Stock Market Closing Bell | बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, कशामुळे वाढली जोखीम?

Stock Market Closing Bell | बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, कशामुळे वाढली जोखीम?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मध्य पूर्वेतील इस्रायल- हमास युद्धसंघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेली तेलाच्या किमतीतील अस्थिरता हे घटक बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरले आहे. यामुळे बाजारात विक्रीचा मारा दिसून आला. सेन्सेक्स आज २४७ अंकांनी घसरून ६५,६२९ वर बंद झाला. तर निफ्टी ४६ अंकांच्या घसरणीसह १९,६२४ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

क्षेत्रीय आघाडीवर बँक, मेटल, पॉवर, रियल्टी, ऑईल अँड गॅस आणि फार्मा ०.३ ते ०.९ टक्क्यांनी घसरले. तर ऑटो निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले.

संबंधित बातम्या 

आज गुरुवारी (दि.१९) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex Today) सुमारे ४७० हून अधिक अंकांनी घसरला होता. तर निफ्टी (Nifty50) १९,५३० पर्यंत खाली आला होता. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक सावरले आणि त्यांची घसरण काही प्रमाणात थांबली.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आज सुरुवातीच्या व्यवहारातील घसरणीमुळे बीएसई (BSE) वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.१२ लाख कोटींनी कमी होऊन ते ३१९.२८ लाख कोटी रुपयांवर आले.

सेन्सेक्स आज ६५,४८४ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,३४३ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर विप्रोचा शेअर टॉप लूजर ठरला. हा शेअर सुमारे ३ टक्क्यांनी घसरून ३९५ रुपयांवर आला. विप्रोचे सप्टेंबर तिमाहीतील कमाईचे निराशाजनक आकडे समोर आल्यानंतर त्यांचे शेअर्स घसरले. टेक महिंद्रा, सन फार्मा, एनटीपीसी, भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, रिलायन्स, कोटक बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्सही घसरले.

नेस्ले इंडियाचा शेअर टॉप गेनर

तर नेस्ले इंडियाचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ३.५० टक्के वाढून २४,०९४ रुपयांवर पोहोचला. नेस्ले इंडियाने सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत (Nestle India Q3 results) चांगली कामगिरी करत निव्वळ नफ्यात ३७ टक्के वाढ नोंदवली. त्यांच्या महसुलात ९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या शेअर्सधारकांना लाभांश जाहीर करण्यासोबतच शेअर कॅपिटलमध्ये बदल करण्यासाठी स्टॉक स्प्लिट करण्यास मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नेस्लेचे शेअर्स आज वधारले. दरम्यान, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्सही सुमारे २ ते ३ टक्क्यांनी वाढले.

निफ्टीवर विप्रो, टेक महिंद्रा, यूपीएल, सन फार्मा आणि एनटीपीसी लूजर्स ठरले. तर बजाज ऑटो, LTIMindtree, नेस्ले इंडिया, हिरो मोटोकॉर्प आणि अल्ट्राटेक सिमेंट हे वधारले. (Stock Market Closing Bell)

जागतिक बाजारात कमकुवत स्थिती

अमेरिकेच्या शेअर बाजारातील विक्रीचा मागोवा घेत जपानचा निक्केई गुरुवारी सुमारे २ टक्क्यांनी घसरला. अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीची शक्यता वाढली आहे. तसेच मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार जोखीम टाळत आहे. यामुळे बाजारात घसरण झाली आहे. चीनचा शांघाय कंपोझिट १.२ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, बुधवारी अमरिकेच्या बाजारातील निर्देशांकही घसरले होते. येथील तिन्ही प्रमुख निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक घसरले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news