कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण | पुढारी

कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे भारत पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री रवींद्र गुप्ता, सैन्यातील प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ‘आम्ही पुणेकर’ संस्थेतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कुपवाडा येथे अनावरण करणे, ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. आम्ही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ शकलो यासाठी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि आम्ही पुणेकर संस्थेचे आभार व्यक्त करतो, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी हा परिसर दुमदुमला होता.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रत्येक देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असतानाच याच वर्षी हा पुतळा कुपवाडा येथे उभारला जाणे, हे कौतुकास्पद आहे. पाकिस्तानकडे निधड्या छातीने हातात तलवार घेऊन उभा असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा शत्रूंच्या छातीत धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला त्यागाची आणि शौर्याची मोठी परंपरा असून त्यांचे अनेक दाखले आजवर पहायला मिळाले आहेत. शिवाजी महाराजांचा हा पुतळा प्रत्येक सैनिकाला कायम ऊर्जा देण्याचे काम करेल, असेही मत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी कुपवाडा येथील ४१ राष्ट्रीय रायफल्स रेजिमेंटसाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच जवानांसह फराळ करत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. याप्रसंगी आम्ही पुणेकर संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव, भारतीय सैन्यातील जवान आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button