अर्थवार्ता : गतसप्ताहातील बाजारातील पडझडीची कारणे काय? | पुढारी

अर्थवार्ता : गतसप्ताहातील बाजारातील पडझडीची कारणे काय?

गतसप्ताहात शुक्रवारच्या सत्रात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे 190 अंक व 630 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 19047.25 अंक व 63778.46 अंकांच्या पातळीवर बंद झाले. दोन्ही निर्देशांकामध्ये अखेरच्या दिवशी 1 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. परंतु एकूण संपूर्ण आठवड्याचा विचावर करता, निफ्टीमध्ये 495 अंक (2.53 टक्के) व सेन्सेक्समध्ये 1619.16 अंक (2.48 टक्के) घट झाली. सप्ताहादरम्यान निफ्टीने 18837.85 अंक व सेन्सेक्सने 63092.98 अंकांच्या न्यूनतम पातळीची नोंद केली. 17 ऑक्टोबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)चे भांडवल बाजारमूल्य 328.98 लाख कोटींनी घसरून 315.70 लाख कोटींपर्यंत खाली आले.

सप्ताहादरम्यान सर्वाधिक घट झालेल्या समभागांमध्ये यूपीएल (-7.4 टक्के), अदाजी एन्टरप्राईस (-5.5 टक्के), एनडीएफसी लाईफ (-4.9 टक्के), जेएसडब्ल्यू स्टील (-4.9 टक्के), एशियन पेन्टस (-4.9 टक्के) या कंपन्यांचा समावेश होतो. तसेच एक्सिस बँक (+2.3 टक्के), एचसीएल टेक (0.8 टक्के), कोल इंडिया (0.5 टक्के) केवळ या तीन कंपन्यांच्या समभागांनी सप्ताहादरम्यान वाढ दर्शवली.

या सप्ताहात बाजाराच्या पडझडीचे प्रमुख कारण ठरले अमेरिकेच्या रोखे बाजारात व्याजदरात (बाँड यील्ड) झालेली वाढ. 10 वर्षे कालावधीच्या अमेरिकेच्या रोख्यांचा व्याजदर मागील 16 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 5 टक्क्यांपर्यंत पोहोचला. अमेरिकेत रोख्यांचा व्याजदर वाढल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातील पैसा काढून तो रोखे बाजाराकडे वळवण्याचे ठरवले. यामुळे भारतीय बाजार खाली आले. शुक्रवारच्या सत्रातदेखील निर्देशांक वाढले असले तरी परदेशी गुंतवणूकदारांनी इक्विटी सदरात 1500 कोटींची विक्री केल्याचे दिसते. मध्यपूर्व (Middle East) मध्ये चालू असलेल्या भू-राजकीय तणावामध्ये या कारणांची भर पडल्याने भारतीय भांडवल बाजार खाली आले.

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चालू आर्थिक वर्षाचे दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीच्या नफ्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 27.4 टक्क्यांची वाढ होऊन नफा 17394 कोटींवर पोहोचला. एकूण महसुलात 1.2 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 2 लाख 35 हजार कोटींवर गेला. याच समूहाची आणखी एक उपकंपनी जिओचा नफा मागील तिमाहीच्या तुलनेत 4 टक्के वधारून 5297 कोटी, तर महसूल 3 टक्के वधारून 26875 कोटी झाला. प्रतिग्राहक सरासरी महसूल (ARPU) 181.7 रुपये झाला. नुकतेच भांडवल बाजारात उतरलेल्या रिलायन्स रिटेलच्या नफ्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 21 टक्के वाढ होऊन नफा 2790 कोटी, तर महसूल 19 टक्के वाढून 77148 कोटींवर पोहोचला.

टाटा उद्योग समूह लवकरच भारतात अ‍ॅपल कंपनीचे फोन बनवणार. तैवानची विस्ट्रॉन कंपनी कर्नाटकमधील आपला आयफोन बनवण्याचा प्रकल्प टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला 125 दशलक्ष डॉलर्सना विकणार.

देशातील महत्त्वाची खासगी बँक एक्सिस बँकेचा नफा दुसर्‍या तिमाहीत 10 टक्के वधारून 5864 कोटींवर पेाहोचला. नफ्यातील वाढ प्रामुख्याने बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वाढल्याने झाली. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (नेट इंटरेस्ट इन्कम) 19 टक्के वधारून 12315 कोटी झाले (बँकेला कर्जवाटपातून मिळालेले व्याज आणि बँकेने ठेवीदारांना दिलेले व्याज यातील फरक म्हणजे निव्वळ व्याज उत्पन्न). बँकेचे एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 1.96 टक्क्यावरून 1.73 टक्क्यांवर खाली आले.

