मॅन्युअल ड्रिलिंगचे काम वेगाने केल्यामुळे मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी अवघ्या दोन मीटरचे खोदकाम शिल्लक राहिले आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी स्वतः घटनास्थळी हजर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रत्येक दिवशी बचावकार्याचा आढावा घेत आहेत. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळल्याने 41 मजूर बोगद्यात अडकले होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे देशभरातील 29 बोगद्यांचे ऑडिट होणार आहे.

अशा आल्या अडचणी, अशी केली मात!!

समस्या : अडकलेल्या मजुरांशी संपर्क कसा साधावा? ऑक्सिजन सपोर्ट कसा द्यावा? खायला कसे द्यावे?

मात : पाण्याच्या निचर्‍यासाठी 5 इंचाचा पाईप बोगद्यात होता. इथे वॉकी-टॉकीला सिग्नल मिळाल्याने ही समस्या सुटली. याचा पाईपातून मग कॉम्प्रेसरच्या माध्यमातून ऑक्सिजन, चणे, शेंगदाणे, औषधे पाठविण्यात आली.

समस्या : ढिगारा तेवढाच्या तेवढा पडायचा

मात : अशा आल्या अडचणी, अशी केली मात!!ढिगारा उपसण्याऐवजी त्यातच मोठे भोक पाडून त्यात पाईप टाकण्याची कल्पना मग समोर आली.

समस्या : हरक्युलस विमानाने ऑगर मशिन मागविले. 25 मीटरपर्यंत पाईप टाकला गेला होता. अडचणी उद्भवल्याने पुढे 900 ऐवजी 800 मि.मी.चा पाईप टाकायला सुरुवात झाली.

समस्या : 9 दिवस उलटले, हाती काही लागले नाही.

मात : बोगद्यात मग एकाचवेळी 5 बाजूंनी ड्रिलिंग सुरू केले.

समस्या : अडकलेले मजूर खंगले, खचले.

मात : व्यवस्थित जेवण पोहोचविण्यासाठी 21 नोव्हेंबरला 6 इंची पाईप ड्रिल करण्यात यश आले आणि यातून जेवण पाठवायला सुरुवात झाली.

समस्या : 60 मीटरच्या ढिगार्‍यात 45 मीटरपर्यंत पाईप गेलेला होता. 6-6 मीटरचे 3 पाईप टाकायचे राहिलेले होते आणि ऑगर मशिनच्या वाटेत सळ्या आणि एक ठोस प्लेट आली. ऑगर मशिनचे पाते तुटले. काम थांबले.

मात : 'एनडीआरएफ'चे जवान सळ्या आणि प्लेट कापायला म्हणून पाईपातून आत गेले. कटिंग सुरू केली; पण नंतर त्याचा गॅस अडकलेल्या मजुरांना आणि कटर्सना तापदायक ठरू लागला. त्याचवेळी ध्येय जवळ आल्याचेही कळले. उर्वरित खोदकाम आणि ढिगारा उपसणे मग रॅट मायनर्सनी (हँड ड्रिलिंग करणारे मजूर) पार पाडले आणि एकापाठोपाठ एक अडकलेला मजूर स्ट्रेचर व दोराच्या मदतीने पाईपमधूून बाहेर खेचण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news