इक्विटी पोर्टफोलिओ हेज करण्यासाठी कमोडिटीज मार्केट हा उत्तम मार्ग आहे. कमोडिटी आणि इक्विटी यांचा नकारात्मक संबंध असतो. जेव्हा इक्विटी मार्केट घसरते, तेव्हा साधारणपणे कमोडिटी मार्केट वाढतात. आपण नेहमी बघतो की, इक्विटी मार्केट घसरले की, सोने-चांदीच्या किमतीत उसळी येते. कमोडिटी ट्रेडिंग तुम्हाला शेअर बाजारातील जोखीम नियंत्रित करण्यात मदत करते.
कच्चे तेल, सोने, तांबे यांसारख्या काही वस्तूंमध्ये सर्वात जास्त ट्रेडिंग होते. जर तुम्हाला कमोडिटी मार्केटमध्ये थेट व्यवहार करायचा नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडातूनही गुंतवणूक करू शकता. शेअर बाजाराप्रमाणेच कमोडिटी मार्केटमध्ये कोट्यवधी लोक ट्रेडिंग करतात. पुरुषांबरोबरच महिला आणि तरुणही मोठ्या प्रमाणात अलीकडील काळात कमोडिटी ट्रेडिंगकडे वळत आहेत. कमोडिटी ट्रेडिंग मार्केटमध्ये हेजर्स आणि सट्टेबाज असे दोन प्रमुख घटक असतात. (Investment in commodity market)
1) हेजर्स : अशा गुंतवणूकदारांचा व्यापार्यांसोबत फ्युचर्स करार करून बाजारातील अस्थिरता कमी करण्याचा हेतू असतो. किमतीच्या पातळीतील कोणत्याही बदलाचा बाजारामध्ये संबंधित वस्तूंच्या व्यवहाराच्या दरावर परिणाम होत नाही. बहुतेक हेजर्स कमोडिटी मार्केटमध्ये भौतिक वस्तूंचा व्यापार करतात, कारण त्यांना निर्धारित वस्तू किंवा उत्पादन किंवा पुनर्विक्रीच्या उद्देशांची आवश्यकता असते. (उदाहरणार्थ : तांदूळ शेतकर्याला त्याच्या उत्पादनावरील किमतीची जोखीम हेज करायची आहे. म्हणून, तो फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश करतो. आता स्थानिक बाजारात तांदळाची किंमत कमी झाल्यास तो आपला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट विकून नफा कमवू शकतो. किंमत वाढल्यास तो स्थानिक बाजारपेठेत जास्त किमतीला उत्पादन विकू शकतो. अशा प्रकारे शेतकरी, उत्पादक कमोडिटी मार्केटमध्ये त्यांची जोखीम टाळतात.)
2) सट्टेबाज : कमोडिटी मार्केटमधील व्यापारातून भरीव नफा कमावण्याचे लक्ष्य ठेवणार्या गुंतवणूकदारांना सट्टेबाज म्हणतात. अशा व्यक्ती फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट करण्यापूर्वी बाजारातील किमतींचा, हालचालींचा आणि कमोडिटीच्या दिशेबाबतचा अंदाज घेतात आणि बाजाराच्या अंदाजाच्या अचूकतेवर अवलंबून, स्पॉट किमतींच्या अधीन राहून सकारात्मक किंवा नकारात्मक परतावा मिळू शकतो. सट्टेबाज हे व्यापारी असतात जे केवळ वस्तूच्या किमतीवर सट्टा लावतात. कमोडिटी ट्रेडिंगद्वारे अल्पकालीन नफा कमावण्याचा सट्टेबाजांचा हेतू असतो. त्यांना कोणत्याही जोखमीचा सामना करावा लागत नाही, ज्यासाठी हेजिंग आवश्यक आहे. (उदाहरणार्थ – येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती वाढतील अशी रमेशची अपेक्षा आहे म्हणून तो सोन्याचे वायदे करार खरेदी करतो आणि किंमत वाढल्यावर विकतो. अशा प्रकारे तो कोणतीही दीर्घकालीन पोझिशन्स किंवा शारीरिक वितरण न घेता नफा कमावतो.)
