Stock Market Closing Bell | जोरदार रिकव्हरी, सेन्सेक्स ६४,१०० पार, ‘हे’ हेवीवेट शेअर्स तेजीत | पुढारी

Stock Market Closing Bell | जोरदार रिकव्हरी, सेन्सेक्स ६४,१०० पार, 'हे' हेवीवेट शेअर्स तेजीत

पुढारी ऑनलाईन : कमकुवत सुरुवातीनंतर आज सोमवारी (दि.३०) बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स आज ३२९ अंकांनी वाढून ६४,११२ वर बंद झाला. तर निफ्टी ९३ अंकांच्या वाढीसह १९,१४० वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस सारख्या शेअर्समुळे बाजाराला सपोर्ट मिळ‍ाला. परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात होत असलेली विक्री आणि जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज देशांतर्गत बाजारात सुरुवातीला काही प्रमाणात घसरण झाली होती. पण त्यानंतर बाजारात रिकव्हरी झाली. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

क्षेत्रीय पातळीवर ऑटो आणि एफएमसीजी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट झाले.

सेन्सेक्स (Sensex Today) आज ६३,८८५ वर खुला झाला होता. काही वेळ तो ६३,४३१ पर्यंत खाली आला. पण त्यानंतर त्याने ६४,१६० पर्यंत वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, एलटी हे शेअर्स १ ते २.५० टक्क्यांपर्यंत वाढले. कोटक बँक, टीसीएस, एसबीआय, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्सनीही हिरव्या चिन्हात व्यवहार केला. तर टाटा मोटर्स, मारुती, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, आयटीसी, एम अँड एम, टाटा स्टील, बजाज फायनान्स हे शेअर्स घसरले. (Stock Market Closing Bell)

बँक आणि वित्तीय स्टॉक्समध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स एनएसईवर (NSE) वर सुमारे ५ टक्क्यांनी घसरले होते. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर ३ टक्के घसरणीसह ८३.३५ रुपयांवर होता. (IDFC First Bank Share Price)

कच्च्या तेलाचे दर घसरले

सोमवारी कच्च्या तेलाच्या (Oil prices) किमती १ टक्क्याहून अधिक घसरल्या. कारण गुंतवणूकदारांनी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयाआधी सावध भूमिका घेतली आहे. या आठवड्यात फेडरल रिझर्व्हची पतधोरण निश्चित करण्याबाबत बैठक होणार आहे. तसेच चीनमधील उत्पादनाची आकडेवारी आणि मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात कमकुवत स्थिती निर्माण झाली आहे. आज ब्रेंट क्रूड फ्यूचर्सचा दर १ टक्क्याने घसरून प्रति बॅरल ८९.५१ डॉलरवर आला.

जागतिक बाजार

मागील सत्रातील अमेरिकेच्या बाजारातील घसरणीचा मागोवा घेत तसेच जपान आणि अमेरिकेतील मध्यवर्ती बँकेच्या व्याजदराबाबतच्या बैठकीपूर्वी गुंतवणूदारांनी सावधगिरी बाळगली आहे. परिणामी सोमवारी जपानच्या निक्केई निर्देशांक ०.९५ टक्क्यांनी घसरून ३०,६९६ वर बंद झाला, तर व्यापक टॉपिक्स १.०४ टक्के घसरून २,२३१वर बंद झाला. विकेंडला अमेरिकेच्या बाजारातील डाऊ जोन्स निर्देशांक घसरला. याचे पडसाद आशियाई बाजारात उमटत आहेत.

परदेशी गुंतवणूकदार

एनएसई (NSE) वरील उपलब्ध आकडेवारीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) १,५०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) एकूण ३१३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

 हे ही वाचा :

Back to top button