देशातील तिसर्‍या क्रमांकाची दूरसंचार कंपनी ‘व्होडाफोन आयडिया’चा दुसर्‍या तिमाहीचा तोटा 7840 कोटींवरून 8738 कोटींवर पोहोचला. कंपनीने तिमाहीदरम्यान 16 लाख ग्राहकांना गमावले. कंपनीचा प्रतिग्राहक सरासरी महसूल 139 रुपयांवरून 142 रुपये झाला. कंपनीवर सध्या 2 लाख 13 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे बहुतांश महसूल हा घेतलेली प्रलंबित कर्जे तसेच सरकारच्या स्पेक्ट्रमची फी भरवण्यात निघून जातो. त्यामुळे कंपनीला तोटा होत असल्याचे विश्लेषकांचे मत.

देशातील सर्वात मोठी चारचाकी उत्पादक ‘मारुती’चा दुसर्‍या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 80.3 टक्के वधारून 3716.5 कोटींवर गेला. कंपनीचा महसूल 23.8 टक्के वधारून 37.062 कोटी झाला.

जेपी मॉर्गन या पतमानांकन संस्थेचे अर्थविश्लेषक जेम्स सुलिव्हन यांच्यानुसार, भारताची अर्थव्यवस्था 2030 सालापर्यंत 7 ट्रिलियन डॉलर्स होईल. सध्या अर्थव्यवस्थेतील निर्मिती क्षेत्राचा वाटा (Manufacturing segment) 17 टक्क्यांवरून 25 टक्के होईल. अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनेल. सध्या भारताची असलेली 500 अब्ज डॉलर्सची निर्यात पुढील 6 ते 7 वर्षांत दुप्पट होऊन 1 ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. अशाच प्रकारचा अहवाल एस अँड पी या पतमानांकन संस्थेनेदेखील प्रकाशित केला आहे. सध्या भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

आयटी क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी ‘टेक महिंद्रा’चा दुसर्‍या तिमाहीचा नफा 28.7 टक्के घटून 494 कोटी झाला. कंपनीचा महसूलदेखील 2.2 टक्के घटून 13159 कोटींवरून 12864 कोटींवर खाली आला. कंपनीचा भर हा प्रामुख्याने विकसित राष्ट्रामधील दूरसंचार, मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांना आयटी सेवा पुरवण्यावर आहे. या क्षेत्रातील मंदीमुळे सध्या मिळणार्‍या कंत्राटामध्ये कमी आली आणि त्यामुळे महसूल घटल्याचे पाहावयास मिळते.

देशाच्या अर्थमंत्रालयाचा अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात थेट करसंकलनाद्वारे (Direct Tax) सुमारे 19 लाख कोटींपेक्षा अधिक करसंकलन होण्याचा अंदाज आहे. 9 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, करसंकलन मागील वर्षीच्या तुलनेत 21.8 टक्के वधारून 9.57 लाख कोटींवर पोहोचले. आयकर विवरणपत्र भरणारे (Taxfilers)  यावर्षी 81 दशलक्ष (सुमारे 8 कोटी) लोक असतील. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये सुमारे 4.8 टक्क्यांची वाढ पाहायला मिळेल.

देशातील प्रमुख औषध उत्पादक कंपनी डॉ. रेड्डीजचा दुसर्‍या तिमाहीचा नफा 33.02 टक्के वधारून 1482.2 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूल 9 टक्के वधारून 6902 कोटी झाला.

विविध ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना जीएसटी कर चुकवेगिरीप्रकरणी करमागणी करणार्‍या नोटीस पाठविण्यासाठी सरकारी करवसुली, विभागाची तयारी सुरू. याप्रकरणी गेम्सक्र्राफ्ट, डेस्टाटेक गेमिंग, ड्रीम स्पोर्टस् यासारख्या एकूण 20 कंपन्यांना याआधीच नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. एकूण 1 लाख कोटींच्या जीएसटी कर थकबाकीच्या या नोटीस आहेत. यापुढील टप्प्यात याच क्षेत्रातील आणखी 20 ते 30 कंपन्यांना नोटीस पाठवल्या जाणार आहेत.

भारताची विदेश चलन गंगाजळी 20 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्ताहात 2.36 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 583.53 अब्ज डॉलर्स झाली.

Back to top button