भारतात कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे 5 मार्ग आहेत. ते म्हणजे – 1) कमोडिटी ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे, 2) कमोडिटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक, 3) कमोडिटी ऑप्शन्समध्ये गुंतवणूक/ ऑप्शन्स ट्रेडिंग, 4) कमोडिटी फ्युचर्समध्ये गुंतवणूक करणे, 5) भौतिक वस्तूंमध्ये गुंतवणूक.
1) कमोडिटी ईटीएफमध्ये गुंतवणूक : कमोडिटी एक्स्चेंज ट्रेडेड फंड हा एक फंड आहे, ज्याच्या माध्यमातून एकतर कमोडिटीमध्ये किंवा कमोडिटीच्या संग्रहामध्ये गुंतवणूक करू शकतो. स्टॉक एक्स्चेंजवर कमोडिटी ईटीएफचा व्यवहार करता येतो. (उदा : HDFC Gold ETF, Nippon India Gold ETF Bees आदी)
2) कमोडिटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक : कमोडिटी म्युच्युअल फंड विविध वस्तूंमध्ये गुंतवणूक करतात. ते तज्ज्ञांद्वारे व्यावसायिकरित्या नियंत्रित केले जातात. एचडीएफसी गोल्ड फंड, कोटक गोल्ड फंड यासारखे म्युच्युअल फंड ही भारतातील कमोडिटी म्युच्युअल फंडांची उदाहरणे आहेत.
3) ऑप्शन्स ट्रेडिंग : कमोडिटी ऑप्शन्स व्यापार्यांना हक्क देतात; परंतु त्यामध्ये पूर्वनिश्चित दर आणि तारखेला वस्तू खरेदी किंवा विक्री करण्याचे बंधन नाही. कमोडिटी ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करताना व्यापारी त्याच्या अधिकाराचा वापर न करण्याचा निर्णय घेऊ शकतो. (MCX सोने, चांदी, तांबे, जस्त आणि कच्च्या तेलामध्ये तर एनसीडीईएक्स गवारसीड, सोयाबीन, रिफाईंड सोया तेल, चणा इत्यादींमध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग करता येते.)
4) कमोडिटी फ्युचर्समध्ये गुंतवणूक : कमोडिटी फ्युचर्स बहुतेक उत्पादक त्यांच्या किमतीतील जोखीम हेज करण्यासाठी वापरतात. कमोडिटी फ्युचर्स मार्केटमध्ये सट्टेबाजदेखील व्यापार करतात कारण ते उच्च तरलता आणि लाभ देते.
5) भौतिक वस्तूंमध्ये गुंतवणूक : सामान्यत: सट्टेबाज भौतिक वस्तूंमध्ये गुंतवणूक करत नाहीत कारण त्यासाठी प्रचंड स्टोरेज, विमा खर्च होतो, त्यामुळे परतावा कमी मिळतो.
1) वास्तविक किंमत शोध : कमोडिटी ट्रेडिंग मार्केटने शेतकर्यांना एक पारदर्शक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे बाजारात सुलभ आणि वास्तविक किंमत समजण्यास मदत झाली आहे. शेतमाल खरेदी-विक्रीच्या बाजारापूर्वी, भ्रष्ट मध्यस्थांकडून शेतकर्यांची लूट होत असे. जे शेतकर्यांकडून स्वस्तात माल खरेदी करून व्यापार्यांना चढ्या भावाने विकत असत. परंतु केंद्रिकृत कमोडिटी ट्रेडिंग एक्स्चेंजमुळे शेतकर्यांचे हित जपले जाते.
2) वस्तूंची चांगली गुणवत्ता : कमोडिटी ट्रेडिंगमध्ये एक्स्चेंजमध्ये व्यापार केलेल्या वस्तूंच्या गुणवत्तेवर कठोर नियम असल्याने, शेतकरीदेखील उच्च दर्जाच्या वस्तूंच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष देत आहेत.
3) उत्तम किंमत जोखीम व्यवस्थापन : कमोडिटी डेरिव्हेटिव्हसह, शेतकर्यांकडे फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांसारखी विविध कार्यक्षम जोखीम कमी करणारी साधने उपलब्ध आहेत. (Investment in commodity market)
(क्रमश:)